आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी प्रतिष्ठा मिळवून दे प्रकाशा...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या स्वतंत्र म्हणविल्या जाणाऱ्या भूमीवर मन खरेदी-विक्रीचा बाजार भरला आहे. या बाजारात उभे राहण्यापासून स्वतःला आवरण्याचे बळ आम्हाला दे. हे प्रकाशा.. हे बाजारच मूळातून उठविण्यासाठी करता येणार नाही का काही? अधिक उशीर होण्याआधीच आमची ऊर्जा-प्रतिभा त्याकारणी लागू दे..

अंधाराचा कालखंड संपला, असे सांगत तू जसा प्रत्येकाच्या दारात प्रकट होतोस आणि ‘मी ना कोणा एकाचा, मी सर्वांचा’ अशी आरोळी ठोकतोस....तेव्हा आनंद, उत्साहाचे एक नवे युग सुरू होते...दररोज...तरीही त्या युगाला रोखण्याचे आणि त्याला साठविण्यासाठीचे तंत्रज्ञान शोधले जाते आहे ..दररोज... त्याच्या क्षणभंगूरत्वाची त्यांना आता तरी जाणीव करून दे प्रकाशा...

सृष्टीच्या पालकत्वाची मानाची जबाबदारी निर्मात्याने सोपविलेल्या माणसाने सतयुगाला नाकारण्याचा प्रयत्न करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आनंद, समाधानाचे तुकडे तुकडे पाडण्याची बुद्धी हा नियतीचा कट तर नव्हे? हे त्याला स्वच्छपणे सांगून टाक... तो नादान आहे...त्याने त्याच्या डोळ्यावर घातलेला काळाकुट्ट गॉगल हिसकावून घे... आणि तुझ्या सानिध्यातील त्याची श्रीमंती, समृद्धी आणि भूतलावर पसरलेले त्याचे साम्राज्य त्याला उघड्या डोळ्यांनी आणि मुक्त मनाने पाहू दे...

या सृष्टीत वनस्पतींना शरीर आहे, मन आणि बुद्धी नाही. प्राण्यांना शरीर मन आहे, मात्र बुद्धी नाही. माणसाला मात्र शरीर मनासोबत बुद्धीही आहे, असे म्हणतात. असे असेल तर... या वरदानाची, माणसाला दररोज एक चिमटा घेऊन आठवण करून दे, प्रकाशा...

दोन अमर्याद गोष्टी.. ज्याला सुरवातही नाही आणि शेवटही नाही, काळ आणि अवकाश. या दोन्ही गोष्टींना माणसाने निर्माण केलेली दुनिया ना बांधून ठेवू शकत ना त्यांचा उलगडा करू शकत. संभ्रमात पडला आहे बिचारा.. प्रकाशा.. त्याच्या एवढ्याशा आयुष्यातील त्या अमर्याद आसमंतांची गंमत त्याला चाखू दे...

मुळातले बदल हे विज्ञानातले, तंत्रातले आणि यंत्रातले आहेत, म्हणून माणसे बदलतात... अरे हो...हो... हे सर्व मान्यच आहे...बदलाचा हा झपाटा बेकाबू वाटत असला तरी माणूस तोच आहे. बघ.. त्याचे सर्व अवयव वर्षानुवर्षे जेथल्या तेथे आहेत. यश, आनंद, प्रेम,समाधान या कल्पनाही त्याच आहेत. सर्वोच्च आनंदाला निसर्गाने तिकीट लावलेले नाही, हे त्याला सांगच,पण हे प्रकाशा... या आसमंतातील‘युनिक’ गोष्टींचे भान पुन्हा एकदा करून दे.

आशा-निराशा, यश-अपयश, मान-अपमान, स्तुति-निंदा, सुखदुःख ही द्वंद्व जीवनात पदोपदी येतात, मुजोरी आणि लाचारीच्या लाटांच्या तडाख्यात सापडतो तो. अखेर भंजाळतो अनेकदा. मात्र वेडा त्यालाच आयुष्य समजून बसला आहे. तू जसा प्रत्येक दिवसाकडे निरपेक्षतेने पाहून आपले काम चोख बजावतोस.. तशी जीवनातील प्रत्येक पायरी आत्मविकासासाठी आहे, त्यामुळे तो उतमात करणार नाही, अशाही जीवनसत्वाचा फवारा मारायला सुरवात कर. माणूस म्हणून जन्माला येवून जगण्याची संधी आधुनिक जगाच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये हिरावून घेतली जाते आहे.. ती प्रत्येकाला मिळू दे प्रकाशा..

गर्दीत जागा शोधणारा अपंग, रस्ता ओलांडताना पडलेला अंध, उपाशीपोटी झोपणारा मजूर, कवड्यांची रोजमेळ होत नाही म्हणून शाळेत जावूच शकलेले भाऊबहिणी, उपचाराअभावी वेदनांनी कळवळत पडलेला रुग्ण, उत्तर आयुष्यात नाकारलेपण सहन करत, मरण येत नाही म्हणून जगणारा वृद्ध, निर्मितीतला आपला वाटा उचलून अपमानाला नाकारून ‘शहीद’ होणारा शेतकरी... देशरक्षणासाठी डोळ्यासमोर दिसणाऱ्या मृत्यूला कवटाळणारा शूर जवान...यांची आणि अशा कोट्यवधी माणसांची...त्यांना त्यांचे जग दिल्याबद्दल क्षमा मागण्यासाठीचे मोठे मन आम्हा सर्वांना दे प्रकाशा...

काही जण हुशार, अतिहुशार.. काही तर अति अति हुशार... त्या सर्वांना ही हुशारी केवळ आकडेमोडीसाठी नाही, याची जाणीव करून दे आणि त्यांना सांग की तुम्हा दिली तशी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी उपजत देणगी दिलीच आहे...त्या निर्माणकर्त्याने.. ती शोधून काढणारे मानवी यंत्र दुर्मीळ योजक म्हणून शोधून काढण्याचा पुरूषार्थ त्याचा कान पकडून त्याला करायला सांग... भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरा आणि वर्तमानात जगा.. उपदेश चांगला आहे...मात्र ज्यांना या तिनही काळांनी नाकारले आहे...त्यांनाही जगण्याची संधी देणे हा मानवी संस्कृतीचाच भाग आहे, हे कळणारे समूह वाढतील, असे ‘सॉफ्टवेअर’ बायनरी सिस्टीममध्ये निर्माण करता येणार नाही कदाचित, मात्र प्रत्येकाच्या मनाच्या आतल्या कोपऱ्यात दडून बसलेले ते ‘सॉफ्टवेअर’ वापरण्याची एक लाट येवू दे आता...

पुढील पिढ्यांवर प्रेम करायचे म्हणजे झाड लावायचे.. भविष्यात आपलेच पिल्लू दमून भागून सावलीचा शोधत असेल तेव्हा असेच कोणीतरी वाढविलेले झाडच त्याला सावली देईल, कारण त्यावेळी तू आसमंतात असशील कोठेतरी! हे प्रकाशा, त्यावेळी आम्ही नसूच कदाचित...तूच असशील त्याचा मायबाप, या अमर्याद काळ चालणाऱ्या निसर्गचक्राचे आणि त्याच्या मायेचे भान आम्हाला दे...

स्वतंत्र व्हावे लागते ते मनाने.. स्वतंत्र मनाला कुठल्या बेड्या जखडू शकतात? पण या स्वतंत्र म्हणविल्या जाणाऱ्या भूमीवर मन खरेदी-विक्रीचा बाजार भरला आहे. या बाजारात उभे राहण्यापासून स्वतःला आवरण्याचे बळ आम्हाला दे. हे प्रकाशा.. हे बाजारच मूळातून उठविण्यासाठी करता येणार नाही का काही? अधिक उशीर होण्याआधीच आमची ऊर्जा-प्रतिभा त्याकारणी लागू दे..

शरीरातला आणि मनातला रोग शत्रूपेक्षाही भयंकर असतो, म्हणतात. तो निर्माण कसा झाला, अविश्वास, असुरक्षितेचे वारे का वाहताहेत दाही दिशांनी... हे सांगत बसण्यापेक्षा आता भविष्यातील निरामय आयुष्याची वाट दाखव बाबा... तू ‘खेळ’ सुरू केलास म्हणूनच ‘मुले’ खेळायला आली आहेत बागेत..त्यांना कळत नाही ते काय करताहेत.. तोडफोड... हल्लागुल्ला .. स्वार्थ... आणि सगळं सगळं मान्य आहे तूझं. खुळी आहेत बिचारी... चूक झाली... माफ कर बाबा... पण माणसाला माणसाची प्रतिष्ठा मिळवून दे प्रकाशा...!
(ymalkar@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...