आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या ‘लातूर पॅटर्न’चे महत्त्व (यमाजी मालकर)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दशकांत लातूर शहराची ओळख वेगवेगळ्या कारणांनी बदलत गेली आहे. लातूरची गंजगोलाई बाजारपेठ हे शहर व्यापारी शहर असल्याची आठवण करून देते. या बाजारपेठेत मालाच्या प्रकारानुसार दुकानांचे स्वतंत्र गाळे असून त्यातील काही भागांना वस्तूंच्या नावावरून विशिष्ट नावे मिळाली आहेत, यावरून येथील व्यापारी उलाढालीची कल्पना यावी. ही ओळख आजही कायम असली तरी शिक्षण शेत्रातील लातूर पॅटर्नने त्यावर मात केली आणि हजारो विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी येऊ लागले. विलासराव देशमुख यांनी आठ वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्याने हे ‘मुख्यमंत्र्यांचे शहर’ झाले आणि त्याची तुलना बारामतीशी होऊ लागली. त्यांच्या प्रयत्नानेच लातूरला रेल्वेही आली आणि अनेक नवे उद्योगही आले. त्यामुळे केवळ तेलबिया आणि अन्नधान्य खरेदी-विक्रीचे शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास आले. या शहरातील जमिनीचे चढे दर हाही चर्चेचा विषय झाला. पण या वर्षीच्या पाणी प्रश्नाने लातूरला मोठाच धक्का दिला. मिरजेहून पाण्याची रेल्वे लातूरला न्यावी लागली आणि निम्म्याअधिक भारतात भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या तीव्रतेला लातूरचे नाव मिळाले. आता पाणीटंचाईची ही ओळख पुसून टाकण्यास सुजाण लातूरकर पुढे आले असून त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले तर पाण्याच्या लातूर पॅटर्नला देशभर मान्यता मिळेल. गेले काही महिने चार लाख लातूरकर जे भोगत आहेत, त्याला त्यांनीच इष्टापत्तीचे रूप दिले असून पाणी नावाच्या अमूल्य नैसर्गिक स्रोताचे महत्त्व अधोरेखित करण्याचे पुण्य लातूरला मिळणार आहे.
तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट पर्वतरांगांनी व्यापलेला पठारी प्रदेश आणि नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश, अहमदपूर - उदगीर भागातील मन्याड - लेंडी नद्यांचा मैदानी प्रदेश, मांजरा व तावरजा नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आणि तेरणा व तिच्या उपनद्यांचा प्रदेश म्हणजे लातूर जिल्हा. याचा अर्थ लातूरच्या आजूबाजूला नद्या आहेत आणि ८० ते ९० सेंटिमीटर असा मध्यम पाऊसही लातूरवर पडतो. पण गेली तीन- चार वर्षे त्याचे प्रमाण कमीच राहिले आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी साठवले पाहिजे आणि ते काळजीपूर्वक वापरले पाहिजे, ही लातूरची गरज आहे. गेली काही वर्षे शहरीकरणाच्या माध्यमातून पाण्याची गरज प्रचंड वाढली; पण पाण्याचे साठे वाढले नाहीत आणि गेल्या चार-पाच दशकांत करण्यात आलेले साठे मातीने भरले, हे पाहण्यासाठी कोणाला वेळ मिळाला नाही. पण या वर्षीच्या पाणीटंचाईने ती चूक दुरुस्त करण्यास जनतेला आणि सरकारला भाग पाडले आहे. पाणी साठवण्यासाठी महाराष्ट्रात सध्या जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या कामांत नागरिकांचा सहभाग वाढू लागला आहे. अनेक गावे ‘तहान लागल्यावर विहीर खोदत आहेत’, हे खरे असले तरी आपली तहान आता त्याशिवाय भागू शकत नाही, हे लक्षात येण्यालाही महत्त्व आहे.
लातूर शहरातही आज नेमके तेच होते आहे. गेली तीन-चार वर्षे पाऊस कमी पडला ही तर वस्तुस्थितीच आहे. पण लातूरला अजिबात पाणीच नव्हते, अशी काही स्थिती नव्हती. लातूरमधील पाणीपुरवठा व्यवस्था अतिशय सदोष असून त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते आहे, हे लातूरकरही मान्य करतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भागांत साखर कारखाने चालतात, त्या भागात पिण्याला पाणी नाही, असे म्हणणे सुसंगत नाही. हाच प्रश्न सोलापूर जिल्ह्यालाही आणि अनेक ठिकाणी अडचणीचा ठरतो आहे. थोडक्यात जेव्हा अधिक पाऊस पडतो तेव्हा तो साठवणे आणि ते पाणी पैशांसारखे वापरणे, हाच मार्ग समोर येतो. लातूरच्या शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला ‘लातूरला प्रचंड पाणीटंचाई आहे’ या दवंडीचा मोठा फटका बसला आणि गावातील धुरीण एकत्र आले. आर्ट ऑफ लिव्हिंग, रा. स्व. संघ जनकल्याण समिती, इंडियन मेडिकल असो., लातूर व्यापारी महासंघ अशा अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या (सार्वजनिक जलयुक्त लातूर व्यवस्थापन समिती) आणि लातूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी १० किलोमीटरवर असलेल्या मांजरा नदीच्या साई आणि नागझरी बंधारा १८ किलोमीटर लांब, ८० मीटर रुंद आणि सध्याच्या खोलीपेक्षा तीन मीटर असे खोलीकरण करून क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अंदाजे साडेसात कोटी रुपये खर्च येणार, असा अंदाज आल्यावर तो पैसा शहरातून उभा करण्याचा संकल्प गुढीपाडव्याला करण्यात आला. एवढेच नव्हे, तर पहिल्याच दिवशी अडीच कोटी रुपये जमा झाले! विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, नॅचरल शुगरचे संस्थापक बी. बी. ठोंबरे, अॅड. मनोहरराव गोमारे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, प्राचार्य जोगेंद्रसिंग बिसेन अशा दिग्गजांनी यात पुढाकार घेतला. या बंधाऱ्यांची क्षमता वाढवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. (ठोंबरे यांनी हा प्रयोग लातूरजवळील रांजणी गावात यशस्वी करून दाखवलाच आहे.)
‘जलयुक्त लातूर - सर्वांसाठी पाणी’ हे घोषवाक्य असलेल्या या प्रयोगाला वेगळे महत्त्व आहे. ते असे की, लातूरला सरकार उजनीवरून पाणी देईल की आणखी कोठून, याची वाट न पाहता शहराने आपल्या पाण्याची व्यवस्था शहराजवळ केली पाहिजे, हे आधी मान्य करण्यात आले. दुसरे म्हणजे हे आपले काम आहे, हे मान्य करून सरकारची वाट न पाहता कामाला सुरुवातही करण्यात आली. त्यासाठीचा पैसा गावातच उभा राहू शकतो, हेही या प्रयोगाने दाखवून दिले. महत्त्वाचे म्हणजे जे शहर दुष्काळी भागात आहे आणि ज्या महापालिकेकडे पैसे नाहीत, अशा शहरांत हा प्रयोग सुरू झाला आहे. याचे परिणाम दीर्घकालीन आहेत. हे पाणी लातूरमध्ये येईल तेव्हा ते जपून वापरले पाहिजे, असे सांगण्याची वेळ आता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशातील पाणीटंचाई किती गंभीर आहे, हे समोर आणणारे लातूर शहरच ‘सर्वांसाठी पाणी’ हा मार्ग दाखवते आहे, हे देशासमोर एक आदर्श उदाहरण ठरेल. प्रार्थना करूयात की, या वर्षी लातूरसह देशावर वरुणराजा प्रसन्न होईल आणि लातूरमध्ये आता २४ तास पाणी, अशा बातम्या प्रसिद्ध होतील. त्या बातम्यांवरून ‘पाण्याचा लातूर पॅटर्न’ देशभर नावाजला जाईल आणि आपले गाव, शहराचे पाणी आपणच जिरवले आणि साठवले पाहिजे, याची एक लाट देशात निर्माण होईल!