आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी : गांधीजींच्या इशाऱ्याची प्रचिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय समाज आणि जागतिक समुदाय आज बेरोजगारीच्या प्रश्नामुळे अस्वस्थ आहे. सर्व काही मुबलक असलेल्या या जगाला ही 
अस्वस्थता यांत्रिकीकरणाच्या अतिरेकाने 
दिली आहे. गांधीजींनी यंत्रांना १०० वर्षांपूर्वी ‘सापाचे वारूळ’ म्हटले होते आणि आता जेव्हा या वारुळातून बाहेर पडण्यासाठी माणूस धडपडतो आहे, तेव्हा पुन्हा जगाला गांधीजींची मदत घ्यावी लागणार आहे... 

आज केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वात महत्त्वाचा, कळीचा प्रश्न कोणता, असा प्रश्न सर्वसामान्य विचारी माणसाला विचारला तर त्याचे उत्तर बेरोजगारी हेच असेल. जगाच्या लोकसंख्येने ७५० कोटींचा टप्पा पार केला असून प्रत्येक ७ माणसांत एक भारतीय आहे, इतकी आपली लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे भारतात बेरोजगारीचा प्रश्न अधिकच गंभीर आहे, हे ओघाने आलेच. युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित मानल्या जाणाऱ्या देशांच्या लोकसंख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर) आपल्यापेक्षा कितीतरी पट कमी आहे. (उदा. अमेरिका ३३ तर भारत ४२५) हा फरक अनेक वर्षांपासून आहे. त्याचा परिणाम असा झाला की त्या देशांत मनुष्यबळ कमी असल्याने त्यांना यांत्रिकीकरण करणे भाग पडले. भारतात मात्र त्याची त्या प्रमाणात गरज पडली नाही. अर्थात, जगाच्या स्पर्धेत राहण्यासाठी भारतालाही यांत्रिकीकरण स्वीकारावे लागले. पण आता तेच यांत्रिकीकरण माणसांच्या हाताचे काम काढून घेते आहे आणि बेरोजगारीचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत. 

महात्मा गांधी यांची आज १४८ वी जयंती असल्याने या प्रश्नाविषयी त्यांचे विचार काय होते, हे जाणून घेणे सयुक्तिक ठरेल. ज्या यंत्रांना माणसाने जन्म दिला, ती यंत्रेच आता माणसांचा एक प्रकारे जीव घेत आहेत, असा एक काळ आता निश्चितच आला आहे. माणूस जी शेकडो कामे हाताने करत होता, त्यातील बहुतांश कामे आता माणसांनी यंत्रांना दिली असून अशी कामे यंत्रांकडे जाण्याचा वेग गेल्या काही दशकांत प्रचंड वाढला आहे. यांत्रिकीकरणातून होणारे प्रचंड उत्पादन आणि जीवन सुसह्य होण्यासाठी लागणारी नवनवी साधने, याची गेल्या शतकात गरजच होती. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रे हे जगाने वरदान मानले. पण आता या वेगाने होणारे यांत्रिकीकरण तारक नसून मारक आहे, अशी चर्चा जगभर पुन्हा सुरू झाली आहे. एवढे प्रचंड यांत्रिकीकरण झाले नव्हते, तेव्हा म्हणजे १०० वर्षांपूर्वी त्याविषयी गांधीजींचे विचार काय होते, हे जाणून घेतले पाहिजे. मोठ्या माणसांना भविष्यकाळातले धोके दिसत असतात, तसे गांधीजींना हे धोके दिसलेच होते.  

१९०९ मध्ये ‘हिंद-स्वराज्य’ नावाची एक पुस्तिका गांधीजींनी लिहिली. गांधींजींनी स्वत:लाच अनेक मूलभूत आणि खोचक प्रश्न विचारले आणि त्यांनीच त्याची उत्तरे या पुस्तिकेत दिली आहेत. या प्रश्नोत्तरात प्रामुख्याने पाश्चिमात्य संस्कृतीतील ढोंग लक्षात आणून देणे आणि भारतीय समाज त्याच्या सर्व मर्यादांसह किती चांगला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते त्यांचे विचार आपल्याला आज झेपत नाहीत आणि त्या विचारांकडे दुर्लक्षही करता येत नाही. त्या पुस्तिकेत ‘यंत्रे’ असे एक स्वतंत्र प्रकरण आहे. यांत्रिकीकरणाच्या आजच्या राक्षसी बदलांत आणि वाढत्या बेरोजगारीच्या चिंतेत त्यांचे हे विचार जाणून घ्यायचे, ते या अक्राळविक्राळ समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी. 

यंत्राचा तडाखा बसला म्हणून तर हिंदुस्थान जमीनदोस्त झाला, हे गांधीजींचे वाक्य आहे आणि कापूस नेऊन मँचेस्टरचे कापड इंग्रजांनी भारतीयांना वापरायला लावून किती लूट केली, येथील कारागिरी कशी नष्ट केली हे आपण इतिहासात शिकलोच आहोत. पण ‘यंत्रांनी युरोप उजाड होत चालले आहे आणि त्यांचे वारे आता हिंदुस्थानात वाहू लागले आहेत. यंत्रे ही आधुनिक सुधारणेची मुख्य निशाणी आहे. ते महापाप आहे असे मला तरी दिसते आहे’, हे त्यांचे विधान त्या वेळी कदाचित टोकाचा विचार म्हणून सोडून दिले गेले असेल, पण आज जगात बेरोजगारीवरून जी अस्वस्थता पसरते आहे, ती पाहता त्याचे मर्म आता कळायला हरकत नाही.  

आज माणूस यंत्रांच्या इतका आहारी गेला आहे की त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना करवत नाही. पण तसे होण्यातला विवेक हरवला तर जगावर कोणते संकट ओढवले जाऊ शकते, याचाही इशारा गांधीजींनी फार स्पष्ट शब्दांत या प्रकरणात देऊन ठेवला आहे. ‘माणसांच्या गरजा भागतील, असे सर्व काही निसर्गाने देऊन ठेवले आहे, पण त्याच्या लालसेला पुरेल एवढे तो देऊ शकणार नाही,’ असे गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न एकीकडे आधुनिक समाजाला महत्त्वाचा तर वाटतो आहे, पण त्यासाठी जेव्हा त्याग करण्याची वेळ येते, तेव्हा तो मागे हटतो आहे. कारण आजच्या जीवनशैलीचे चोचले कसे पुरवायचे, असा प्रश्न आपल्याला पडतो. गांधीजींनी जगासमोरच्या अशा अनेक पेचप्रसंगांवर केवळ भाष्यच केले नाही, तर त्या बदलाशिवाय पर्याय नाही, असे १०० वर्षांपूर्वी ठामपणे सांगितले. 

भौतिक प्रगतीची जेव्हा कोठे सुरुवात झाली होती, तेव्हाच यांत्रिकीकरणातून होणारे प्रचंड शोषण, त्यातून होणारे केंद्रीकरण, वाढणारी बेरोजगारी, प्रदूषण आणि बकालीकरण, यावरचे भाष्य गांधीजींनी केले आहे. आजच्या बेरोजगारीच्या संकटावर मात करण्यासाठी जेव्हा जगातील विचारी माणसे एकत्र येतील, तेव्हा गांधीजींच्या या विचाराचा आधार घ्यावाच लागणार आहे. आज संपत्तीच्या विषम वाटपाविषयी आपण सातत्याने बोलतो, पण ही विषमता यांत्रिकीकरणाच्या अतिरेकाने दिली आहे, हेही बोलावे लागेल. तो अतिरेक काढून टाकणे, म्हणजे गांधीजींच्या यंत्रांना असलेल्या विरोधाचे मर्म समजून घेणे. आपण भाग्यवान आहोत, जगाला तारणारा हा विचार या मातीतून पुढे आला. 

खरे म्हणजे ‘हिंद-स्वराज्य’ मुळातून वाचले पाहिजे. गांधीजी पाश्चात्त्य संस्कृतीच्या विरोधात का होते आणि यांत्रिकीकरणाला त्यांचा विरोध का होता, हे त्याशिवाय लक्षात येत नाही. त्या वेळच्या एका प्रश्नावरचे हे त्यांचे उत्तर पाहा. प्रश्न – ट्रामगाडी आणि वीजबत्तीसंबंधी तुमचे मत काय? उत्तर – यंत्र हे एक सापाचे वारूळ आहे. त्यात एक नव्हे, शेकडो साप असतात. जेथे यंत्रे, तेथे शहरे मोठी. जेथे मोठी शहरे, तेथे ट्रामगाड्या आणि रेल्वे. तेथेच विजेचे दिवे. इंग्लंडमध्येसुद्धा खेड्यात विजेचे दिवे किंवा ट्राम नाहीत. प्रामाणिक डॉक्टर तुम्हाला सांगतील, की जेथे रेल्वे, ट्रामगाड्या वगैरे वाढलेल्या आहेत, तेथे लोकांचे आरोग्य बिघडलेले असते. मला आठवते, युरोपातील एका शहरात जेव्हा पैशाचा तुटवडा पडला तेव्हा ट्रामचे, वकिलांचे आणि डॉक्टरांचे उत्पन्न घटले, पण लोकांचे आरोग्य सुधारले! १०० वर्षांपूर्वीचा हा विचार आहे तसा घेऊन पुढे जाता येणार नाही, हे तर उघडच आहे. पण त्यात भर घालून नव्या आव्हानांचा मुकाबला आपल्याला करावा लागेल. एक दिवस असा येईल, जेव्हा बेरोजगारीचे आव्हान पेलण्यासाठी यांत्रिकीकरणाच्या अतिरेकाला थांबविण्यासाठी साऱ्या जगाला एकमत करावे लागेल आणि त्यासाठी गांधी नावाच्या उद्याच्या युग प्रवक्त्याच्या विचाराचा आधार घ्यावा लागेल. 
 
- यमाजी मालकर, ymalkar@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...