आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्सविरोधी लढा संपलेला नाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:ला झालेल्या आजाराबद्दल कुणाला सांगता येत नाही आणि त्या अनुषंगाने वाट्याला येणा-या शारीरिक-मानसिक वेदना सहनही होत नाहीत, अशी अवस्था एचआयव्ही संसर्ग झालेल्या रुग्णांची यापूर्वी होती; आताही आहे. एचआयव्ही संसर्गाचे समूळ उच्चाटन करणा-या औषधांचा शोध लागेपर्यंत ती यापुढे अशीच राहणार आहे. आजघडीला उपचाराच्या सोयी सबंध राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयाच्या एआरटी (अँटिरिट्रोव्हायरल थेरपी) सेंटरमधून मोफत मिळत आहेत, ही एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींचे आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने जमेची बाजू म्हटली पाहिजे, पण त्याच वेळी काही रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी-कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. जिथे पूर्ण संख्येने कर्मचारी आहेत, तिथे आजाराचे निदान काळजीपूर्वक केले जात नाही. ही वस्तुस्थिती स्वीकारून शासनाच्या आरोग्य विभागाने संवेदनशीलतेने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
‘संवेदनशील’ हा शब्द अशासाठी वापरला, की आज एचआयव्ही एड्ससंदर्भात जी जनजागृती झाली आहे, ती मुळातच एकांगी झाली आहे. कारण एचआयव्ही संसर्ग कशामुळे होतो, याची बहुतांश शिक्षित-अशिक्षित लोकांना माहिती झालेली असली तरीही तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करणा-या शालेय स्तरावरील लैंगिक शिक्षणाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर अभाव आहे.
साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ हा एड्सविरोधी लढ्याचा सर्वार्थाने आव्हानात्मक होता. योग्य उपचार, समुपदेशन आणि सामाजिक आधार न मिळाल्याने लक्षावधी ज्ञात-अज्ञात एचआयव्हीचा संसर्ग झालेले मृत्युपंथाला लागत होते. त्या वेळी एचआयव्हीसह जगणा-या रुग्णाला मासिक उपचारांचा सर्वसाधारण खर्च किमान दहा ते पंधरा हजार रुपयांच्या घरात जात असे, जो आज केवळ हजार-दीड हजार रुपयांपर्यंत आला आहे. या घडीला देशातील एचआयव्हीसह जगणा-यांची संख्या 52 लाखांवरून निम्म्यापेक्षा खाली असली तरीही, एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना उघडपणे सन्मानाने जगता येईल, अशी आजही स्थिती नाही.
शासकीय पातळ्यांवर राष्ट्रीय एड््स नियंत्रण संस्थेच्या नियंत्रणाखाली राज्य एड्स नियंत्रण संस्था देशभरात कार्यरत आहेत. एचआयव्ही-एड्स संदर्भात विविध स्तरांवर जनजागृती घडवून आणण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि संस्थात्मक पातळीवर कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठरवून प्रयत्न केले जाताहेत. दर पाच वर्षांनंतर एक टप्पा शासनाने निर्धारित केला आहे. त्यानुसार मार्च 2012 मध्ये तिस-या टप्प्यातील कार्यक्रमाची सांगता झाली. एप्रिल 2013 पासून चौथ्या टप्प्यातील कार्यक्रमाची घोषणा शासनाने केली. मात्र या कार्यक्रमातील उद्दिष्टे कोणती आहेत, याबाबत अद्याप तरी चित्र स्पष्ट झालेले नाही. एकीकडे यापूर्वी ज्या तीन टप्प्यांमध्ये एचआयव्ही रुग्णांच्या हितासाठी कार्यक्रम राबवण्यात आले आहेत, त्यात पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने जनजागृती आणि दुस-या-तिस-या टप्प्यात उपचार सेवा-संदर्भ (केअर अँड सपोर्ट) यास प्राधान्य देण्यात आले. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना मोफत एआरटी (यामुळे रुग्णाच्या रक्तातील एचआयव्ही विषाणूंचे गुणोत्तरीय प्रमाण नियंत्रित ठेवता येते), सीडी-4 टेस्ट (रक्तातील पांढ-या पेशींचे प्रमाण तपासणे) या दोन मुख्य आणि खर्चिक असलेल्या औषधोपचाराच्या सोयी राज्यभरातील सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयांपासून ते अगदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारी पोहोचवण्यात शासनाला यश आले. त्याला प्रतिसाद मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे, एकदा उपचार सुरू केले की ते आयुष्यभर घेणे आरोग्याच्या दृष्टीने बंधनकारक ठरणे. अर्थात, या सर्व सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध असल्या तरी त्यात सेवासातत्य नाही, हे वास्तव आहे.
जोवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून एड््सविरोधी लढ्याचा जोरकसपणे पुकार होत होता, तोवर देशोदेशीच्या आरोग्य यंत्रणा जोमाने कार्यरत होत्या, परंतु गेल्या दोन वर्षांपासून मिलेनियम डेव्हलपमेंट गोलअंतर्गत जागतिक स्तरावरील मोहिमांचा अग्रक्रम बदलला आहे. गरिबी निवारण, शिक्षण, रोजगार आदी प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले आहे. एचआयव्ही-एड््सपेक्षाही मलेरिया-टीबी निवारण कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आता त्या अर्थाने एड््सविरोधी मोहिमांना जागतिक पातळीवरून आर्थिक तसेच संघटनात्मक साथ राहिलेली नाही. अशा वेळी एचआयव्ही- एड्स हा निसर्गत: जडलेला आजार की अमेरिकेच्या कुटिल जैविक युद्धनीतीचा परिणाम; की बलाढ्य औषध कंपन्यांचे कारस्थान, यावर पुन:पुन्हा चर्वितचर्वण करत बसण्यापेक्षा जमिनी स्तरावर या मोहिमांमध्ये सहभागी घटकांच्या निष्ठा डळमळीत होऊ न देता, त्यांच्या एड्सविरोधी कार्यातला, सेवासातत्य राखण्यातला हुरूप टिकवून ठेवणे, हे या पुढील काळातील सगळ्यात मोठे आव्हान ठरणार आहे. कारण एड्स हा जैविक युद्धनीतीचा परिणाम आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले तरीही त्याने जगभरातल्या एचआयव्ही-एड्ससह जगणा-यांच्या वेदना शमणार नाहीत आणि एड्सविरोधी लढाही संपणार नाही.