आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तेव्हा कुटुंबीयांना आयआयटीचा अर्थसुद्धा माहीत नव्हता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वराजची गोष्ट इतर विद्यार्थ्यांपेक्षा निराळी आहे. कारण त्याच्या संपूर्ण कुटुंबाने संघर्षाचा विडा उचलला होता. वडील आजारी आणि गरिबीशी तर आई परिस्थितीशी झुंज देत होती. यातून सुटका मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाने शिक्षणाचा मार्ग धरला. विश्वराजने आयआयटीतून पदवी मिळवली आणि सध्या तो एका नामांकित कंपनीत इंजिनिअर आहे. तसेच त्याच्या बहिणी बँकेत नोकरी करत आहेत.

पाटण्याच्या अरुंद गल्लीत एका खोलीचे एक घर होते. घर नव्हे तर फक्त चार भिंतीचा एक खोकाच म्हणावा लागेल. सुधांशू सिंह हे त्यांची पत्नी पुष्पा आणि चार मुलांसह यात राहायचे. गावातून भाज्या विकत घेऊन त्या शहरात नेऊन विकणे, हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन होते. अशा परिस्थितीतही मुलांना शिक्षण देणे हे त्यांचे दूरवरचे स्वप्न होते. पुष्पा यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. म्हणून त्यांनी मुलगा विश्वराज आनंदला जवळच्या एका सामान्य शाळेत प्रवेश मिळवून दिला. लोकांकडून जुनी पुस्तके आणून दिली. शिकवणी लावण्याचे तर ते स्वप्नही पाहू शकत नव्हते. मात्र, मुलगा विश्वराजने शिक्षणात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. मात्र, सुधांशू अचानक आजाराने ग्रासले गेल्याने परिस्थिती बदलली. त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाल्याने ते घराच्या बाहेरही जाण्यायोग्य राहिले नव्हते. आर्थिक स्थिती खालावल्याने सरकारी रुग्णालयात उपचार सुरू केले. शेजारच्यांकडून उधारी घेऊन महाग औषधी आणि अन्य अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकवेळ अशी आली की, एकवेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण झाले. परंतु या सर्व कठीण परिस्थितीतही आई पुष्पा खंबीर होती. तिने लोकांचे उंबरठे झिजवून झिजवून घर चालवले. पतीची तब्येतही सांभाळली आणि या सर्व व्यापातून मुलांचे शिक्षणही सुरूच ठेवले.

2006 च्या उन्हाळ्यात मी दहाव्या वर्गातील मुलांसाठी ‘हॉट समर, कूल क्लासेस’ नावाने एका अभ्यासक्रमाचे नियोजन केले. त्यासाठी कोणतेही शुल्क नव्हते. त्यामुळे हा कोर्स करण्यासाठी आलेल्या शेकडो मुलांच्या रांगेत विश्वराज आनंदसुद्धा माझ्यासमोर उभा होता. प्रेमळ आणि निरागस चेहर्‍याचा विश्वराज प्रत्येक प्रश्नाचे ताबडतोब उत्तर देऊन आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत होता. मी पहिल्यांदा त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘विश्वराज आनंद’. मी म्हटले की, ‘आनंद तर माझेसुद्धा नाव आहे, पण तुझे नाव माझ्यापेक्षा मोठे आहे. त्यामुळे ती तुला सोनू म्हणेन.’ नवीन आणि लहानसे नाव मिळवून विश्वराज खूप आनंदीत झाला. मात्र, त्याची परिस्थिती ऐकून माझे डोळे पाणावले. तेव्हाच मी त्याला म्हटले की, ‘दहावी पास झाल्यानंतर थेट माझ्याकडे ये.’

पुढच्याच वर्षी तो माझ्याकडे आला. त्याच्यासमोर खूप मोठे आव्हान होते. कुटुंबातील कोणालाच आयआयटीचा अर्थही माहीत नव्हता. आयआयटी हेच त्याचे लक्ष्य असेल असे मी त्याला त्यावेळी ठासून सांगितले. त्यानंतर त्याने मन लावून अभ्यास केला. प्रत्येक सेकंदाचा उपयोग करत झोप येईपर्यंत मेहनत घेतली. यातून वेळ काढून आजारी वडिलांची सेवाही केली. तोपर्यंत त्याच्या बहिणीसुद्धा बँकेच्या परीक्षांच्या तयारी लागल्या होत्या.

2009 च्या आयआयटी प्रवेश परीक्षेत सर्व 30 विद्यार्थी निवडले गेले. माझ्या सोनूच्या भरारीचा क्षण जवळ आला होता. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळूनही तो अन्य शहरात गेला नाही. पाटण्याच्या आयआयटीमध्येच प्रवेश घेतला. कारण आजारी वडिलांना अशा अवस्थेत सोडून जायची त्याची इच्छा नव्हती. दरम्यान, एका स्कॉलरशिपमुळे त्याची आर्थिक मदत झाली. आयआयटीच्या तिसर्‍या वर्षाला येईपर्यंत वडिलांची तब्येतही बरीच सुधारली. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडला तेव्हा वडील तंदुरुस्त झाले होते. लवकरच या चार भिंतीच्या घरात चांगले दिवस येणार, याचेच हे संकेत होते. एकेदिवशी सकाळी सकाळी सोनू घरी एक शुभवार्ता घेऊन आला. कॅम्पसद्वारा त्याची थेट मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीसाठी निवड झाली होती. याचा आनंद साजरा करत असतानाच त्याच्या बहिणींनीसुद्धा बँकेची परीक्षा उत्तीर्ण केल्याची वार्ता येऊन धडकली. सुधांशू सिंह आणि पुष्पा सिंह यांचे आयुष्य मुलांच्या या कर्तृत्वामुळे यशस्वी झाले होते. एका आठवड्यापूर्वीच सोनू माझ्याकडे आला. त्यावेळी एका वर्षात मिळालेल्या पहिल्या प्रमोशनची बातमी सांगून गेला. मी त्याच्या आई-वडिलांविषयी त्याला विचारले. ते प्रसन्न आणि सुखी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, हे सांगताना डोळे पाणावले होते. त्याच्या डोळ्यासमोर एका क्षणात जुन्या आठवणी आल्या होत्या. आता तो संघर्षाचा काळ लोटला आहे. मेहनत आणि संयमाच्या अनोख्या संयोगाने विश्वराज आनंद यांचे कुटुंबीय सध्या सुखी जीवनाचा आनंद घेत आहेत.

ब्रिटनच्या वर्क व्हिसा पॉलिसीत भारताला हवे बदल, सरकार चर्चेच्या तयारीत

ब्रिटनने विद्यार्थी व्हिसाच्या तरतुदी कडक केल्याने भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात पोस्ट-स्टडी वर्क व्हिसासोबतच स्कूल-लिव्हिंग सर्टिफिकेटला मान्यता न देणे तसेच आयएलटीस स्कोरच्या वैधतेशी संबंधित मुद्दे सामील आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससहित ब्रिटनच्या अनेक टॉप संस्था सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यापूर्वी अ‍ॅड-ऑन अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगतात. ब्रिटनमधील शालेय शिक्षण 13 वर्षांचे तर भारतातील फक्त 12 वर्षांचेच असल्याचा तर्क यासाठी सांगितला जातो. दुसरीकडे, ऑक्सफोर्ड, वारविक आणि डरहम विद्यापीठांत मात्र कोणतीच अट ठेवली जात नाही. आयईएलटीएसमध्ये प्राप्त गुणांना ब्रिटनमधील अनेक विद्यापीठे एका वर्षासाठीच वैध धरतात. वास्तविक, ते दोन वर्षांसाठी ग्राह्य धरायला हवे. भारताला 6 एप्रिल 2012 पासून लागू झालेल्या पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा पॉलिसीत बदल हवे आहेत. या पॉलिसीनुसार, येथे पदवी पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना वार्षिक किमान 20 हजार पाउंड वेतनाची नोकरी मिळाली तरच वर्क परमिट दिले जाईल. अशा वेतनाची नोकरी शोधणे भारतीय विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे.