आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: मॅनेजमेंट करिअरसंबंधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचकांकडून आम्हाला सातत्याने ई-मेल आणि एसएमएसद्वारे विचारणा केली जाते. यातील निवडक प्रश्नांना तज्ज्ञांच्या मदतीने उत्तरे देण्यात आली. आज जाणून घ्या व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि यातील करिअरबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरे....
० मी इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशनसह हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर आहे. आता मला कलिनरी आर्टमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कोठे करता येऊ शकेल ?
कलिनरी आर्टचे (फूड प्रॉडक्शन) पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केलेला कोणताही विद्यार्थी त्यासाठी पात्र आहे. परंतु पदवी स्तरावर फूड सर्व्हिस किंवा शेफ ट्रेनिंगपैकी एक विषय विद्यार्थ्याने अभ्यासलेला अपेक्षित आहे. सरकारकडून चालवल्या जाणा-या फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये कॅलिनरी आर्टचे लहान कालावधीचे अभ्यासक्रमदेखील आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कलिनरी आर्ट्स हैदराबाद आणि गोवा कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी एज्युकेशनमध्ये त्याचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येऊ शकतो. परदेशात कॉर्नेल विद्यापीठ-अमेरिका, कॉर्डन ब्ल्यू इन्स्टिट्यूट-फ्रान्स आणि व्हिएन्ना स्कूलमधूनदेखील कलिनरी आर्टचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो.
० मी वाणिज्य शाखेचा बारावीचा विद्यार्थी आहे. गुंतवणूक विश्लेषण आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये करिअर करू इच्छितो. त्यासाठी काय केले पाहिजे ?
फायनान्शियल मॅनेजमेंट विषयाची विशेष शाखा म्हणून इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटला ओळखले जाते. एखाद्या संस्थेसाठी गुंतवणुकीचे चांगले पर्याय काय असू शकतात, ही गोष्ट या शाखेच्या शिक्षणातून जाणून घेता येऊ शकते. सोबतच संस्थेच्या पोर्टफोलिओ मेंटेनन्सचा मुद्दादेखील अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. तुम्ही बी.कॉम., बीबीए किंवा बीए (इकॉनॉमिक्स) अभ्यासक्रम केल्यानंतर एमबीए करून शाखेत प्रवेश घेता येऊ शकतो. अनेक महाविद्यालयांत वित्त शाखेत विशेष प्रवेश घेता येतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणेदेखील तितकेच गरजेचे असते. दुस-या शाखेतील पदवीधरही फायनान्स अँड कंट्रोल, इक्विटी रिसर्च, कॅपिटल मार्केट्स इत्यादी संबंधित अभ्यासक्रम करू शकतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्ट होता येते.
० मास्टर ऑफ फार्मसी कोर्स केल्यानंतर मी तीन वर्षे फार्मा मार्केटिंगचे काम केले आहे. आता मला ब्रँड मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. माझा अनुभवदेखील कामी येईल, असा अभ्यासक्रम सांगावा.
ब्रँड मॅनेजमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसह जनरल एमबीए किंवा फार्मा मॅनेजमेंटमध्ये एमबीए करू शकता. अनेक संस्थांमध्ये आरोग्य, हॉस्पिटल आणि फार्मा मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात जामिया हमदर्द -दिल्ली, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल मार्केटिंग -लखनऊ इत्यादींचा समावेश आहे. एमबीए-मार्केटिंग कोर्स देशातील कोणत्याही बी-स्कूलमधून केला जाऊ शकतो.
० क्रीडा व्यवस्थापनाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देशात कुठे करता येऊ शकतो ? त्यासाठी पात्रता काय आहे ?
क्रीडा व्यवस्थापन हे मैदानाबाहेरच्या घडामोडी उदाहरणादाखल मार्केटिंग, व्यवसाय, प्रशासन इत्यादीशी संबंधित आहे. कोणत्याही शाखेतील पदवी संपादन केल्यानंतर तुम्हाला स्पोटर््स मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. शारीरिक शिक्षण किंवा आपल्याला रुची असलेल्या खेळात शिक्षण घेणे केव्हाही चांगलेच. अनेक संस्थांमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंट फिजिकल एज्युकेशनच्या पदव्युत्तर पदवीचाच एक भाग आहे. त्यासाठी क्रीडा प्रशिक्षणाची गरज नसते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, कोलकाता आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस सायन्स, दिल्ली विद्यापीठातही व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येऊ शकते.
भास्कर तज्ज्ञ
डॉ. पायल उपाध्याय, प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोटा, डॉ. समीरण चक्रवर्ती, सहायक प्रोफेसर, दिल्ली विद्यापीठ
आपण आपले प्रश्न आम्हाला पाठवू शकता. देशातील प्रमुख सल्लागार आणि विषयातील तज्ज्ञ आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा education@dainikbhaskargroup.com