आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी(यूजी) दुसरी कौन्सिलिंग 29 जून रोजी होणार आहे. यासाठी जेईई- मुख्य व एनईईटी-यूजीमधील यशस्वी विद्यार्थ्यांना ऑफर लेटर पाठवले आहेत. जेईई- अ‍ॅडव्हान्सच्या निकालानंतर तिस-या कौन्सिलिंगसाठी ऑफर लेटर पाठवले जाईल. याआधी बालशास्त्रज्ञ प्रोत्साहन योजना फेलोशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देण्यात आले होते.


नावाजलेली संस्था
सरकार-खासगी भागीदारीचा आदर्श
टाटा कंपनीचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती जे.एन.टाटा यांना 1896 मध्ये संशोधन कार्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना करावी असे पहिल्यांदा वाटले. त्यांनी स्वामी विवेकांनद यांच्याशी यावर चर्चा केली आणि त्यासाठी एक समिती स्थापन केली. म्हैसूरचे तत्कालीन राजे कृष्णराय वडियार चौथे यांनी संस्थेसाठी जमीन दिली. 1909 मध्ये सरकारी मंजुरी मिळण्याआधीच टाटांचे निधन झाले. संस्थेच्या नावासोबत आपले नाव जोडले जावे, अशी त्यांची इच्छा होती. यामुळे याचे नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ठेवण्यात आले. असे असले तरी बंगळुरूच्या स्थानिक नागरिकांमध्ये आजही ही संस्था टाटा इन्स्टिट्यूटच्या नावाने प्रसिद्ध आहे.


संशोधनावर सर्वाधिक भर
आयआएससीच्या पदवी अभ्यासक्रमात संशोधन कार्यावर सर्वाधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संशोधन करता यावे यासाठी पदव्युत्तर पदवी व पीएचडी कोर्सेसमध्ये अभ्यासक्रम मर्यादित असतो. संस्थेत 50 टक्के विद्यार्थी संशोधन कार्यासाठी प्रवेश घेतात. अनेक विद्यार्थी संशोधन संस्था व शैक्षणिक संस्थांद्वारे प्रवेश घेतात. यामध्ये डीआरडीओ, इस्त्रो, सीएमआयआर, नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज आदींचा समावेश आहे.


भारतातील नामांकित संस्थांमध्ये समावेश
2013 इंग्लंडच्या टाइम्स हाय एज्युकेशन मासिकाने तयार केलेल्या जगातील नामांकित दहा भारतीय संस्थेत आयआयएसी पहिल्या क्रमांकावर आहे.
2012 ‘ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी सर्व्हे’मध्ये 35 वे स्थान मिळाले व सर्वेक्षणात सहभागी एकमेव संस्था ठरली.
2011 अकॅडमिक रॅँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीजमध्ये समाविष्ट केलेली एकमेव भारतीय संस्था.
ज्ञान
सुपर ग्लू निरुपयोगी समजून संशोधकाने फेकून दिला होता
दुस-या महायुद्धापूर्वी सुपर ग्लू( लवकर चिकटणारा पक्का डिंक) तयार करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. डॉ. हॅरी कूवर युद्धावेळी जवानांना उपयोगी ठरू शकणा-या प्लास्टिक बंदुकीच्या निर्मितीसाठी रसायनाचा शोध घेत होते. अमेरिकेच्या नेवार्क येथील रहिवासी कूवर यांनी सायनोएक्रिलेट्सचा प्रयोग केला. मात्र, त्यात जास्त चिकटपणा असल्यामुळे तो फेकून देण्यात आला. डॉ. कूवर कोडक कंपनीमध्ये काम करत होते. यानंतर ते दुस-या प्रोजेक्टवर काम करू लागले. सायनोएब्रिलेट्समधील चिकटण्याचा गुणधर्म खूप उपयोगी ठरू शकतो हे त्यांच्या 1951 मध्ये लक्षात आले. त्यांनी यावर संशोधन सुरू केले व पुन्हा सुपर ग्लू तयार केला. 1958 मध्ये पहिल्यांदा त्याची मार्केटिंग सुरू झाली.


रंजक
28 महिन्यांनंतर मोनालिसा पुन्हा मिळाली
चित्रकार लियोनार्दो दा विंची यांनी मोनालिसाची कलाकृती साकारली होती. मात्र, सुरुवातीस फार कमी लोकांनी तिची गणना महान कलाकृतीमध्ये केली. 21 ऑगस्ट 1911 रोजी सकाळी विनसेंजो पेरुगियाने पॅरिसच्या लॉवरे भागातून ही कलाकृती चोरली. सुरक्षा रक्षकाला मोनालिसा आपल्या जागेवर दिसली नाही. त्याला वाटले छायाचित्रासाठी कलाकृती नेली असावी. अधिका-यांना हे कळाल्यानंतर संग्रहालय आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आले. पोलिसांनी फ्रान्सच्या सर्व सीमा बंद केल्या आणि प्रत्येक येणारे- जाणारे जहाज व रेल्वेची झडती घेतली. मात्र, मोनालिसाचा ठावठिकाणा लागला नाही. संग्रहालय सुरू होईपर्यंत वृत्तपत्रात नऊ दिवस मोनालिसाचे मथळे प्रसिद्ध झाले. तपासादरम्यान पिकासोची चौकशी करण्यात आली. मोनालिसाच्या चर्चेमुळे पेरुगिया कलाकृतीची विक्री करू शकत नव्हता. डिसेंबर 1913 मध्ये फ्लोरेंसचा आर्ट डीलर अल्फ्र्रेडो गेरी याला चित्र घेण्यासाठी त्याने तयार केले. पेरुगियाकडील चित्र मूळ कलाकृती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेरीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.


इंटरेस्टिंग कोट
"Our scientific power has outrun our spiritual power. We have guided missiles and misguided men."
- Martin Luther King, Jr.
आपले शास्त्रीय ज्ञान वाढत आहे, त्याबरोबर आध्यात्मिक शक्ती कमकुवत होत आहे. याच कारणामुळे आपली क्षेपणास्त्रे योग्य दिशेवर आहेत, मात्र माणूस भरकटला आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com