आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवीत अनुत्तीर्ण, आयआयटी व आयआयएमनंतर तो दुबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची कथा ही अशा विद्यार्थ्यांची आहे की ज्याच्या वडिलांनी त्याला इंजिनिअर करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करणेही शक्य नव्हते, तर मुलाला इंजिनिअर कसे करावे? हा मोठा प्रश्न होता. आईच्या विश्वासावर त्याने पहिल्यांदा आयआयटीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर आयआयएम येथून मॅनेजमेंटची पदवी मिळवली. आज तो दुबईत एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे.
रितेशची कहाणी ही माझ्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी आहे. कारण तो काही करून दाखवेल यावर माझाही विश्वास नव्हता. मीच नाही तर रितेशला त्याच्या स्मरणशक्तीमुळे अनेकदा प्रचंड त्रास व्हायचा. एका घटनेनंतर त्याचे विचार व जीवनाची दिशाच बदलून गेली. ज्यावेळी रितेश आठवीत अनुत्तीर्ण झाला, त्या वेळी त्याच्या घरात स्मशान शांतता होती. त्यावेळी केवळ रितेशच्या रडण्याचा आवाजच येत होता. तो आपल्या वडिलांसमोर माफी मागत होता. स्मरणशक्ती कमी असल्याने त्याला केलेला अभ्यास लक्षात राहत नव्हता. वडिलांनी पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करू की नाही या विचाराने त्याचे मन भरून येत असे. मात्र, याच वेळी आईने त्याला धीर देऊन त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आईने दिलेल्या धीराचा रितेशवर असा काही परिणाम झाला की त्याने वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण तर केलेच, पण त्याने त्याच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे.

रितेशच्या वडिलांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले होते. बिहारच्या बक्सर येथे रोजंदारी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्यांना दोन मुले होते. मात्र, अत्यल्प उत्पन्नामुळे त्यांना दोन्ही मुलांना शिक्षण देणे शक्य नव्हते. त्यावर रितेशची स्मरणशक्ती ही अतिशय कमी असल्याने तो अनेकदा परीक्षेत अनुत्तीर्णच व्हायचा. जर चुकून तो कधी उत्तीर्ण झालाच तर घरी दिवाळी साजरी होत असे. आई-वडिलांना रितेशला इंजिनिअर करण्याची इच्छा होती. मात्र, रितेशने इंजिनिअरिंग पूर्ण करण्याआधी वडिलांचे निधन झाले. वेळ जात राहिला आणि रितेश अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

त्याचा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यात त्याने नेहमीच वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ही गाठ आपल्या मनाशी बांधली होती. सरकारी शाळांत अभ्यास हा तसा कमीच होत असे. मात्र, रितेश आईच्या मदतीने अभ्यासात कुठेही मागे राहिला नाही. एक दिवस त्याला कोणीतरी विचारले की तुला काय व्हायचे आहे, त्यावर तो म्हणाला, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअर व्हायचे आहे. त्यावर समोरील व्यक्तीने त्याला म्हटले की, यासाठी तुला आयआयटीची तयारी करावी लागेल. इथेच रितेशने आयआयटीचे नाव ऐकले आणि त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची दिशा मिळाली. त्यानंतर त्याने बिहार बोर्डातून बारावी परीक्षेत 63 टक्के गुण मिळवले. आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी त्याने पाटणा गाठले. आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीचे शुल्क ऐकून तो घरी परतला.

रितेशकडे वडिलोपार्जित संपत्तीही नव्हती जी विकून त्याला इथे प्रवेश घेता येईल. अशातच त्याला एकाने ‘सुपर 30’ बाबत माहिती दिली. येथे प्रवेश मिळवण्यासाठी त्याने रात्रंदिवस अभ्यास केला. पहिल्या मुलाखतीत त्याची शैक्षणिक पात्रता पाहून मला त्याच्यात काहीही दिसले नाही. मात्र, त्याची मेहनत पाहून मी प्रभावित झालो होतो. त्याने आमच्या संस्थेत तयारी सुरू करून प्रचंड मेहनत घेतली. एखाद्या अवघड प्रश्नावर तो जीव तोडून अभ्यास करत होता. त्याने केलेली मेहनत फळाला आली आणि त्याला 2008 मध्ये आयआयटी खडगपूर येथे प्रवेश मिळाला. त्याच्या आई- वडिलांचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मात्र, एका वर्षानंतर त्याच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले.

परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणे शक्य नव्हते. पाटणाच्या सरकारी रुग्णालयात एक महिन्याच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रितेशच्या घरची परिस्थिती आणखीच बिकट झाली. वडील गेल्यानंतर आईने रितेशला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. अभ्यासासाठी होणारा खर्च त्याच्या ऐपतीच्या बाहेर होता. त्यानंतर बँकेचे कर्ज आणि शिष्यवृत्तीच्या जोरावर त्याने चांगल्या गुणांसह पदवी पूर्ण केली. त्यानंतर आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले. आज तो दुबईच्या एका नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत आहे.

आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी रितेशने उचलली आहे. त्याचा छोटा भाऊ आयआयटी मुंबई येथे शिकत आहे. त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. वडिलांच्या हयातीत त्यांनी पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत रितेशला आहे. आता रितेश त्याच्यासारख्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करतो. 63 टक्के गुण मिळवणाºया रितेशने ज्या पद्धतीने हे यश मिळवले आहे, त्याप्रमाणेच इतर विद्यार्थीही यश मिळवू शकतात.

(फोटो - आनंद कुमार : संस्थापक, ‘सुपर’ 30 पाटणा)