आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशातील शिक्षण - 10 (इतर देशांतील शिष्यवृत्ती)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत आपण अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्तींची माहिती घेतली. याशिवाय हजारो विद्यार्थी दरवर्षी फ्रान्स, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूरसारख्या देशांमध्ये शिक्षणासाठी जातात. या देशांतील शिष्यवृत्तींबद्दल आज जाणून घेऊया.


15 ते 20 टक्के भारतीय विद्यार्थ्यांनाच फायदा
गेल्या काही वर्षांत अमेरिका, ब्रिटनव्यतिरिक्त इतर देशांकडेही विद्यार्थी आकर्षित झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत न्यूझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या 400 टक्के आणि जर्मनीला जाणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत 70 टक्के वाढ झाली आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी सिंगापूरला जाणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. येथे दरवर्षी भारतीय विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करतात. परंतु केवळ 15 ते 20 टक्के विद्यार्थ्यांनाच त्याचा फायदा मिळू शकतो.

आयफेल एक्सलन्स शिष्यवृत्ती योजना : फ्रान्स
फ्रान्सच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अँड युरोपियन अफेअर्सच्या वतीने ही शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी कोर्ससाठी दिली जाते. सायन्स, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट आणि लॉ व पोलिटिकल सायन्स शाखेचे भारतीय व इतर देशांतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीची संख्या निश्चित नाही.
काय मिळेल : आरोग्य विमा, सांस्कृतिक उपक्रमासाठी खर्च, प्रवासी भत्ता आणि निवास खर्च. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दर महिने 1181 युरो ( सुमारे 1 लाख रुपये ) आणि पीएचडीसाठी 1400 युरो (सुमारे 1 लाख 20 हजार रु.) चे अनुदान.
पात्रता : फ्रान्समधील कोणत्याही विद्यापीठात प्रवेश झालेला असावा. तसेच यापूर्वी आयफेल शिष्यवृत्ती मिळालेली नसावी.

स्वीडिश इन्स्टिट्यूट शिष्यवृत्ती : स्वीडन
मास्टर कोर्स करणा-या भारतीय व इतर देशांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. प्रथम एक वर्षासाठी मिळते. चांगले गुण व कामगिरी असल्यास पुढील वर्षीही कायम राहू शकते. 2012 मध्ये 888 विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केला होता. 24 देशांतील 74 लोकांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
काय मिळेल : ट्यूशन फीस, निवासाचा खर्च (9000 एसईके म्हणजे सुमारे 90 हजार रुपये दरमहा,) प्रवास भत्ता (15 हजार एसईके म्हणजे सुमारे दीड लाख रुपये.) शिवाय आरोग्य विमा.
पात्रता : स्वीडनमध्ये वास्तव्याला 2 वर्षे पूर्ण झालेली नसावीत. तसेच तिथे वर्क परमिट अथवा कायम वास्तव्याचा परवाना घेतलेला नसावा. स्वीडिश इन्स्टिट्यूट शिष्यवृत्तीचा लाभ आधी मिळालेले विद्यार्थी दुस-यांदा अर्ज करू शकत नाहीत.

जर्मन अकॅडमिक एक्स्चेंज सर्व्हिस : जर्मनी
विकासाशी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणा-या व्यावसायिकांसाठी. भारताशिवाय दुस-या विकसित देशांतील विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. कालावधी दोन वर्षांचा आहे.
काय मिळेल : दरमहिन्याला 750 युरो (सुमारे 65 हजार रुपये), इन्स्टॉलमेंट, दरवर्षी संशोधन निधी, आरोग्य विमा, वाहतूक खर्च.
पात्रता : जर्मनीच्या कोणत्याही विद्यापीठात किंवा महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आवश्यक अर्हता.

हुवई मैत्री शिष्यवृत्ती : चीन
केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते. चीनच्या सर्व विद्यापीठांत शिकणा-या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो. पहिल्यांदा ही शिष्यवृत्ती एक वर्षासाठी भेटते. 2011 मध्ये सुरू झालेल्या शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी अर्ज करतात.
काय मिळेल : दरवर्षी 5000 अमेरिकी डॉलर अर्थात सुमारे 3.20 लाख रुपये.
पात्रता : चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी, चीनच्या कोणत्याही विद्यापीठात शिक्षण किंवा प्रवेश. वयोमर्यादा -32 वर्षे.

यूथ स्कॉलरशिप : सिंगापूर
द एजन्सी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सिंगापूरकडून ए स्टार यूथ इंडिया स्कॉलरशिप शालेय विद्यार्थ्यांना दिली जाते. जीसीए-ई लेव्हल कोर्ससाठी ही शिष्यवृत्ती आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे.
काय मिळेल : अध्यापन शुल्क, माध्यमिक स्तरावर 2200 डॉलर (सुमारे 1.40 लाख रुपये) आणि विद्यापीठपूर्व स्तरावर 2400 डॉलर (सुमारे 1.50 लाख रुपये) दरवर्षी निधी. त्याशिवाय वसतिगृह प्रवेश, परतीचे विमान तिकीट, आरोग्यविषयक खर्च
पात्रता : 2013 मध्ये आठवी कक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. इंग्लिश लिहिणे, वाचणे, समजण्याची क्षमता.

सरकारी शिष्यवृत्ती : जपान
जपानच्या कोणत्याही विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रम करणा-या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती. सामाजिकशास्त्रे व ह्यूमॅनिटीज तसेच नैसर्गिक विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जपान सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. तिचा कालावधी पाच वर्षांचा आहे.
काय मिळेल : अध्यापन शुल्क- 1 लाख 17 हजार येनचा (सुमारे 62 हजार रुपये) मासिक निधी व भारतात येण्या-जाण्याचा विमान खर्च.
पात्रता : बारावीची परीक्षा उत्तीर्ण, अगोदर शिष्यवृत्ती मिळालेली नसावी.