आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Civil Service Examination, Divya Marathi

Divya Education: नागरी सेवा आणि लोकप्रशासनामध्ये करिअरशी संबंधित प्रश्नोत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य एज्युकेशन’च्या वाचकांचे प्रश्न ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून सातत्याने मिळत आहेत. यातील काही निवडक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मदतीने देत आहोत. आज जाणून घ्या नागरी सेवा आणि लोकप्रशासन आणि इतर करिअरबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे...


० मी मानसशास्त्रातील पदवीधर आहे आणि आता लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे. त्यासाठी सायकॉलॉजी हा पर्याय कसा राहील? माझ्यासाठी करिअरचे आणखी कोणते पर्याय आहेत?
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मानसशास्त्र चांगले गुण मिळवून देणारा विषय मानला जातो; परंतु तुम्हाला त्यात किती रस आहे, त्यावरच पर्याय निवड अवलंबून ठरू शकेल. परीक्षेच्या नवीन पद्धतीमुळे मानसशास्त्राचा अभ्यास सामान्य ज्ञान आणि निबंध लेखनासाठीदेखील उपयोगी ठरू शकतो. मानसशास्त्रात करिअरचे इतर पर्यायदेखील खूप आहेत. मास्टर डिग्रीनंतर आपल्या स्पेशलायझेशननुसार तुम्ही बाल मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ किंवा औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून करिअर करू शकता.
० मी संगणकशास्त्रात बीटेक करतोय. मी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सहभागी होऊ शकतो का ?
अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेची पदवी संपादन केल्यानंतर तुम्हाला अभियांत्रिकी सेवेची परीक्षा देता येऊ शकते. लेखी परीक्षेत चार स्पेशलायझेशन असतात. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असे विषय त्यात आहेत. तुमचा विषय स्पेशलायझेशनमध्ये समाविष्ट नसला तरी तुम्हाला परीक्षेत सहभागी होता येऊ शकते.
० लोकप्रशासनमध्ये पदवीधर झाल्यानंतर एका संरक्षण संस्थेत काम करत आहे. मी यासंबंधीचा एमबीए कोर्स करू इच्छितो. त्याविषयीच्या देशातील संस्थांची माहिती द्यावी.
एमबीएच्या अभ्यासक्रमात लोकप्रशासनाचा काही भाग समाविष्ट आहे; परंतु लोकप्रशासनामध्ये स्पेशलायझेशनसह एमबीएची पदवी देशातील कोणत्याही संस्थेमध्ये उपलब्ध नाही. आंबेडकर विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एमबीएचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. दोन वर्षांच्या या कोर्समध्ये नागरी धोरणे आणि सोशल प्रशिक्षणात स्पेशलायझेशन करता येऊ शकते. अध्यापक आणि व्यवस्थापन अभ्यासातील डीयू आणि आयआयएम लखनऊच्या नोएडा कॅम्पसमध्ये असे कोर्स उपलब्ध आहेत. देशातील अनेक विद्यापीठांत लोकप्रशासनातील मास्टर कोर्स उपलब्ध आहेत. त्यात जामिया मिलिया दिल्ली, पंजाब विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर इत्यादींचा समावेश आहे. उस्मानिया विद्यापीठ, अन्नामलाई विद्यापीठ आणि इंदिरा
गांधी मुक्ती विद्यापीठातही या विषयातील अल्प कालावधीचे अभ्यासक्रम आहेत.
० मी बारावीचा विद्यार्थी आहे आणि वाहतूक व्यवस्थापनात करिअर करू इच्छितो. त्याविषयी माहिती द्यावी.
वाहतूक व्यवस्थापनातील कोर्समध्ये कमर्शियल आणि प्रवासी वाहनांचे लॉजिस्टिक्स, हवाई आणि रेल्वे वाहतूक, सामानाचा पुरवठा आणि वितरण इत्यादीविषयी शिकवले जाते. पदवीनंतर यातील अनेक अभ्यासक्रम करता येऊ शकतात. तुम्ही लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एमबीए करू शकता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, कोलकातामध्येदेखील ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटचा कोर्स उपलब्ध आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे येथूनही तुम्हाला अल्प कालावधीचा कोर्स करता येईल.


भास्कर तज्ज्ञ पॅनल
राहुल गुप्ता, करिअर कौन्सिलर, जयपूर.
मनोज शर्मा, करिअर कौन्सिलर, कोटा.


रोचक
नामांकितांच्या जगावेगळ्या सवयी
डॉ. योशिरो नाकामत्सू
1952 मध्ये फ्लॉपी डिस्कचा शोध लावणारे नाकामत्सू यांच्या नावे तीन हजार तीनशेहून अधिक पेटंट आहेत. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या बहुतांश शोधाची कल्पना पाण्यात असतानाच सुचली. नाकामत्सू यांना खोल पाण्यात तासन्तास बसण्याचा छंद आहे. असे करताना ते नवीन गोष्टींबाबत विचार करतात आणि कल्पना सुचली की पाण्यातच नोटपॅडवर लिहून काढतात.
चार्ल्स डिकन्स
लेखक आणि समाजसुधारक चार्ल्स डिकन्स यांना अस्ताव्यस्त केसांबद्दल प्रचंड चीड होती. त्यांच्यासोबत काम करणारे लोक दिवसभरात शेकडो वेळा केस विंचरत होते. त्यांची आणखी एक सवय होती. ते त्यांच्या कल्पना स्वत: लिहित नसत. ते केवळ बोलत असत आणि त्यांचा सहायक ते लिहून काढत असे, पण बोलताना डिकन्स एका ठिकाणी कधीच बसत नसत.
अगाथा क्रिस्टी
क्रिस्टी यांनी हेरगिरीवर 66 कादंब-या आणि 14 लघुकथा लिहिल्या आहेत. पण त्या कधीच बसून लिहित नसत. मनात येईल तेथे क्रिस्टी लिहिणे सुरू करत असत. मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस ही कथा त्यांनी एका हॉटेलच्या खोलीत लिहिली होती. अनेकवेळा तर त्या कथेचे सूत्र तयार नसतानाही लिहायला सुरुवात करत असत.
निकोला टेस्ला
विजेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे टेस्ला सातत्याने काम करण्यासाठी प्रसिद्ध होते. पहाटे तीन वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत ते काम करत असत. बालपणापासूनच त्यांना ही सवय होती आणि त्यामुळेच वयाच्या 25 व्या वर्षीच ते मानसिक आघाताचे बळी ठरले, परंतु त्यातून सावरल्यानंतरही त्यांची ही सवय काही बदलली नाही.
आपले प्रश्न आम्हाला पाठवू शकता. देशातील नामांकित समुपदेशक आणि विषय तज्ज्ञ त्यांची उत्तरे देतील. ते आम्ही अधून मधून प्रसिद्ध करू. प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा