आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Team Search All India Great Institute

ग्रेट इन्स्टिट्यूट्स : येथे अभ्यास करण्याचा असतो अभिमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात अशा अनेक सरकारी व खासगी संस्था आहेत, ज्यांचे उदाहरण जगभरात दिले जाते. अशा संस्थांमध्ये अभ्यास करणे अभिमानाची बाब ठरते. परंतु या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अतिशय कठीण असते. ‘दिव्य एज्युकेशन’मध्ये तुम्हाला वेळोवेळी अशा काही संस्थांची माहिती मिळेल...
अलिगड मुस्लिम विद्यापीठ
अलिगड मुस्लिम विद्यापीठाची (एएमयू) सुरुवात 1877 मध्ये मोहंमद अँग्लो ओरिएंटल कॉलेजच्या रूपाने झाली. संस्थेची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. मुस्लिम समुदायातील तरुणांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी व त्यांना देशात सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने याची स्थापना झाली होती. 1920 मध्ये या महाविद्यालयास अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा मिळाला. आज या विद्यापीठात 300 अभ्यासक्रम चालवले जातात. दरवर्षी 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यापीठ देशातील पहिल्या 41 विद्यापीठांपैकी आहे.

आशियातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये समाविष्ट असलेला स्ट्रॅची हॉल एएमयूचे प्रेक्षागृह म्हणून ओळखला जात होता. कॅनेडी ऑडिटोरियम तयार झाल्यानंतर त्याचे संग्रहालय करण्यात आले.

अशा सुरू झाल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा
इंग्रजांच्या काळात 1842 मध्ये सरकारी व न्यायालयीन कामकाजाची भाषा इंग्लिश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअगोदर फारसी भाषा सरकारी कामकाजात होती. या निर्णयानंतर सर सय्यद अहमद खान यांना मुस्लिम समुदायासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान गरजेचे असल्याची जाणीव झाली. त्यांनी पहिल्यांदा मुरादाबाद व गाझीपूरमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवर इंग्रजी शाळांची सुरुवात केली.


ऑक्सफर्ड आणि केंब्रिजपासून प्रेरणा
सर सय्यद हे एकदा ब्रिटनच्या दौºयावर गेले होते. तेथील केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठ पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी या दोन संस्थांच्या धर्तीवरच एएमयूच्या अभ्यासाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. आजही एएमयू देशातील अव्वल दहा विद्यापीठांमध्ये समाविष्ट आहे. या वर्षी संस्थेला टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी श्रेणीत नववे स्थान मिळाले. 2012 मध्ये इंडिया टुडेच्या पाहणीत एएमयू पाचव्या स्थानी होते.

परदेशी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
एएमयूमध्ये देशातील प्रत्येक राज्याबरोबरच परदेशातीलही विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. काही अभ्यासक्रमात सार्क व कॉमनवेल्थच्या सदस्य देशांतील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असतात. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक नामांकित लेखक, राजकारणी, क्रीडापटू, अभिनेता, संगीतकार व संशोधकांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी लष्करशहा अय्युब खान, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, बांगलादेशचे मोहंमद अन्सूर अली यासारखे नेते माजी विद्यार्थी आहेत. हॉकीपटू ध्यानचंद, माजी क्रिकेटर मुश्ताक अली, अभिनेता नसिरुद्दीन शहासारख्या बड्या हस्ती याच विद्यापीठात शिकल्या आहेत.

ज्ञान

तीन नवीन केंद्रांना विद्यापीठाचा दर्जा
केंद्र सरकारने अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या तीन नवीन केंद्रांना विद्यापीठाचा दर्जा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही तीन केंदे्र पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, केरळमधील मल्लापुरम व बिहारच्या किशनगंजमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. मुर्शिदाबाद व मल्लापुरमध्ये केंद्राची सुरुवात झाली आहे, तर किशनगंज केंद्राला राज्य सरकारने जमीन दिली आहे आणि त्यासाठी निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय व अल्पसंख्याक मंत्रालयात या प्रस्तावावर चर्चा झाली आहे; परंतु त्यांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यायचा की अल्पसंख्याक विद्यापीठाचा, यावर अद्याप अंतिम निर्णय बाकी आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये एएमयूचे चौथे केंद्र सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आले आहे.


रंजक
वेगळ्या कॅलेंडरमुळे 1908 मध्ये ऑलिम्पिकमध्ये रशियाची टीम 12 दिवस विलंबाने पोहोचली
1908 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी रशियाची टीम 12 दिवसांनी विलंबाने पोहोचली होती. त्यामागे कॅलेंडर कारणीभूत ठरले. इसवी सन 1500 च्या आसपास जास्तीत जास्त रोमन कॅथॉलिक देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले होते. ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात पोप ग्रेगोरी 13 यांनी केली होती, परंतु अनेक देशांत याला विरोध होता. प्रोटेस्टंट संप्रदायाच्या अनुयायी देशांनी त्याला सुमारे 200 वर्षांनी स्वीकारले होते. इंग्लंडमध्ये 1751 मध्ये याची सुरुवात झाली. रशियात ग्रेगोरियन कॅलेंडर 1917 च्या क्रांतीनंतर स्वीकारण्यात आले. त्याअगोदर 1908 मध्ये लंडन येथील आयोजित ऑलिम्पिक खेळात रशियाची टीम 12 दिवस विलंबाने पोहोचली होती. कारण रशियात त्या वेळी तारीख मागे होती.

इंटरेस्टिंग कोट
"Look forward, learn modern knowledge, and do not waste time in studies of old subjects of no value."
- Sir Syed Ahmed Khan
पुढे या, नवीन गोष्टी शिका. ज्या जुन्या गोष्टींचा फायदा नाही त्यांचे वाचन करून वेळेचा अपव्यय करू नका.