नवी दिल्ली - निवडणुकीचा आठवा टप्पा अमेठीच्याच नावे राहिला. बुधवारी राहुल गांधी पहिल्यांदाच दिवसभर मतदान केंद्रांवर फिरले. गेल्या वेळच्या तुलनेत अमेठीत 10 टक्के मतदान वाढले. सात राज्यांतील 64 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 64.28 टक्के मतदान झाले. बुधवारी बिहारमध्ये 14 टक्क्यांनी मतदान वाढले. प. बंगालात 6 जागांवर 81.28 टक्के एवढे सर्वाधिक मतदान झाले. बिहारच्या सात जागांवर 58 टक्के मतदान झाले. ही वाढ 14 टक्क्यांची आहे. आजवर 502 जागांवर मतदान झाले. आता 92 टक्के मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता तीन राज्यांतील 41 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होईल.
जाणून घ्या राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
बिहार - 58%
हिमाचल प्रदेश - 65%
सीमांध्र - 76.01%
उत्तराखंड- - 62 %
उत्तर प्रदेश - 55.52 %
पश्चिम बंगाल - 81.28%
जम्मू आणि कश्मीर - 49.98 %
बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिउद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले. त्यामुळे खवळलेल्या नवऱ्याने चक्क पत्नीवर गोळीबार केला. या व्यक्तीचे नाव विनोद पासवान असल्याचे समजते. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
देशभराची नजर लागेल्या अमेठी मतदारसंघात बूथ कॅप्चर करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळले असून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर आपली नजर असल्याचे म्हटले आहे. मात्र आप नेते सोमनाथ भारती यांनी त्यांच्या यूट्यूब अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात बूथ कॅप्चरींग करण्यात आल्याचे चित्रण आहे. बूथ कॅप्चर केल्याच्या अनेक घटनांपैकी एक घटना असल्याचा दावा आपने केला आहे. दरम्यान मतदारांना पैशाचे आमीष दाखवणा-या एका यूथ काँग्रेस कार्यकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेसला मत देण्यासाठी तो लोकांना पैशाचे आमीष दाखवत होता.
(व्हिडीओ वर पहा...)
अखेर प्रियंकांच्या सचिव प्रिती यांना अमेठी सोडण्याचे आदेश
प्रियंका गांधी यांच्या सचिव प्रिती सहाय यांना अखेर अमेठी सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. अमेठीचे जिल्हाधिकारी जगतराज त्रिपाठी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्रिपाठी म्हणाले, अमेठीचा मतदान नसणा-या प्रत्येकाला अमेठीबाहेर रहावे लागणार आहे. त्यानुसार सहाय यांनीही प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन केले.
त्याआधी भाजप नेत्या स्मृती इरानी यांनी सहाय या स्थानिक नसूनही मतदान केंद्रांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना विरोध करत असल्याची तक्रार केली होती. प्रिती यांनीही पलटवार करत भाजप नेत्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लगेचच प्रिती यांना अमेठी मतदारसंघाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
स्मृती यांनी ट्वीट करून काँग्रेसच्या एका राज्य स्तरीय नेत्याने भाजपच्या पोलिंग एजंटला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याआधी त्यांनी जगदीशपीर येथील कॅमा मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत असल्याचा आरोपही ट्वीटरद्वारे केला होता.
नीच राजकारणाच्या गप्पा करणा-यांना (राहुल गांधी) मी सांगू इच्छिचे की, त्यांचे कार्यकर्ते जगदीशपूरमध्ये मारहाण करत आहेत. असे त्यांनी ट्वीट केले होते. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिका-यांबरोबरही इरानी यांचा वाद झाला. तर आम आदमी पार्टीनेही आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी निवडणुकीच्या दिवशी 15 गाड्यांच्या तफ्यासह फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगाल वासीयांनी देशासमोर बुधवारी एक नवा आदर्श घालून दिला. याठिकाणी मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने, सकाळी अकरा वाजेपर्यंत विक्रमी 45 टक्के मतदानाची नोंद झाली. तर सर्वाधिक चर्चा असलेल्या अमेठीमध्ये साडेअकरा वाजेपर्यंत 21 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
राहुल गांधींचा संताप...
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील मतदानादरम्यान अमेठीतील एका शाळेत मतदान केंद्रामध्ये फळ्यावर कमळाचे चित्र पाहून राहुल गांधी कर्मचा-यांवर भडकले. कमळ ही भाजपची निवडणूक निशाणी आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. याचदरम्यान जेव्हा राहुल गांधी फुला गावात पोहोचले तेव्हा, ग्रामस्थांनी 'हर हर मोदी' च्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा भडकले. रागात त्यांनी गावक-यांना भाजपात प्रवेश करा, अशा शब्दांत सुनावले. गेल्या १० वर्षात राहुल गांधी कधीही त्यांच्या गावात आले नाही, असा आरोप गावक-यांनी केला आहे.
अमेठीचे खासदार राहिलेले संजय सिंह यांनी सुलतानपूरमध्ये वरूण गांधींचा कसलाही प्रभाव नाही त्यामुळे आम्हाला कोणतेही आव्हान नसल्याचे म्हटले आहे. संजय सिंह यांची पत्नी अमिता सिंह काँग्रेसच्या तिकीटावर वरूण गांधीविरोधात लढत आहेत. अमेठीत राहुल गांधी मोठी मते घेऊन विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, याआधी अमेठीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन मतदान केंद्रे त्यांच्या ताब्यात घेतली होती, असा आरोप आपचे उमेदवार कुमार विश्वास यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना कुमार विश्वास यांचा आत्मविश्वास उंचावलेला दिसला. अमेठीत झाडू चालला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात बुधवारी सात राज्यांत 64 मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. यात उत्तर प्रदेशातून दिग्गजांसह सीमांध्र विधानसभा उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रांत बंद होईल.
याच टप्प्यात उत्तराखंडातील सर्व 5 व हिमाचल प्रदेशातील सर्व 4 जागांवर मतदान सुरु. यानंतर 12 मे रोजी शेवटच्या टप्प्यात 41 जागांवर मतदान होईल. 2 जूनंतर आंध्र प्रदेशाचे तेलंगणा व सीमांध्र अशा दोन राज्यांत विभाजन होईल. तेलंगणातील विधानसभा मतदारसंघांत 30 एप्रिलला मतदान झाले आहे. सीमांध्रच्या 175 विधानसभा मतदारसंघांत मतदान सुरु.
रिंगणातील दिग्गज उमेदवार
उत्तर प्रदेश : राहुल गांधी, स्मृती इराणी, कुमार विश्वास, वरुण गांधी, बेनीप्रसाद वर्मा, मोहंमद कैफ
बिहार : रामविलास पासवान, राबडीदेवी, राजीव प्रताप रुडी
हिमाचल : प्रतिभा सिंह, अनुराग ठाकूर
विविध राज्यांतील ताजी माहिती...
उत्तर प्रदेश
- उत्तर प्रदेशातील हा मतदानाचा पाचवा टप्पा असून १५ जागंसाठी मतदान होत आहे.
यात अमेठी, सुलतानपूर, प्रतापगड, कौशांबी, फूलपूर, अलाहाबाद, फैजाबाद, आंबेडकरनगर, बहराइच, केसरगंज, श्रावस्ती, गोंडा, बस्ती, संत कबीर नगर आणि भदोही यांचा समावेश आहे.
- या टप्प्यामध्ये राहुल गांधी, वरुण गांधी, स्मृती ईरानी, कुमार विश्वास, रेवती रमण सिंह, बेनी प्रसाद वर्मा, राजकुमारी रत्ना सिंह, किर्तीवर्धन सिंह, ब्रजभूषण शरणसिंह आणि निर्मल खत्री यांच्यासह 243 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहेत.
बिहार
- बिहारमध्ये लोकसभेच्या सात जागांसाठी आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
- लोकसभेच्या सात जागांसाठी येथे 118 उमेदवार रिंगणात आहेत.
- बिहारमध्ये ज्या मतदारसंघात मतदान सुरू आहे, त्यात शिवहर, सीतामढी, मुजफ्फरपूर, महाराजगंज, हाजीपूर, सारण, उजियारपूर यांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेश
- जम्मालामाडुगू विधानसभा मतदारसंघात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
- आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच सीमांध्र परिसरात विधानसभेच्या 175 जागांसाठीही मतदान सुरू आहे.
- नवीन राज्य निर्मीतीनंतर प्रथमच सीमांध्र परिसरात विधानसभा निवडणुका होत आहेत.
- येथे अरुकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टनम, अनाकापल्ली, काकीनाडा, अमलापुरम, इलुरू, मछलीपट्टनम, विजयवाडा, गुंटूर, नरसारावपेट, बाप्पाटला, ओंगली, नांदयाल, कुरनूल, अनंतापूर, हिंदूपूर, कडप्पा, नेल्लोर,
तिरुपति, राजमपेट आणि चित्तूर या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
पश्चिम बंगाल
- पश्चिम बंगालच्या सहा जागांसाठी 72 उमेदवार मैदानात आहेत.
- येथील झारग्राम, मिदनीपूर, पुरुलिया, बांकुरा, विष्णुपूर आणि आसनसोल या जागांसाठी मतदान सुरू आहे.
- या टप्प्यात डाव्यांसमोर त्यांच्या सहा जागा टिकवण्याचे आव्हान आहे.
- या टप्प्यात प्रामुख्याने नऊ वेळा खासदार राहिलेले वासुदेव आचार्य, अभिनेत्री मुनमुन सेन, संध्या राय आणि गायक बाबुल सुप्रियो यांचे भवितव्य ठरणार आहे.
जम्मू-कश्मीर
- लद्दाख आणि बारामुल्ला या दोन जागांसाठी मतदान सुरू.
- बारामुल्ला मतदारसंघात एका पोलिंगबूथच्या जवळ आईईडी ब्लास्ट झाल्याचे वृत्त आहे.
उत्तराखंड
- टिहरी गढवाल, पौढी गढवाल, अल्मोड़ा, नैनीताल, ऊधमसिंह नगर, हरिद्वार येथे मतदान सुरू आहे.
हिमाचल प्रदेश
- सूबे की कांगड़ा, मंडी, हमीरपूर, शिमला या जागांवर मतदान सुरू आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या दिग्गजांनी केले मतदान...