बांकुडा/ आसनसोल. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांत पश्चिम बंगालमधील 23 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आता माय-लेकासोबत (सोनिया आणि राहुल गांधी) दीदी (ममता बॅनर्जी) यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या. या वेळी ते म्हणाले, दिल्लीत मी आणि बंगालमध्ये दीदींचे सूत्र ठरल्यास पश्चिम बंगालच्या लोकांना दोन्ही हातात रसगुल्ले मिळतील.
''मी आपणास एक फॉर्म्युला देत आहे. केंद्रात भाजपचे बळकट सरकार आल्यास दीदींना नाटकीपणा आणि तू-तू, मैं-मैं बंद करून आपले सरकार चालवावे लागेल. मी 100 कि.मी. लांबीचा रस्ता तयार करीन तेव्हा त्यांनी किमान 10 कि.मी. रस्ता करावा. त्याच वेळी तुमच्या (बंगाली लोकांना) दोन्ही हातांत रसगुल्ले पडतील. यातून खरा वाघ कोण आहे हे पण कळून चुकेल.''
कागदी वाघाच्या गुजरातमध्ये मुली सुरक्षित, बंगाल असुरक्षित
नवरात्रात बंगालप्रमाणे गुजरातमध्येही रात्रभर दुर्गा पूजा चालते. मात्र, तिथे मुली रात्रभर सुरक्षितपणे ये-जा करतात. जिथे कागदी वाघ आहे, तिथे मुली सुरक्षित आहेत. मात्र, इथे तुम्ही ज्या खर्या वाघाच्या बाता मारता ते राज्य (पश्चिम बंगाल) महिलांसाठी देशातील सर्वात तीन असुरक्षित राज्यांपैकी एक आहे.
बदला घेण्यासाठी नव्हे, तर बदल घडवण्यासाठी राजकारणात
आम्ही सूड उगवण्यासाठी राजकारणात आलो नाही तर बदल घडवून आणण्यासाठी आलो आहोत. दीदींनी माझ्यावर कितीही निशाणा साधला, कितीही खोटे आरोप केले तरी बंगालची सेवा करण्याची संधी मिळाल्यास मागे हटणार नाही. दीदी मला काय म्हणाल्या, त्यांनी किती शिव्या दिल्या, याचा विचार काम करताना करणार नाही.
बंगालनंतर मोदी यांनी अलाहाबादमध्ये सभा घेतली.
नमो चहानंतर आता डोकेदुखी घालवणारा नमो बाम
अहमदाबाद. नरेंद्र मोदी यांच्या ब्रँडचा उपयोग करण्यासाठी आता बाजारात नमो बाम आला आहे. नमो स्टोअरमधील 20 उत्पादनांपैकी ते एक आहे. बामच्या विक्रीमुळे ते आऊट ऑफ स्टॉक झाले आहे. अद्रकापासून बनवलेला बाम आयुर्वेदिक आहे. शरीराला आराम मिळावा तसेच डोकेदुखी दूर करण्यासाठी त्याचे उत्पादन करण्यात आले आहे.
नमो स्टोअरचे स्वयंसेवक प्रग्नेंद्र म्हणाले, महिनाभरापासून नमो बामच्या 10 हजार युनिटची विक्री झाली असून अद्याप 35 हजार युनिट ऑर्डरची पूर्तता होणे बाकी आहे. बाम 12 राज्यांत लाँच करण्यात आला. विक्रीमागे किंमत हे एक कारण आहे. एका बामची किंमत 24 रुपये आहे. अन्य आयुर्वेदिक बामची किंमत यापेक्षा जास्त आहे. आठवडाभरापूर्वी बडोद्यात नमो चहा सुरू करण्यात आला. नमो चहासाठी आसामधून चहा मागवला जात आहे. नरेंद्र मोदी यांचे सर्मथक त्याची पॅकिंग करत आहेत. आतापर्यंत 1 लाख किलो चहाची विक्री झाल्याचा दावा सर्मथकांनी केला आहे. सध्या 50 हजार किलो नमो चहाची ऑर्डर प्रलंबित आहे.