आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: कुठे नेऊन ठेवले माझे औरंगाबाद? (श्रीकांत सराफ)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोटावर मोजण्याइतके अनपेक्षित निकाल सोडल्यास औरंगाबाद महापालिकेत अपेक्षेप्रमाणे शिवसेना-भाजप युतीने सत्ता काबीज केली. काँग्रेसची धूळधाण उडाली. एमआयएमने मुस्लिम-दलितबहूल वॉर्डात एकहाती विजय मिळवला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची पाळेमुळे हिंदूबहुल वसाहतीत पक्की रुजली आहेत. भाजपनेही सेनेच्या मदतीने चांगले पाय रोवले आहेत. त्यामुळे 113 वॉर्डात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय युतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याचवेळी दोघांना मिळून किमान 58 जागा मिळणारच, हे स्पष्ट झाले होते. औरंगाबादेत दलित-मुस्लिमांचे प्राबल्य असलेले 35 – 38 वॉर्ड आहेत. त्यात यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, समाजवादी आणि एक-दोन मुस्लिम किंवा दलित अपक्ष निवडून येत होते. आजचा निकाल पाहिला तर विरोधकांचे आकडे त्याच्याच जवळपास येतात. याचा युती आणि विरोधकांकडून जल्लोष होत असला तरी शहरात धार्मिक ध्रुवीकरण अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते. प्रचाराच्या काळात समांतर जलवाहिनी, महापालिकेतील भ्रष्टाचार, खड्ड्यात गेलेले शहर, कोलमडलेली ड्रेनेज यंत्रणा असे अनेक विकासाचे मुद्दे होते. युतीने शहराला बकाल केल्याचे हिंदू मतदार मोठ्या संख्येने सांगत होते. प्रत्यक्षात त्यांनीच धर्माच्या आधारावर युतीला मतदान केले. आणि त्यामुळेच युती पुन्हा सत्तेत आली आहे. ही शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. पुढील घडामोडीत एमआयएमची जबाबदारी वाढली आहे. कारण विकासाच्या मुद्यावर आम्हाला मतदान करा, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी प्रचारात सांगितले. त्यामुळे त्यांना युतीला वारंवार वेसण घालून विकासाच्या मुद्यावर सकारात्मक योगदान द्यावे लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठे अपयश मिळाले असले तरी त्यांनी या पराभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. फक्त मतांसाठी धार्मिक अनुनय करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची खोड यापुढील काळात तरी मोडली जाईल, अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दलित समाज रिपब्लिकन पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर एमआयएमकडे वळाला आहे. आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबाद शहरात असे होणे म्हणजे रिपब्लिकन नेत्यांसाठी मोठा धडाच आहे. एकूणात जातीय, धार्मिक राजकारणातून कुठे नेऊन ठेवले माझे औरंगाबाद? असा प्रश्न कुणाच्या मनात असेल तर त्याचे उत्तर जातीय, धार्मिक राजकारणाच्या खोल, अंधाऱ्या दरीत, असे उत्तर मिळाले आहे.
(लेखक - दिव्य मराठीचे औरंगाबाद ब्यूरो चिफ आहेत)