रोहतक - हरियाणातील कर्नाल आणि महाराष्ट्रातील बीड व औरंगाबादमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले तर, रोहतकमधील महम येथे काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींवर प्रहार करताना त्या म्हणाल्या, 'जे नुसते ओरडत असतात, ते खरे नसतात. त्यांच्या बोलण्यात खरपणा नसतो.' यावेळी मंचावर हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि रोहतकचे खासदार दीपेंद्रसिंह हुड्डा उपस्थित होते.
मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली का? तरुणांच्या हाताला काम दिले का? महागाई कमी झाली झाली का? भाजपने लोकसभा निवडणुकीत दिलेले सर्वात महत्त्वाच्या आश्वासनाबद्दल विचारताना त्या म्हणाल्या, '100 दिवसांमध्ये काळेधन परत आणले जाणार होते, ते परत आले का?' सोनिया गांधी आवेशपूर्ण भाषेत जनतेला उद्देशून म्हणाल्या, 'माझी एक गोष्ट लक्षात असू द्या, जो खूप ओरडतो, त्याच्या बोलण्यात खरेपणा नसतो.'
मोदी आणि भाजपवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, 'जे लोक पोकळ आश्वासने देतात, ते देश घडवू शकत नाहीत. देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागते आणि हेतू देखील शुद्ध असावा लागतो. आज देश ज्या ठिकाणी पोहोचला आहे, त्यासाठी देशातील अनेक लोकांनी कष्ट घेतले आहे, रक्त सांडले आहे. मात्र, भाजप असे दाखवत आहे, देशात जे काही काम झाले आहे ते फक्त त्यांच्यामुळेच झाले आहे.'
मुख्यमंत्र्यांचे कौतूक
सोनिया गांधी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या कामाचे कौतूक केले. त्या म्हणाल्या, 'गेल्या 10 वर्षांमध्ये हुड्डा यांच्या नेतृत्वात हरियाणाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. राज्यातून अराजकता आणि भीतीचे वातावरण संपले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये हरियाणाच्या प्रगतीसाठी हेच सरकार पुन्हा निवडून द्या, तुमच्या भावी पिढ्या तुमच्या निर्णयावर गर्व करती, कारण विकास फक्त काँग्रेसच करु शकते. '