मुंबई- देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत 'लव्ह जिहाद' हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा मुद्दा होता. परंतु राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद' या मुद्यापासून भाजप लांब राहणार आहे. देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी स्वत: राज्यात भाजपचे स्टार प्रचारक म्हणून सभा घेणार आहेत. मोदींच्या राज्यात 10 सभा होतील. तसेच अन्य दिग्गज नेते पक्षाचा प्रचार करणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय नेतृत्त्वाकडून भाजप प्रदेश कमिटीला प्रचारासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत. प्रचारादरम्यान 'लव्ह जिहाद' आणि जातीय मुद्दे प्रचारात न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात अशा प्रकारचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज (शनिवारी) मुंबई येत आहेत.
अमित शहा त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठक होणार असून त्यात प्रचारासाठी विशेष व्युव्हरचना आखण्यात आली आहे. 'महाराष्ट्राचा विकास' हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल. विशेष म्हणजे भाजप शिवसेनेला टार्गेट करणार नसून कॉंग्रेसविरोधात प्रचार करेल.
भाजपने 257 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 30-35 जागा या घटकपक्षांना दिल्याचे समजते.
शिवसेनासोबतची 25 वर्षे जुनी मैत्री तोडल्यानंतर भाजपने आता घटकपक्षांवर फोकस केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (शनिवारी) अंतिम तारीख आहे.