आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाखेड : बॅगेत अजित दादांच्या कपड्यांबरोबर सापडले 4.85 लाख रोख आणि व्हिजिटिंग कार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंतूर / परभणी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होत आहे. जिंतूर पोलिसांनी पकडलेल्या एका गाडीत लाखोंची रोकड आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्ड असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोकड आणि गाडी जप्त केली असली तरी अदयाप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाला गंगाखेड - परळी चेकपोस्टवर एमएच 09 डीएक्स 5210 या स्कॉर्पिओ गाडीत तीन बॅगा सापडल्या. त्यात 4.85 लाखांची रोकड आढळून आली आहे. एका बॅगेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्ड सापडले. त्यासोबतच त्यांचा स्विय सहाय्यक देशमुख यांचेही कपडे एका बॅगेत आहेत. पवारांच्या ताफ्यातील एका सुरक्षा रक्षकाचे ओळखपत्रही सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्ह्याध्यक्ष विजय भांबळे यांच्या प्रचाराची ही स्कॉर्पिओ असल्याचे सांगितले जात आहे. गंगाखेडहून ही गाडी लातूरला निघाली होती. गंगाखेड - परळी चेकनाक्यावर पोलिसांनी गाडी तपासली त्यात एक ब्रिफकेस, एक सॅग आणि एक मोठी बॅग होती. पोलिसांनी या बॅगा उघडण्यास सांगितल्या असता, त्या बॅग अजित पवारांच्या आहेत, त्याची चावी माझ्याकडे नसल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गाडी गंगाखेड पोलिस स्टेशनला नेऊन पंचांसमोर बॅगचे लॉक उघडले. तेव्हा त्यातील एका बॅगमध्ये 4 लाख रुपये आणि देशमुख यांच्या बॅगमध्ये 85 हजार रुपये सापडले.
या प्रकरणी सायंकाळी सातपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. विशेषम्हणजे अजित पवार सध्या मराठवाडा दौर्‍यावर आहेत.

पक्षाच्या निवडणूक फंडातील पैसे - तटकरे
पोलिसांनी अजित पवार, त्यांचा पीए आणि विजय भांबळे या तिघांकडेही पैशांबद्दल खुलासा मागितला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार हे पक्षाचे स्टार प्रचारक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी रोख पैसे बाळगण्यात काहीही गैर नाही. ते संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यांच्या वरखर्चासाठी त्यांना पक्षाच्या निवडणूक निधीतील पैसे दिल्याचे तटकरेंनी सांगितले आहे.

(छायाचित्र प्रतिकात्मक)
पुढील स्लाइडमध्ये, पैसे वाटण्याच्या आरोपात उमेदवाराच्या मुलीला अटक