आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा रणधुमाळी - आता दिल्लीपुढे झुकणार नाही - आदित्य ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "जय महाराष्ट्र' हा राज्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचलाच पाहिजे, आतापर्यंत महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत आलाय, यापुढे मात्र तसे होणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी फिरत असताना मला राज्यभर फक्त आणि फक्त भगवाच दिसत आहे. दोन्ही काँग्रेसने राज्याला लुटले आहे, तर आता भाजप राज्याचे तुकडे करायला निघाला आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले.

शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी नेता सुभाष चौकात झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख सुहास सामंत, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, नगर शहरात गेल्या २५ वर्षांपासून फडकत असलेला भगवा खाली उतरू देऊ नका, शहराला दादागिरी करणारे दादा हवेत, की सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे भय्या हवेत, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
शिवसेना - भाजपची युती माझ्या वयापेक्षा एक वर्ष मोठी होती. भाजपच्या काही नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ही युती तोडली. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या पक्षाला धडा शिकवायचा आहे. येत्या १५ तारखेला शिवधनुष्य हाती घेऊन दोन्ही काँग्रेस व भाजपरूपी रावणाचे दहन करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
दिल्लीचे काही लोक येतील, वेगवेगळी आमिषे दाखवतील, परंतु कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. काही झाले तरी दिल्लीचे लोक परकेच आहेत, निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. राज्याचा धनुष्यबाण तुमच्या हातात आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
सभा संपल्यानंतर ठाकरे यांच्याशी हात मिळवण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची देखील एकच झुंबड उडाली. ठाकरे यांनी देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

"भावोजींची' भावनिक साद
आदेश बांदेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना भावनिक साद घातली. शिवसेनेने घराघरात विश्वास निर्माण केला आहे. सेनेने आतापर्यंत राज्यातील जनतेसाठी खूप काही केले आहे, आता वेळ आली आहे, सेनेसाठी काही करण्याची. नगरकरांचा राठोड यांच्यावरील विश्वास पाहून ते आता यावेळी सिक्सर मारणार आहेत, यात काहीच शंका नाही. राज्याला सुखाचे दिवस दाखवण्यासाठी विधानसभेवर भगवा फडकवा, तरच सेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल. दहीहंडीला हात लागल्यानंतर भाजपचे लोक खालच्या थराला विसरले आहेत, पण त्यांना माहिती नाही, की खालचा थर काढला, तर वरच्यांचे काय होईल, असे बांदेकर म्हणाले.

शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य
युवा नेते आदित्य ठाकरे यांची शहरात सभा निश्चित झाल्यानंतर सर्वच शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. सभेच्या दिवशी हे चैतन्य दिसून आले. ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी, तसेच त्यांचे विचार ऐकण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शहरात आतापर्यंत झालेल्या सर्व पक्षांच्या सभेच्या तुलनेत ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेष म्हणजे उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत रंग भरला. काही शिवसैनिकांनी, तर अक्षरश: देहभान विसरून डिजेवर ताल धरला.

राष्ट्रवादी हा गुंडांचा, तर काँग्रेस हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. शहराची सत्ता २५ वर्षे यांच्याकडे असती, तर त्यांनी आतापर्यंत शहर विकून खाल्ले असते. माझ्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आता आदित्य ठाकरे आले, याचाच अर्थ मी तीन पिढ्यांपासून पक्ष बदललेला नाही, हे सांगताना मला गर्व होतो. शरद पवार यांच्यावर लोक आता विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्या शहरात झालेल्या सभेस दोनशे ते तीनशे रुपये देऊन माणसं आणावी लागली. त्यामुळे गुंड कोण ते शहराला माहिती आहे. उड्डाणपूल आतापर्यंत झाला नाही, हे काँग्रेस अाघाडीचेच पाप आहे. मला उरलेले नऊ दिवस द्या, मी पाच वर्षे तुमच्या पाठीशी उभा राहील, असे आवाहन राठोड यांनी केले.

उड्डाणपुलासाठी वचन
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास पहिल्या शंभर दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू करू, हे माझे वचन आहे आणि मी वचनाला पक्का आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट करताच, उपस्थित नगरकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शहरात उद्योगधंदे येत नाही, उद्योगमंत्र्यांचे धंदे मात्र जोरात सुरू आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष भ्रष्टवादी पक्ष असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.