आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीचे बळ वाढले तरी आघाडीच प्रभावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा म्हणून नगरची ओळख. सरकार कोणाचेही असो, जिल्ह्यातून किमान तीन जणांना मंत्रिपदे मिळणारच. १४ तालुके सध्या १२ विधानसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. पूर्वी कम्युनिस्ट समाजवादी विचारसरणीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगरमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप शिवसेनेही पाय रोवलेले आहेत. सन २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९, तर युतीला चार जागा मिळाल्या होत्या. जिल्ह्यात प्रभावी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीतील अशोक काळे, शिवाजी कर्डिले, विजय औटी यांनी युतीला जवळ केल्याने प्रथमच एवढे यश मिळाले होते. २००९मध्ये आघाडीला सात, तर युतीला जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आघाडीचे वर्चस्व कायम राहिले असले तरी युतीनेही चांगली लढत दिली. प्रामुख्याने तरुणाई वेगाने युतीकडे आकर्षित होत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. आता तर ‘मोदी फॅक्टर’ची जादूही असेल. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती टिकली तर तिचा आलेख अधिक उंचावण्याची शक्यता अधिक आहे.
बबनरावपाचपुतेंवर लक्ष : नगरजिल्ह्यात नगर शहर, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे, पाथर्डी-शेवगाव, कर्जत-जामखेड पारनेर असे १२ मतदारसंघ आहेत. बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, मधुकर पिचड हे विद्यमान मंत्री, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे भवितव्य या वेळी ठरणार आहे. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यात भाजपची ताकद निश्चित वाढली आहे. पाचपुतेंना मतदारसंघातच घेरण्याची सर्व व्यूहरचना शरद पवारांनी केली आहे. त्याची चुणूक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी दिसून आली आहे. पाचपुतेंचे कट्टर विरोधक असलेल्या अण्णासाहेब शेलार यांना उपाध्यक्षपद मिळवून देण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाचपुतेंच्या विरोधात काेणाला उतरवतात यावरच लढतीचे भवितव्य अवलंबून असेल. अर्थात, त्यामुळे फक्त पाचपुतेंची आघाडी कमी-जास्त होण्यापलीकडे फारसा फरक पडणार नाही.
संगमनेरमधून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. त्यांच्यासमोर कोणाला उमेदवारी द्यायची हा शिवसेनेपुढे यक्षप्रश्न असेल. याउलट स्थिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात असेल. कारण गेल्या वेळीच डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांना फेस आणला होता. त्यामुळे निसटत्या मताधिक्यावर त्यांनी मिळवलेला विजय खरे तर त्यांच्या एकेकाळी ६४ खासदार फोडून इंदिरा गांधी यांना आव्हान देणाऱ्या बाळासाहेब विखे यांच्या प्रभावाला आव्हान देणाराच होता. लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता राधाकृष्ण विखे यांना त्यांचेच एकेकाळचे सहकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची चर्चा आहे. ही जागा शिवसेनेकडे आहे. ससाणेंचा अद्याप शिवसेना प्रवेश झालेला नाही. मात्र, त्यांनी या चर्चेचा स्पष्ट इन्कारही केलेला नाही.
अकोले मतदारसंघातून मधुकर पिचड यांची स्थिती धनगर आरक्षणाला विरोध केल्याने सुधारली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेकडून पिचड यांचे राजकीय गुरू, माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव अशोक भांगरे यांचे आव्हान असू शकेल. या तालुक्यात आदिवासी ५४, मराठा २०, तर धनगर समाज आठ टक्के आहे. यांचे मतदान निर्णययक ठरते. पिचडांनी अारक्षणाला विरोध केल्याने धनगर समाजाचे मतदान त्यांच्याविरोधात जाणार आहे. तरीही महादेव कोळी समाजावर मोठा प्रभाव असल्याने आज तरी त्यांची स्थिती बरी मानली जाते. मात्र, पिचड या वेळी आपल्याऐवजी मुलगा वैभवला रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. असे झाले तर शिवसेनेचे पारडे जड होऊ शकते.
नगर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. गेल्या २५ वर्षांपासून अनिल राठोड येथील आमदार आहेत. नगर शहराची जागा काँग्रेसकडे आहे. ती तशीच राहिल्यास मंत्री थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे राष्ट्रवादीकडे गेल्यास महापौर संग्राम जगताप लढण्यास आतुर आहेत. या दोघांनीही स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला आहे.

कर्जत-जामखेड हा मतदारसंघही युतीचा बालेकिल्ला मानला जातो. गेली २० वर्षे तेथे भाजपचा आमदार आहे. विद्यमान आमदार राम शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकते. आघाडीकडेही सध्या त्यांच्याविरोधात प्रभावी उमेदवार नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. कारण कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे चार जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसे झाल्यास शिंदे यांची गोची होणार आहे.
पारनेर तालुक्यात विजय औटी दहा वर्षांपासून आमदार आहेत. नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट पारनेरला जोडलेले आहेत. या गटांत पारनेरमध्येही औटी यांच्याबाबत नाराजी आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनीच त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राज्याचे सॉलिसिटर तसेच महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, माधवराव लामखडे, काशीनाथ दाते लढण्यास उत्सुक आहेत. माधवराव लामखडे यांनी तर अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. औटींच्या विरोधात जास्त लोक उभे राहिल्यास त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाल्यास युतीची ही जागा धोक्यात असल्याचे मानले जाते.
पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले, नेवासेत शंकरराव गडाख यांना पुन्हा विजय मिळवण्यात फारशी अडचण येणार नाहीत. राहुरीत विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात या वेळी माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी नगराध्यक्षा डॉ. उषा यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जाते. तसेच नगर तालुका पंचायत समितीचे सदस्य गोविंद मोकाटे हेही रिंगणात असणार आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद असेल. तसे झाल्यास आमदार शिवाजी कर्डिले यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, तनपुरेविरोधक शिवाजीराव गाडे यांनी बंडखोरी केल्यास कर्डिले यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
कोपरगावात शिवसेनेकडून आमदार अशोक काळे यांचे सुपुत्र आशुतोष काळे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीरामपूर मतदारसंघ राखीव असल्याने येथे कोणालाच फारसा उत्साह नाही. विद्यामान आमदार भाऊसाहेब कांबळे मध्यंतरी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. नंतर ती थंडावली. त्यांच्याविरोधात निवृत्त सरकारी अधिकारी लहू कानडे उत्सुक आहेत. मात्र, कांबळे यांच्यासमोर सध्यातरी युतीकडे उमेदवार दिसत नाही.
काँग्रेसला सुंदोपसुंदी भोवणार?
काँग्रेसमध्येथोरात विखे असे दोन प्रभावी गट आहेत. त्यांच्यात कायम सुंदोपसुंदी सुरू असते. मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांना निवडणूक जड जाण्याचे मुख्य कारण हेच होते. कारण त्यांच्या मतदारसंघातील गावे संगमनेर तालुक्यातील थोरात यांच्या प्रभावाखालील आहेत. तेथे विखेंना मोठा फटका बसला होता. या वेळीही तसे घडल्यास ते निर्णायक ठरणार आहे. दोन्ही गटांचे उमेदवार जेथे असतील तेथे विरोधातील गट काम करतील. या वेळी त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.