आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar Apologies About His Statement News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'धार’दार वक्तव्याबाबत अजितदादांना पुन्हा उपरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकाजवळ आल्याने जुन्या गोष्टी उकरून काढत विरोधी पक्ष प्रचारात आपल्याविरोधात रान उठवतील, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे माफीनाम्यावर उतरले आहेत. रविवारी त्यांनी फेसबुकवर जुन्या प्रकरणांबाबत माफी मागितली. सोमवारी ते स्वतःच्या लेटरहेडवर हा माफीनामा जाहीर करणार असल्याचे समजते.
दुष्काळी परिस्थितीने राज्य होरपळत असताना धरणातील पाण्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. आता निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा तापणार आहे. तसेच त्यांच्या आणखी काही वक्तव्याचे विरोधी पक्षाकडून भांडवल केले जाणार असल्याची खात्री आता पवारांनाही पटू लागली आहे, त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
आतापर्यंत माध्यमांपासून दूर असलेल्या अजित पवार यांना यातील गांभीर्य समजले असून त्यांनी आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रविवारी पवार यांनी फेसबुकवर एक पत्र लिहिले आहे. या पत्राची सुरुवात ‘फेसबुकवरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नमस्कार, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना अनेक वेळेला कौतुक आिण टीका याची चढ-उतार होत असते. या सर्व परिक्रमेत एखादा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असा येत असतो की, एकतर तो तुम्हाला खूप आनंद देऊन जातो किंवा दुःखाच्या वेदनाही देऊन जातो. माझ्याही बाबतीत तेच घडले.’
पत्रात पुढे अजित पवार यांनी धरणातील पाण्याबाबत केलेल्या उल्लेखाबाबत म्हटले आहे की, ‘सतत २४ तास दुष्काळाबाबत उपाययोजना करीत असल्याने इंदापूर येथील सभेमध्ये पाणी प्रश्नाचा उल्लेख आल्याने माझ्या तोंडातून अपशब्द वापरले गेले. राज्याचा जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून हे मी बोलायला नको होते, याबद्दल दुमत नाही. मी जे गमतीने वा चेष्टेनेही बोलायला नको होते हे मात्र निश्चित. म्हणूनच मी त्वरित लेखी माफीनामा पाठवला. याचे प्रायश्चत्त म्हणून मी कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर पाणी घेता आत्मक्लेश केला. परंतु माध्यमांनी माझ्यावर टीका केली. अर्थात, त्यात काही चुकीचेही नव्हते,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.
पूर्वी माध्यमांमध्ये राजकीय नेत्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती होती, त्यामुळे आदरयुक्त भीती होती. मात्र आता भीतियुक्त आदर असल्याचे कार्यकर्ता म्हणून मला हा फरक जाणवतो, असे म्हणत अजित पवारांनी एक प्रकारे माध्यमांवरच आपल्या चुकांचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा हे मुद्दे उचलून विरोधक वातावरण तापवणार असणार असल्याने अजित पवार यांनी माफीनाम्याची खेळी खेळली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार सोमवारी लेटरहेडवर आपले हे पत्र जाहीर करणार आहेत.