आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Divyamarathi, Maharashtra State Election 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टार्गेट: मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार नाही, अजित पवार यांनी घेतली फारकत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली १५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असून विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी अडचण आली नाही. मात्र गेल्या तीन वर्षांपासून थेट दिल्लीवरून आलेल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत राज्याचा गाडा हाकताना राष्ट्रवादीची चांगलीच दमछाक झाली.

मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभाग या राष्ट्रवादीच्या मलईदार खात्यांना चाप लावला, तर राष्ट्रवादीची ताकद असलेल्या राज्य सहकारी बँकेसह संस्थांनाही लगाम घातला. मनाजोगता कारभार करता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची इच्छा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे स्पष्टपणे बोलून दाखवले आहे.

देवगिरी बंगल्यावर ‘दिव्य मराठी’शी बोलताना अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत मुख्यमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून गेलेले सहकारी, राज्यातील प्रश्न, राहून गेलेली कामे, अशा सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकला. थेट लोकांमधून निवडून न आलेल्या लोकांची नेहमी गोची होते, तसा प्रकार पृथ्वीराजांबाबत झाला.

त्यांना जनतेचे प्रश्न तर माहीत नव्हते, पण राज्याचाही अभ्यास नव्हता. त्यामुळे प्रत्येक फाइलकडे ते संशयाने पाहायचे. तसे कधी विलासराव देशमुखांच्या बाबतीत झाले नाही. त्यांना लोकांची नाडी ठाऊक होती. राज्य कसे पळवायचे हे ठाऊक होते. मात्र पृथ्वीराज प्रत्येक बाबतीत शंका काढत बसायचे. यामुळे फायली हलतच नव्हत्या. बाबांना धोरण ‘लकवा मारला’असे नाइलाजाने म्हणावे लागले, असे पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी अव्वलच
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील ताकद पाहता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच हा अव्वल आहे. महापालिका, ‍िजल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र असे असूनही काँग्रेसला विधानसभेच्या जादा जागा हव्या आहेत आणि हे आम्हाला मान्य नाही. आम्ही काँग्रेसपेक्षा जादा जागा मागत नाही, पण आम्हाला किमान निम्म्या जागा मिळालायला हव्या आहेत.

सातार्‍याची हालत खराब
मुख्यमंत्री सातार्‍याचे. पण त्यांनी या भागासाठीही काम केले नाही. कराडच्या रस्त्यांची हालत पाहा. भविष्याचा वेध घेऊ शकतो तो खरा राज्यकर्ता. आता दक्षिण कराडमधून मुख्यमंत्री उभे राहू इच्छितात.

पण त्यासाठी आधीपासून कामे करायला हवी होती. लोक कामे पाहूनच मतदान करतात. याशिवाय कार्यकर्त्यांनाही ताकद द्यावी लागते, असा सल्लाही पवारांनी दिला.

श्वेतपत्रिका कशासाठी?
राज्य सहकारी बँक, जलसंपदा विभागातील कामांविषयी लोकांच्या मनात मुख्यमंत्र्यांनी संशय निर्माण करून दिला. प्रशासक नेमण्यापेक्षा राज्य बँकेला आर्थिक ताकद द्या, असे आम्ही सांगत होतो. पण त्यांनी ऐकले नाही. जलसंपदाची अनियमित कामे झाली असतील तर त्यासाठी विरोधक म्हणतात म्हणून श्वेतपत्रिकाही काढण्याची गरज नव्हती, असे अजित पवारांनी नमूद केले.

जागावाटपात सन्मानजनक तोडगा हवा
काँग्रेससोबत आघाडी करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मात्र राज्यात आमचा जनाधार वाढला असल्यामुळे या वेळी आम्हाला १४४ जागा हव्या आहेत. अशी सर्वच कार्यकर्त्यांची भावना आहे. ती मी सर्वांसमोर मांडली. आता पवार साहेब काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून जागावाटपाचा सन्माननीय तोडगा काढतील, असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीवर कायम संशय
जलसंपदातील खर्च वाढला तो मोठ्या धरणांची कामे रेंगाळल्याने. हा खर्च काही वर्षातील नव्हे तर चार दशकांपासूनचा आहे. असे असतानाही आपल्या सरकारला वाचवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले. हे आघाडी धर्मासाठी योग्य नव्हते, असे परखड मतही पवारांनी मांडले.