आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Rais Toll Issue News In Divya Marathi

मुख्यमंत्र्यांमुळेच रखडले टोलनाक्यांचे प्रश्न : पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खारघरचा टोलनाक्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेता आला असता, पण मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे हा निर्णय होऊ शकलेला नाही. हीच बाब कोल्हापूरसह राज्यातील इतर टोलनाक्याची आहे. चव्हाणांमुळेच टोलनाक्यांचे प्रश्न रखडले, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे तसेच छगन भुजबळ यांच्या हाती असलेल्या खात्यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे केले होते. जलसंपदा विभागावर आपल्याला सनदी अधिकारी नियुक्त करता आला. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यावर मात्र सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यश आले नाही, याची खंत वाटते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या अप्रत्यक्ष टीकेमुळे जलसंपदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभारावर बोट ठेवल्याचे बोलले जाते. याला उत्तर म्हणून टोलनाक्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवल्याबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवले आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, खारघर टोलनाक्याचा राज्यातील ४० टक्के जनतेवर भार पडणार असल्याने एमएमआरडीए तसेच सिडकोच्या माध्यमातून तो १२०० कोटींना घेण्याचे आमचे मत होते. तसा प्रस्तावही तयार केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. राज्यातील ४० टक्के जिल्ह्यांमधील जनता खारघर टोलनाक्यावरून मुंबईत येणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याने त्यांना भुर्दंड सहन करावा लागेल. मंत्रिमंडळातील इतर सर्व सदस्य या टोलनाक्याविरोधात असताना फक्त मुख्यमंत्र्यांनी निर्णय अडवल्याने हा प्रश्न रखडल्याचा ठपका पवारांनी ठेवला.
कोल्हापूरच्या लोकांचाही टोलनाक्याला विरोध आहे. मात्र मुख्यमंत्र निर्णय घेत नसल्याने हा टोलनाक्याच्या प्रश्न रखडला. मात्र आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही १०० दिवसांत हा प्रश्न सोडवून दाखवू. तसे आम्ही कोल्हापूरमधील सभेतही स्पष्ट केले होते, असेही पवार म्हणाले.