मुंबई - जागावाटपाच्या मुद्द्यावर आधीच आक्रमक असलेल्या भाजपला विश्वासात घेता शिवसेनेने इतर घटक पक्षांना बुधवारी रात्री जागावाटपाची चुकीची माहिती दिल्याचा राग भाजप नेत्यांच्या मनात होता. त्यातच गुरुवारी दुपारी बैठक सुरू असताना भाजप इच्छुक असलेल्या मतदार संघात शिवसेनेने उमेदवार दिल्याचे यादीतून कळताच भाजप नेत्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांनी तातडीने फारकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी रात्री महादेव जानकर यांनी शिवसेना १५१, भाजप १२३ घटक पक्ष १४ जागांवर राजी झाल्याचे सांगितले. शिवसेना नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही माहिती जगजाहीर केली. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नव्हता. ते १३० जागांवरच अडून होते. दुसरीकडे, शिवसेना १५० जागांचा हट्ट सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिढा सुटत नव्हता. अशा स्थितीत शिवसेना घटक पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार करीत आहे, असा भाजपचा ग्रह झाला.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच भाजप नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. दुपारी ओम माथूर यांच्या घरी दिवाकर रावते, रामदास कदम आणि शिवसेनेचे अन्य नेते चर्चेला गेले होते. तेथे बुधवारी रात्रीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. काही जागांची अदलाबदल करून भाजप नेते अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत होते. काही वेळातच शिवसेना उमेदवारांची पहिली यादी रावतेंनी फॅक्सवरून ओम माथूर यांच्या घरी मागवून घेतली. त्यावर चर्चाही होणार होती. मात्र ही यादी पाहताच विनोद तावडे देवेंद्र फडणवीस यांचा पारा चढला. कारण ज्या जागा भाजपला हव्या होत्या, त्या जागांवर शिवसेनेने उमेदवार निश्चित केले होते. त्यातच भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी युती तुटल्याचे वक्तव्य माध्यमांसमोर केले. त्यामुळे तावडे फडणवीस तातडीने बैठक सोडून निघून गेले. या प्रकारामुळे रागावलेले रावते रामदास कदमही तातडीने बाहेर पडले आणि तेथेच युतीने अखेरचा श्वास घेतला.