आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Political Drama In Maharashtra By Pramod Chinchuwar

भ्रष्टमुक्त महाराष्ट्रासाठी मतदान करायलाच हवे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणूकही नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती केंद्रित करण्यात भाजप यशस्वी झाला. राज्य सरकारचे अपयश, घोटाळे यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपने केलेली "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ही जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली. शिवसेनेनेही लोककलांचा वापर करून अत्यंत प्रभावी जाहिराती बनवल्या. माझे नाव शिवसेना.. ही त्यांची जाहिरातही लोकांना भावली. काँग्रेसजवळ पृथ्वीराज चव्हाण हा हुकमी एक्का आहे. त्यांना केंद्रस्थानी ठेवून केली गेलेली जाहिरातही भाव खाऊन गेली. मी राष्ट्रवादी, महाराष्ट्रवादी हे राष्ट्रवादीचे गीतही लोक गुणगुणायला लागले. विजयाची खात्री असल्याने उत्साहात असलेला भाजप आणि पराभवाचे सावट दिसत असल्याने चिंतित दिसणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे राजकीय चित्र सध्या तरी पाहायला मिळते. विविध जनमत चाचण्यांनी भाजपला १२० ते १५० जागा दिल्याने निकालानंतर भाजपला सरकार स्थापण्यासाठी आपली गरजच पडली नाही तर काय, या चिंतेने सध्या शिवसेनेतही तणावाचे वातावरण आहे.
अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री चव्हाणांवर केलेले आरोप वगळता फारसा काही वाद आघाडीत झालेला दिसला नाही. मात्र शिवसेनेने जी भाषा भाजपबद्दल वापरली आणि त्याला उत्तर देताना भाजपनेही ज्या भाषेत उत्तर दिले, त्यावरून निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील, याबद्दल लोकांना शंका वाटायला लागली आहे. सत्ताधा-यांचे वस्त्रहरण करण्याऐवजी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कपडे फेडू लागले. सिंंचन घोटाळ्यावरून राज्य विधानसभेत रान उठवणारा भाजप निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा लावून धरेल, असे वाटले होते. मात्र या घोटाळ्यात सामील असलेल्या कंत्राटदाराला भाजपने आपल्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवले आणि त्याच्या मुलाला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात विधानसभेचे तिकीट दिले. त्यामुळे त्यांची बोलती बंद आहे. उद्या भाजप सत्तेत आला तर सिंचन घोटाळ्यातील ख-या दोषींना शिक्षा होणार नाही, हे तर स्पष्टच आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, या पक्षांना १५ वर्षे सत्ता भोगल्यानंतर पुन्हा का सत्ता का द्यावी, या जनतेच्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही.
काँग्रेस वगळता एकाही पक्षाकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही. भाजपने राज्यात एकही चेहरा पुढे न केल्याचा फटकाही त्यांना बसू शकतो. सभांना आकर्षित करू शकेल असा नेता व वक्ता भाजपकडे नसल्याने मोदींच्या सभांचा रतीब घातल्याने गुलाबजामून कितीही आवडत असले तरी ते खूप खाण्याची वेळ आली तर ते नकोसे होते. मोदींच्या सभेबाबत अखेरच्या टप्प्यात तेच झाले. मुंबईत महालक्ष्मी मैदानावर झालेल्या सभेत मैदान भरू शकले नाही. भाषण ऐकणा-यांमध्ये निरुत्साह जाणवत होता. मोदींच्या भाषणाला कंटाळून लोक उठून जाताना दिसत होते. गुजराती समाज एकजुटीने भाजपच्या बाजूने उभा राहील, असे वाटत असतानाच गुजराती समाजातील कच्छी, भावनगरी, जैन, व्यापारी, गैर व्यापारी असे गटतट विविध पक्ष वा उमेदवारांमध्ये विभाजित झाले. भाजपमुळेच आपल्याला विदर्भ मिळेल, असे वैदर्भीयांना वाटत असताना भाजपने जाहीरनाम्यात याचा उल्लेख न केल्याने कमालीची नाराजी आहे. याचा फटका नक्कीच बसेल.