आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Shivsena By Prashant Dixit In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाष्य - दैवाधीन शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यवस्थापक व नेता यांत फरक असतो. दोघे एकमेकांना पूरक होतात व एकमेकांविना पंगू होतात. उद्धव ठाकरे हे उत्तम व्यवस्थापक आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे अनेक धक्के खाऊनही शिवसेना जिवंत राहिली. मात्र ते कार्याध्यक्ष असताना, नेतेपदी बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेबांच्या आधारावर उद्धवांचे व्यवस्थापन उभे राहिले. आता व्यवस्थापकाला नेता व्हायचे आहे. निवडणुकीत व्यवस्थापनाची गरज असली तरी कार्यकर्ते उभे करण्यासाठी व जनतेला मतपेटीकडे आकृष्ट करण्यासाठी नेता लागतो. तरच ती जिंकता येते. मुंबईतील रेसकोर्सवरच्या सभेत असे नेतृत्व उद्धव ठाकरे दाखवितात काय याकडे लोकांचे लक्ष होते. तसे दाखविण्यात ते अपयशी ठरले असे म्हणावे लागते. युती तुटल्यामुळे मनात उठलेली व्यथा त्यांनी मोकळेपणे मांडली असली तरी जनतेमध्ये सहानुभूती उत्पन्न झाली काय याची शंका वाटते. शिवाजी महाराजांच्या कथा सांगत भावनेला हात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कथा कितीही चांगली असली तरी ती परिणामकारक होण्याकरिता कथेकरी तसा लागतो. भावनांचे राजकारण करण्यासाठी लोकांच्या हृदयाला हात घालणारा कनेक्ट लागतो. असा कनेक्ट नसेल तर भाषण बौद्धिक होते. शिवसैनिकांना बौद्धिक भाषणांची सवय नाही. शिवसैनिकांमधील जोश कमी झाल्याची कबुली अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी दिली. आता कसं मिळणार, असे रडगाणे गाऊ नका असे आवाहन त्यांनी केले. पण ते रडगाणे थांबविण्यासाठी आवश्यक तो जोश त्यांच्या भाषणात सापडला नाही. उलट रंगशारदेतील भाषणाप्रमाणे इथेही त्यांनी नशिबाला कौल लावला. नशिबात असेल तर चहावाला पंतप्रधान होतो असे सांगत त्यांनी प्रयत्नांच्या जागी दैवाला आणून बसविले. बाळासाहेब ठाकरे श्रद्धावान होते, पण दैववादी नव्हते. कठीण परिस्थितीतही शिवसैनिकांमध्ये जोश आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात होते. म्हणून त्यांचे शब्द लोकांना आधार वाटायचे. बाळासाहेबांनी लोकांना हिंदुत्वाचा आधार दिला याची आठवण मुंबईतील अमराठी व्यावसायिक काढतात असे उद्धव म्हणाले. तसा आधार उद्धवही देतील असा विश्वास आता उद्योजकांना व मराठी माणसांना वाटेल काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. उलट तसा आधार आता व्यावसायिकांना नरेंद्र मोदींमध्ये तर मराठी माणसांना कदाचित राज ठाकरे यांच्यामध्ये सापडेल. मोदींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्व व व्यवस्थापन याचा सांधा उत्तम जुळलेला आहे. निदान लोकांची तशी भावना आहे. ते कार्यकर्त्यांचे मोहोळ उठवू शकतात व कार्यक्षम कारभारही करू शकतात. कार्यकर्त्यांचे मोहोळ उठविणे आपल्या शक्तीबाहेरचे आहे हे लक्षात आल्यानेच भाषणाच्या शेवटी बाळासाहेबांचा आवाज ऐकविण्यात आला. पण त्याला म्हणावी तशी टाळी पडली नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. नेता व व्यवस्थापक यांच्यात आता झुंज लागणार आहे.