आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Tough Battle For Leading Politician In Western Maharashtra By Sanjiv Piparkar

संपादकांच्या नजरेतून... पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दिग्गजांना झुंजावे लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, आर. आर. पाटील, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, शशिकांत शिंदे अशा दिग्गजांच्या उमेदवारीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीने शिवसेना व भाजप युतीला पश्चिम महाराष्ट्रात फार वरचढ होऊ दिले नाही. आता युती तुटली आणि आघाडी फुटली. त्यामुळे चार, पाच बाजूंनी होणा-या खेचाखेचीमध्ये कोणताही पक्ष पश्चिम महाराष्ट्रावर मजबूत पकडीचा दावा करण्याच्या स्थितीत नाही. राज्यस्तरावरचे जे दिग्गज विधानसभेच्या फडात उतरले आहेत. त्यापैकी थोड्यांनाच फड जिंकण्याची हमी आहे. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील वगळता बाकीच्या दिग्गजांना शर्थीची झुंज द्यावी लागणार आहे. आर. आर. पाटील, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल आदी सर्वच नेत्यांना तगडा मुकाबला करावा लागतोय.
भाजप, शिवसेना युतीच्या २५ वर्षांच्या संसारात सत्तेची पाच वर्षे वगळता पश्चिम महाराष्ट्रातून युतीला फार काही साधता आले नाही. गावपातळीपर्यंत रुजलेल्या सहकार चळवळीमुळे काँग्रेसचीच पकड मजबूत राहिली. १९९९ मध्ये दुभंगलेल्या काँग्रेसशी लढतानाही भाजप, शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रावर पकड मिळवता आली नाही. पश्चिम महाराष्ट्रात ५८ जागांसाठी ७२१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवारांची मदार ही संघटना शक्तीपेक्षा लोकसभा निवडणुकीप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांवरच आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे दक्षिण कराड मतदारसंघातील लढतीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. १३ उमेदवारांपैकी चव्हाणांची खरी लढत आहे ती काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलासराव उंडाळकर यांच्याशी. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र यादव यांनी माघार घेतली; पण यादव यांच्या माघारीचा एक अर्थ असाही लावला जातो, उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कारवाया करण्यास मोकळे झाले. चव्हाणांनी या अगोदर खासदारकीच्या तीन निवडणुका जिंकल्या. पण १९९९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर १५ वर्षांनी ते रिंगणात उतरले. विधानसभा निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. विद्यमान आमदार उंडाळकर हे सलग सातवेळा कराड दक्षिणमधून जिंकले आहेत. मात्र आता खुद्द मुख्यमंत्रीच उभारल्यामुळे अपक्ष लढण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

पुणे जिल्ह्यात २१ जागांसाठी ३०८ उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती दिलीप वळसे- पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या लढतींनी राज्यांचे लक्ष वेधले आहे. पवार, वळसे- पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे (पुणे कॅन्टनमेंट), काँग्रेसचे विनायक निमण (शिवाजी नगर), भाजपचे बाळा भेगडे (मावळ), लक्ष्मण जगताप (चिंचवड) या सहा जागा वगळता कोणत्याही उमेदवाराला यशाचा छातीठोक दावा करण्यासारखी स्थिती नाही. हर्षवर्धन पाटील, भाजपचे आमदार गिरीश बापट या मातब्बरांनाही शर्थीने झुंजावे लागत आहे. दिलीप वळसे- पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर त्यांना यंदाची लढत थोडी त्रासदायकच होईल. महायुती तुटल्याने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला काही ठिकाणी झुकते माप मिळू शकते. त्यातच वळसे-पाटील यांचा आंबेगाव मतदारसंघ आहे. इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भारणे यांच्याशी तगडा सामना करावा लागतो आहे.

जिल्हा छोटा पण मातब्बर खूप अशा सांगली जिल्ह्यात आठ जागांसाठी १०७ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (इस्लामपूर), आर. आर. पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ) व काँग्रेसचे पतंगराव कदम (पलूस- कडेगाव) या लढतींनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रामुख्याने भाजपशी झुंजावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार हे सगळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून आयात झालेले उमेदवार आहेत. तीन दिग्गजांपैकी जयंत पाटील वगळता हमखास निवडून येतील असा दावा करण्याच्या स्थितीत आबा व पतंगराव हे दोघेही नाहीत. इस्लामपूर मतदारसंघात १३ उमेदवारांमध्ये खरी लढत आहे ती काँग्रेसचे जितेंद्र पाटील व काँग्रेस बंडखोर अभिजित पाटील यांच्यात. येथे भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. जयंतरावांच्या तुलनेत खरे तर तुल्यबळ उमेदवार नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या जयंत पाटील यांचे विरोधकांशी मैत्रीचे संबंध आहेत. आर.आर. आबांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अजित घोरपडेंशी तगडी लढत द्यावी लागतेय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घोरपडेंनी पक्षांतर केले. अशीच गोष्ट आहे ती पतंगराव कदम यांच्या पलूस- कडेगाव मतदारसंघात. येथे खरी लढत आहे ती पतंगराव व पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये. पृथ्वीराज हे देखील निवडणुका जवळ आल्यानंतर उमेदवारी देण्याच्या कबुलीवरच भाजपच्या तंबूत गेले. जिल्ह्यातील पक्षांतराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेली मंडळी जयंत पाटील यांना मानणारी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांपैकी हसन मुश्रीफ यांची कागलची जागा व सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाने सर्वाचेच लक्ष वेधले आहे. कागलमधून नऊ उमेदवार रिंगणात असले तरी मुश्रीफ यांना शिवसेनेच्या संजय घाडगे यांच्याशी झुंजावे लागतेय. कोल्हापूर दक्षिण मधील १२ उमेदवारांच्या लढतीत काँग्रेसचे सतेज पाटील यांचा खरा सामना होतोय तो भाजपच्या अमल महाडिक यांच्याशी. विशेष म्हणजे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली. पक्षीय राजकारणापेक्षा पाटील परिवार विरुद्ध महाडिक परिवार असेच या लढतीचे स्वरूप आहे. अमल हा काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा हा मुलगा. मुलगा भाजपचा उमेदवार, वडील काँग्रेसकडूनच आमदार व चुलतभाऊ धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून खासदार, असे सर्वपक्ष समभावाचे चित्र महाडिक परिवारामध्ये आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणात आहेत. पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांचा बार्शी व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य संघातील लढतीने राज्याचे लक्ष वेधले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या सोपल यांना शिवसेनेचे राजेंद्र राऊत व भाजपचे राजेंद्र मिरगणे यांच्याशी लढत द्यावी लागते आहे. काँग्रेसकडून येथे सुधीर गाढवे उभे आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील ३० उमेदवारांच्या लढतीमध्ये खरी लढत आहे. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम, सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून शिवसेनेमध्ये गेलेले माजी महापौर महेश कोठे, भाजपच्या मोहिनी पत्की व एमआयएमचे तौफिक शेख हे प्रमुख उमेदवार आहेत. येथे कमालीची बहुरंगी लढत होत आहे. मुस्लिम मते बहुसंख्य असल्याने शेख यांची उमेदवारी कोणाला उपद्रवी देते याची गणिते नेते घालत आहेत.