आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Election Constituency Latest News In Divya Marathi

उमेदवार निवडीबाबत भाजपमध्‍ये संभ्रमावस्था, आगरकरांच्या नावाला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मागील 25 ‌वर्षांपासूनची युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. नगर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे, खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत उमेदवारीबाबत संभ्रम होता.
नगर मतदारसंघ गेल्या 25 ‌वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच शहर भाजपचे उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी नगर मतदारसंघ भाजपसाठी सोडण्याची मागणी केली होती. गेल्या 25 ‌वर्षांत विद्यमान आमदार अनिल राठोड यांनी शहराचा कुठलाही विकास केला नाही, हे कारण पुढे करुन भाजपने हा मतदारसंघ मागितला होता. मागणी केली असली, तरी त्यावेळी मात्र ते अशक्य होते. गुरुवारी सेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्याने आता ते शक्य झाले आहे. युती तुटल्यानंतर भाजपने नगरमधून मोर्चेबांधणी केली आहे. सेनेचा बालेकिल्ला घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. या मतदारसंघातून बाबासाहेब वाकळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर इच्छुक आहेत. मराठा कार्डमुळे वाकळे यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. ओबीसी उमेदवार म्हणून आगरकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी प्रदेश पातळीवर जोरदार फिल्डींग लावली आहे. अल्पसंख्याक म्हणून खासदार गांधी यांचे पुत्र सुवेंद्र नगरमधून लढण्यास इच्छुक आहेत. माजी नगरसेवक िशवाजी लोंढे यांनीही जोरदार तयारी केली आहे. रात्री उशिरापर्यंत भाजपच्या उमेदवारीबाबत संभ्रम होता.
भय्या गंधे यांचा विरोध
महापालिजका निवडणुकीत प्रदेशने स्वीकृत नगरसेवकासाठी माजी नगरसेवक भय्या गंधे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, प्रदेशच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आगरकर स्वत: स्वीकृत नगरसेवक झाले. महापालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ आगकर यांच्या निष्क्रिय धोरणामुळे कमी झाले.त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी गंधे यांनी केली आहे.
बाहेरचा उमेदवार नको
भाजपच्या शहर पदाधिका-यांची बैठक शुक्रवारी झाली. पक्ष निरीक्षक विठ्ठल चाटे यांच्या अध्यक्षतेखाली शहर भाजपच्या कार्यालयात ही बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, अनंत जोशी, दामोदर बठेजा, पिटू बोरा आदी यावेळी उपस्थित होते. अन्य पक्षांतून आलेल्यांना भाजपची उमेदवारी देऊ नका, निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.