आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Election Rally,latest News In Divya Marathi

मोदींच्या सभेकडे शिवसेनेचे लक्ष, पक्षांतराच्या भीतीने संशयित नगरसेवकांवर वरिष्ठांचा "वॉच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी होत असलेली जाहीर सभा हा शिवसेनेसाठी औत्सुक्याचा विषय ठरली असून उद्याच्या सभेत कोण कोण नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतात याकडेही शिवसेनेच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, वाटेवरच्या नगरसेवकांवर कालपासूनच "वॉच' ठेवण्यात येत आहे.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रथमच जाहीर सभा होत आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मात्र, खरी अस्वस्थता पसरली आहे ती शिवसेनेत. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून या निमित्ताने खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरील रागही बाहेर आला आहे. तनवाणी यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे जगदीश सिद्ध, प्रीती तोतला व सुरेंद्र कुलकर्णी हे तीन नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून त्यांना रोखण्याचे शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हे नगरसेवक आणि आणखी इतर मोठे पदाधिकारी यांनी मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणे शिवसेनेसाठी धोकादायक ठरणार असल्याने कमीत कमी डॅमेज व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काठावरच्या आणि संशय असणा-या नगरसेवकांवर शिवसेनेतून वॉच ठेवण्यात येत आहे.
उमेदवारांना चिंता इम्पॅक्टची
पक्ष संघटनेला खिंडार पडू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मात्र मोदी यांच्या सभेचा शहरातील मतदारांवर काय परिणाम होतो याकडे लक्ष ठेवून आहेत. तिन्ही मतदारसंघांत भाजपचे हक्काचे मतदान आणि मोदींच्या तयार झालेल्या चाहत्यांचे मतदान यात वाढ झाली, तर शिवसेनेच्या जागांना धोका असल्याची भीती त्यांना वाटत आहे. मोदी उद्या काय बोलतात आणि त्यावर शहरवासीयांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाकरे उत्तर देणार
नरेंद्र मोदी यांची चार तारखेलाच सभा होऊन जाणार असल्याने नंतरच्या काळात त्यांचा प्रभाव उतरवण्यासाठी शिवसेनेला प्रयत्न करण्याची संधी मिळाली आहे. सात ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून ती सभा हे मोदींना उत्तर असेल यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मोदींच्या सभेची गर्दी आणि ठाकरेंच्या सभेची गर्दी याची तुलना व चर्चा होणार असल्याने शिवसेनेला त्या आघाडीवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.