आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख पक्षांचे निम्मे उमेदवार 'उपरे', पक्षनिष्ठा आणि नैतिकता ठेवली गुंडाळून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीत नैतिकता गुंडाळून ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी केवळ निवडून येण्याची क्षमता लक्षात घेत उमेदवारीची खिरापत वाटली. स्वत:चे बळ जोखताना इतर पक्षांतून आयात केलेल्यांना उमेदवारी देण्याची नामुष्की सर्वच पक्षांवर ओढवली. प्रमुख चारही पक्षांकडून देण्यात आलेले 45 ते 50 टक्के उमेदवार 'उपरे' आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असताना युती, तसेच आघाडीत काडीमोड झाला. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्रही बदलले. स्वबळावर निवडणूक लढवण्याची खुमखुमी पूर्ण करताना प्रमुख चारही पक्षांची उमेदवारांसाठी चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. ज्या पक्षांवर टीकेची झोड उठवली, त्याच पक्षातील इच्छुकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची नामुष्की या पक्षांवर जिल्ह्यात आली. जिल्ह्यातील बारापैकी कर्जत-जामखेड वगळता सर्वच मतदारसंघांत इतर पक्षातील आयात इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी द्यावी लागली.
एकाच वर्षात तीनदा पक्षांतर
एकाच वर्षात तीन-तीन पक्षांत प्रवेश करण्याचा विक्रम अनेकांनी जिल्ह्यात या वर्षी केला. शिवसेनेचे खासदार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूरमध्ये उभे आहेत. राहुरीतून राष्ट्रवादीकडून विविध पदे भूषवलेल्या तनपुरे कुटुंबीयांनी ऐनवेळी पक्षाची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. राहुरीत काँग्रेसने राष्ट्रवादी युवकचे अमोल जाधव यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीने काँग्रेसचे शिवाजी गाडे यांना रिंगणात उतरवले आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपद उपभोगलेल्या मोनिका राजळे यांना भाजपकडून पाथर्डी-शेवगावात उमेदवारी मिळाली आहे. मूळचे काँग्रेसचे असलेले राजीव राजळे लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीकडून त्यांनी लोकसभेची उमेदवारीही केली. आता विधानसभेसाठी त्यांनी भाजपला आपलेसे केले आहे. पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवत उमेदवारींची खैरात प्रमुख चार पक्षांकडून करण्यात आली आहे. प्रमुख चार पक्षांनी दिलेल्या "उपऱ्या' उमेदवारांचे प्रमाण जिल्ह्यात 45 टक्क्यांवर पोहोचले आहे. रिंगणात उतरवण्यासाठी उमेदवारच नसताना स्वबळाची खुमखुमी कशाला दाखवायची, असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत झाला आहे.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती -
अकोले-अशोक भांगरे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले, उमेदवारी मात्र भाजपकडून. सतीश भांगरे काँग्रेसकडून पहिल्यांदाच राजकारणात.
शिर्डी- राष्ट्रवादीच्या अभय शेळके यांना शिवसेनेकडून उमेदवारी. पक्षात सक्रिय नसलेल्या शेखर बोऱ्हाडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी.
कोपरगाव - राष्ट्रवादीच्या स्नेहलता कोल्हे यांना भाजपकडून उमेदवारी. राष्ट्रवादीकडून एकलव्य संघटनेचे अशोक गायकवाड मैदानात. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले नितीन औताडे काँग्रेसकडून रिंगणात.
संगमनेर - राष्ट्रवादीच्या जनार्दन आहेर यांना शिवसेनेची उमेदवारी.
श्रीरामपूर - काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना भाजपची उमेदवारी.
नेवासे - शिवसेनेकडून पक्षाशी संबंध नसलेल्या साहेबराव घाडगे यांना उमेदवारी. काँग्रेसच्या बाळासाहेब मुरकुटेंना पंधरा दिवसांतच भाजपची उमेदवारी.
राहुरी - राष्ट्रवादीच्या अमोल जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी. राष्ट्रवादीच्या डॉ. उषा तनपुरे शिवसेनेकडून मैदानात. काँग्रेसचे शिवाजी गाडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी.
शेवगाव-पाथर्डी - राष्ट्रवादीच्या मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी. भाजपचे बाबासाहेब ढाकणे शिवसेनेकडून मैदानात.
नगर - काँग्रेसकडून संगमनेरचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी. गेल्या वेळी बंडखोरी करणारे अ‍ॅड. अभय आगरकर भाजपकडून मैदानात.
पारनेर - शिवसेनेचे बाबासाहेब तांबे यांना भाजपची उमेदवारी.
श्रीगोंदे - काँग्रेसच्या राहुल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी. राष्ट्रवादीतून आलेल्या बबनराव पाचपुते यांना अल्पावधीच भारतीय जनता पक्षाकडून मिळाली उमेदवारी.

कार्यकर्ते 'पालखीचे भोई
वर्षानुवर्षे इमानेइतबारे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ऐनवेळी बाजूला ठेवून इतर पक्षांतील मातब्बरांना संधी देण्यात आली. कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलण्यासाठी व पक्षाचे झेंडे खांद्यावर वाहण्यासाठी वापरले जातात. ऐनवेळी पक्षात येऊन उमेदवारी मिळवायची व निवडणुकीत अपयश आले की, पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षांशी घरोबा असा प्रकार सुरू आहे. यावेळी पहिल्यांदाच चारही प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देणे सहजशक्य असताना सर्वच पक्षांनी त्यांना पालखीचे भोई बनवण्यात समाधान मानले.

डावलल्यानेही पळापळ
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपचे निष्ठावान शिवाजीराव काकडे यांना ऐनवेळी डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या मोनिका राजळे यांना पक्षाने उमेदवारी दिली. राहुरीतून राष्ट्रवादीने माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना डावलले गेले. त्यामुळे डॉ. उषा तनपुरे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. अकोल्यातून अशोक भांगरे यांना काँग्रेसने डावलल्याने ते भाजपची उमेदवारी करत आहेत. राष्ट्रवादीने शिर्डीत डॉ. राजेंद्र पिपाडा यांना डावलल्याने त्यांनी भाजपकडून प्रयत्न केले. मात्र, तिथेही त्यांची डाळ न शिजल्याने ते अपक्ष रिंगणात आहेत. कोपगावात राष्ट्रवादीच्याच स्नेहलता कोल्हे भाजपकडून रिंगणात आहेत.

आता मतदारांनीच त्यांना जाब विचारायला हवा...
उमेदवारीचे निकष जाहीर करण्याची मागणी आम्ही केली होती. निकष तर दूरच, राजकीय नीतिमत्ता गुंडाळून ठेवणारे वर्तन सर्व पक्षांनी केले. कोलांटउड्या मारून स्वत:ची पदे कायम ठेवण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. पक्षाची तत्त्वे बासनात बांधून कोणत्याही प्रकारे निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी हा निकष पाळण्यात आल्याचे दिसते. मतदारांना गृहीत धरणाच्‍या राजकीय पक्षांची मस्ती उतरवण्यासाठी मतदारांनीच त्यांना जाब विचारायला हवा. अ‍ॅड.श्याम आसावा, सामाजिक कार्यकर्ते.