आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन मंत्र्यांसह आघाडीचे विद्यमान आमदार गॅसवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती आणि आघाडी करण्याबाबत शिवसेना-भारतीय जनता पक्ष व काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत असले, तरी जागावाटपाबाबत अजून एकमत झालेले नाही. अनेकांचे प्रचाराचे घोडे युती-आघाडीवर अडले होते. मंगळवारी जागावाटपाबाबत सेना-भाजपमध्ये एकमत झाल्याने हा तिढा सुटला असला, तरी पक्षाने उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. आघाडीबाबत संभ्रम असल्याने जिल्ह्यातील तीन विद्यमान मंत्र्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत होणा-या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असली, तरी अजून कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार निश्चित केलेले नाहीत. शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले असून त्यांच्या जिल्ह्यातील तीन आमदारांची उमेदवारी निश्चित आहे. हा अपवाद वगळता सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. शिवसेना, भाजप यांच्यात युती करण्याबाबत एकमत झाले असले, तरी जागावाटपाबाबत मात्र एकमत होत नसल्याने कार्यकर्ते व पदाधिका-यांमध्‍ये अस्वस्थता होती. त्यात घटकपक्षांचा समावेशातून महायुतीचे त्रांगडे अजूनही कायम आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी सेना-भाजप युतीचा तिढा सुटला आहे. आता जागावाटपाला आणखी किती दिवस लागतात याकडे लक्ष लागले आहे.
आघाडीचे जागावाटपाचे घोडे मात्र अजूनही अडलेले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करण्याबाबत ठाम असले, तरी जागावाटपाबाबत मात्र त्यांच्यात एकमत झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार गॅसवर आहेत. बारा विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात आहेत. अकोले मतदारसंघातून विद्यमान मंत्री मधुकर पिचड यांनी मुलगा वैभवसाठी उमेदवारी मिळण्याचे प्रयत्न चालवले आहेत. संगमनेरमधून काँग्रेसचे विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात, शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे, नेवासे मतदारसंघातून शंकरराव गडाख व शेवगाव मतदारसंघातून चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असली, तरी अद्याप तशी घोषणा न झाल्याने हे सर्व आमदार अद्याप प्रचारात सक्रीय झालेले नाहीत. श्रीगोंदे मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ आता भाजपकडे गेला आहे. राहुरी, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड, कोपरगाव हे चार मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदारसंघांत विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. सेना-भाजपच्या विद्यमान आमदारांनी उमेदवारी पक्की म्हणून प्रचार सुरू केला आहे.

मोदी लाटेचा धसका
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट केवळ प्रसारमाध्यमात आहे, असे ठणकावून सांगणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता मोदी लाट असल्याचे मान्य करत असले, तरी त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार नसल्याचे सांगण्यासही ते विसरत नाहीत. मोदी लाटेचा फायदा विधानसभेत होईल, अशी भाजपला अपेक्षा आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, नेवासे, श्रीरामपूर, शेवगाव-पाथर्डी हे मतदारसंघ मोदी लाटेपुढे टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. थोरात, विखे व पिचड या तीन मंत्र्यांनीही मोदी लाटेचा धसका घेतला आहे.
युतीच्या घोषणेने अनेकांचा जीव पडला भांड्यात
शिवसेना व भाजपत युती होणार का, या विवंचनेत असलेल्या नगर शहर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा जीव मंगळवारी भांड्यात पडला. युतीसंदर्भात गेल्या आठवडाभरापासून दोन्ही पक्षांकडून झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांबरोबरच युतीच्या हितचिंतकांचा जीव टांगणीला लागला होता. युतीच्या घोषणेने संबंधितांनी मंगळवारी दुपारी एकदाचा सुटकेचा नि:श्वास सोडला.