आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी व्हावी, अन्यथा खरे नाही; युतीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची गेल्या २५ वर्षांची युती अभेद्यच राहील हे मंगळवारी दुपारी जवळपास स्पष्ट झाले आणि आता आपलीही आघाडी व्हावी; अन्यथा काही खरे नाही, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून उमटल्या.
'अब अपनी आघाडी होनी चाहिए, वरना कुछ सच्चा नहीं' याच शब्दांत भडकल गेट येथे एका कार्यकर्त्याने आपली भावना व्यक्त केली. असे असले तरी काँग्रेसचे पदाधिकारी अजूनही काही बोलायला तयार नाहीत. काय व्हायचे ते दिल्ली, मुंबईतच ठरणार, तोवर आम्ही काय बोलणार, असा त्यांचा सवाल होता.
युती झाली नाही तर आघाडीही होणार नाही, अशी चर्चा स्थानिक गोटात होती. त्यामुळे या मंडळींचे डोळे जेवढे आघाडीच्या मतभेदांकडे लागले होते, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्यात युतीबद्दल होती. कारण स्पष्ट आहे, युती झाली नाही तर काँग्रेस आघाडीची सत्ता कायम राहण्याची शक्यता त्यांना जास्त वाटत होती. सरकारवर नाराजी असली तरी युती दुभंगल्याचा फायदा अजूनही काँग्रेसला होईल, असा विश्वास या मंडळींना होता. त्यामुळेच आघाडीचे काय होईल ते नंतर पाहता येईल, आधी युतीचे समोर यायला हवे, असे या मंडळींना आतापर्यंत जाणवत असल्याचे कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून या वेळी दिसून आले. युतीच्या जागावाटपावर सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब झाले असले तरी ते होऊ नये, असे अनेकांनी बोलून दाखवले. कारण दुपारचा प्रस्ताव एखाद्या बाजूने फेटाळला जाईल अन् काम फत्ते होईल, असा विश्वासही सायंकाळपर्यंत अनेकांना होता. मात्र, आता युती झाली तशीच आघाडीही व्हावी अशी इच्छा सर्वच व्यक्त करत होते. युती झाली अन् आघाडी झाली नाही, तर शहरातील एकही जागा पक्षाला जिंकता येणार नाही, असा अंदाजही यातील काहींचा आहे. त्यामुळे युती झाली, तर त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीही हवीच, असे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
नेते अन् कार्यकर्तेही टीव्हीसमोर
सकाळी युतीची बैठक सुरू असताना आणि त्यांची बैठक संपल्यानंतर काँग्रेस आघाडीचे काय होते, हे जाणून घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते टीव्हीसमोर बसून अपडेट घेताना दिसून आले. काही जण तर जाफर गेट, टिळक पथ येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांत बसून अपडेट होण्याबरोबरच चर्चेत मग्न होते. व्हॉट्सअ‍ॅपवरून संदेश साधत होते.
काही हिरमुसलेही
युती व आघाडी झाली नाही, तर काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांतून लढण्याची संधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होती. तसेच गणित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे संभाव्य उमेदवार समर्थकांना युती झाल्याचा फारसा आनंद झाला नाही. युती झाली म्हणजे आघाडी होईल आणि आपल्या युवा नेत्याची आमदार होण्याची संधी जाईल, अशीही भावना कार्यकर्त्यांत दिसून आली.