आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती-आघाडीत येणार बंडखोरीला ऊत; मराठा, मुस्लिम, बंजारा, समाजाची मते निर्णायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- बहुरंगी लढतीमुळे कन्नड मतदारसंघ या वेळी पिंजून निघणार आहे. विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव व राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत, नामदेव पवार यांच्यात या वेळी लढत होण्याची शक्यता आहे. अपक्षांची संख्या वाढल्यास प्रमुख उमेदवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
कन्नड विधानसभा क्षेत्राचे प्रामुख्याने काळीभुई, घाटमाथा, खान्देश पट्टा असे विभाजन आहे. घाटमाथ्यावरून हर्षवर्धन जाधव हे उमेदवार असतात तर इतर भागात एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरतात. या तालुक्यात मराठा, मुस्लिम, बंजारा, वंजारी, माळी आदी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हाच मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतो. किंबहुना जातीच्या समीकरणावर येथे उमेदवार निवडले जातात. विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव गेल्या वेळी मनसेमधून निवडून आले होते. सध्या ते शिवसेनेत दाखल झाले असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
त्यांनी काही ठिकाणी विकासकामे केली आहेत, परंतु रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. विकासाच्या मुद्द्यापलीकडे जाऊन ही निवडणूक होत असल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत सज्ज आहेत. २००४ व २००९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजपूत उभे होते. दोन्ही वेळेस त्यांचा निसटता पराभव झाला. तरी त्यांनी या वेळी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
दोन्ही वेळा ही जागा कॉँग्रेसला सुटली परंतु त्यांचा पराभव झाल्याने या वेळी या जागेवर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, त्यांच्या पक्षातून लढणा-यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. शिवसेनेकडून आमदार हर्षवर्धन जाधव यांची दावेदारी प्रबळ मानली जाते.आपली उमेदवारी नक्की समजून त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील एक गट त्यांच्यावर नाराज आहे. त्याचा फटका विधानसभेत बसू शकतो. कॉँग्रेसकडून माजी आमदार नामदेवराव पवार यांनीही शिवसेनेचा त्याग केल्यापासून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. तर कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल सोनावणे यांनीही तयारी केली आहे. आघाडीत ही जागा कुठल्या पक्षाला सुटते व कुणास उमेदवारी मिळते, यावरच या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
मनसेचे सुभाष पाटील यांनीही या वर्षभरापासून तालुकाभर विविध कार्यक्रम घेऊन आपले मनसुबे व्यक्त केले आहेत. नुकतेच त्यांनी तालुक्यात खासगी साखर कारखाना सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांची उमेदवारी मनसेकडून प्रबळ मानली जात असली तरीही स्वपक्षातून सर्जेराव काळे, रेखा पाटे, मनीषा कुलकर्णी, नितीन पाटील खंडागळे यांचे त्यांच्यापुढे आव्हान राहील. समता परिषदेचे डॉ. संजय गव्हाणे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पाठबळ लाभले आहे. तालुक्यात त्यांनी विविध कार्यक्रम घेऊन निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला आहे. या शिवाय महारू राठोड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. एकूणच कन्नड विधानसभा निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. युती- आघाडीत बंडोखोरीला ऊत येणार असून जातीय समीकरणे उमेदवाराचे भवितव्य ठरवणार आहेत.