आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्ये आघाडीत बंडखोरी अटळ; पक्षांतर्गत विरोधही कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिवसेनेचे आमदार अनिल राठोड वगळता इतर पक्षांचे उमेदवार अजून निश्चत झालेले नाहीत. उमेदवारी गृहित धरून अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या पाहता गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही आघाडीत बंडखोरी अटळ आहे. आघाडी होते किंवा नाही याचाही सोक्षमोक्ष अद्याप लागलेला नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले, तरीही पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना संबंधितांना करावाच लागणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीकडून दररोज टोकाची वक्तव्ये होत आहेत. त्यामुळे आघाडी होणार की नाही, याचा अंदाज घेण्यातच इच्छुकांचा अधिक वेळ जात आहे. नगरची जागा गेल्यावेळी काँग्रेसकडे होती. यावेळीही ही जागा काँग्रेसकडे राहावी, यासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या शहर-जिल्हा कमिटीने प्रयत्न केले. मात्र, आश्वासनाशिवाय अद्याप या पदाधिका-यांच्या हाती काहीही आलेले नाही. त्यातच राष्ट्रवादीकडून नगरसह कर्जत-जामखेड मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी ही मागणी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना नगरची जागा सोडण्यास हरकत नसल्याचे सांगताना दक्षिणेत काँग्रेसला दोन जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे सांगितले होते.
शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार राठोड प्रचाराला लागले आहेत. मात्र, आघाडी व मनसेकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. असे असताना महापौर संग्राम जगताप व राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही नगर शहराला "स्मार्ट सिटी' बनवायचा नारा देत प्रचाराला वेग देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मनसेकडून वसंत लोढा यांनी कंबर कसली असून बैठका व प्रचारात ते व्यग्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून तांबे यांची थेट राहुल गांधी यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नगरची जागा सहजासहजी राष्ट्रवादीच्या पारड्यात जाण्याबाबत साशंकता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हवाला देऊन महापौर जगताप कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचाराचा धडाका लावला असून त्यांची निवडणुकीतून माघार अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील किरण काळे यांनीही स्वतंत्रपणे नगरकरांच्या भेटी घेत प्रचारात उडी घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आघाडीत बंडखोरी अटळ आहे.
थोरातांचे दुसरे भाचे
काँग्रेसचे सत्यजित तांबे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मंत्री थोरात यांचे भाचे राजीव राजळे निवडणुकीच्या मैदानात होते. मोदी लाटेत त्यांना पराभव पत्करावा लागला. सध्या ते भाजपच्या संपर्कात असून घरात उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. तांबे यांच्या निमित्ताने नगरकरांसमोर यावर्षी दुसऱ्यांदा मंत्री थोरात यांचे भाचे नगरकरांसमोर येणार आहेत.

युतीतही सुंदोपसुंदी
भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी लोंढे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेत सुरू झालेली सुंदोपसुंदी अजूनही कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीतही युतीतील मतभेद प्रकर्षाने समोर आले होते. ही खदखद बाहेर काढण्यासाठी भाजपकडून आघाडीचे उमेदवार, बंडखोर अथवा आपल्यातीलच बंडखोराला बळ देण्याचे काम होऊ शकते.