आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीच्या काडीमोडाने संपूर्ण समीकरणे बदलली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने या मतदारसंघातील शिवसेनेच्या दावेदारांचे धाबे दणाणले आहेत. शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिकिटासाठी स्पर्धा सुरू असून ऐनवेळी आमदार बंब यांनी टाकलेल्या बॉम्बगोळ्याने शिवसेनेच्या पदाधिका लगोलग मुंबई गाठून याबाबत विचारणा केली; पण महायुती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर आता मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.
भाजपने गंगापूरमधून बंब यांना तिकीट देण्याचे खात्रीशीर आश्वासन दिले. त्यानंतरच त्यांनी पक्षप्रवेश केल्याने महायुतीच्या बाबतीत भाजप डबलगेम खेळत असून घटकपक्षांना चर्चेच्या नावाखाली झुलवत ठेवून स्वतंत्र लढण्याचा इरादा असल्याची चर्चा तालुक्यात होती. विधानसभा निवडणुकीत गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असण्याची शक्यता असली, तरी आमदार बंब, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व महायुती किंवा शिवसेनेचा उमेदवार या तिघांमध्येच प्रमुख लढत होईल. प्रबळ विरोधकाच्या मतदानाची मतविभागणी करण्यासाठी जास्तीत जास्त डमी उमेदवार उभे करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तुम्ही निवडणुकीला उभे राहा, तुमचा सर्व खर्च आम्ही सांभाळतो, अशी आश्वासने या उमेदवारांना दिली जात आहेत.
गंगापूर-खुलताबाद हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. १९६२ पासून अकरा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये ७ वेळेस काँग्रेस विचारधारेचे उमेदवार विजयी झाले. तीन वेळेस शिवसेनेला संधी मिळाली. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून काँग्रेस आघाडीकडून तिकीट वाटपातील गोंधळात झालेल्या बंडखोरीमुळे मतविभागणीचा फायदा दहा वर्षे शिवसेनेला व मागील निवडणुकीत आ. बंब यांना अपक्ष म्हणून निवडून येण्यास झाला. निवडणुकीच्या तोंडावर मंदिर, मशीद व धार्मिक कार्यक्रमांना जास्तीत जास्त वर्गणी देणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे युवा पिढी धावताना दिसत आहे. अनेक इच्छुक अपक्ष उमेदवार त्याचाच कित्ता गिरवत आहेत. मात्र, या वेळी त्याचा प्रत्यक्ष मतदानावर किती प्रभाव पडेल हे नक्की नसले तरी अधिकृत पक्षांच्या उमेदवारांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे. तालुक्यातील सर्वच विरोधकांकडून विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना टार्गेट केले जात आहे. गत पाच वर्षांच्या कार्यकाळात आश्वासने व स्वप्ने दाखवण्यापलीकडे काही केले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदार बंब यांच्याकडून जायकवाडी पाणी प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्यासारख्या विषयाचे भांडवल केले जाताना दिसत आहे.
डमी उमेदवारांना रसद पुरवठा : गंगापूर व खुलताबाद दोन्ही तालुक्यांत काही उमेदवाराकडून प्रबळ विरोधकाला मिळणाऱ्या मताची विभागणी करण्यासाठी आपल्याला गैरसोयीच्या असलेल्या समाजाचे विविध सर्कलमध्ये डमी उमेदवार उभे करून त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. मराठा व माळी समाजाच्या मतांची जास्तीत जास्त विभागणी कशी होईल, यादृष्टीने अनेकांना उभे राहण्याबाबत विचारणा होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी - काँग्रेसतर्फे कृष्णा पाटील डोणगावकर यांचे नाव आघाडीवर असून वैजापूर व कन्नडच्या मतदारसंघात बदल झाल्यास काँग्रेसतर्फे किरण पाटील डोणगावकर यांची उमेदवारीसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेतर्फे संतोष माने, माजी आमदार अण्णासाहेब माने, अंबादास दानवे, दिनेश मुथा यांची नावे चर्चेत आहेत. मनसेतर्फे दिलीप बनकर, राष्ट्रवादीतर्फे डॉ. ज्ञानेश्वर नीळ, काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, जगन्नाथ खोसरे यांचीदेखील नावे चर्चेत असून अपक्षांमध्ये सर्जेराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी आमदार प्रशांत बंब, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी व शिवसेना या तिघांमध्येच खरी लढत रंगणार हे निश्चित मानले जाते.

आमदारकीचा इतिहास
१९६२ यमाजीराव सातपुते-काँग्रेस
१९६७व १९७२ दोन पंचवार्षिक- बाळासाहेब पवार-काँग्रेस
१९७८ लक्ष्मणराव मनाळ- काँग्रेस
१९८० अशोक पाटील डोणगावकर-काँग्रेस
१९८५ किसनराव कसाने-एस. काँग्रेस
१९९० कैलास पाटील-शिवसेना
१९९५ अशोक पाटील डोणगावकर-अपक्ष
१९९९ अण्णासाहेब माने- शिवसेना
२००४ अण्णासाहेब माने-शिवसेना,
२००९ प्रशांत बंब-अपक्ष.