आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय कोलांटउड्यांचा फ्रायडे, अस्तित्व सिद्ध करण्याची उमेदवारांना नामी संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीची युती तुटल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे युती, आघाडीकडून उमेदवारीची संधी नसलेल्या अनेकांना राजकीय पटलावर स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली आहे.
या संधीचे सोने करण्यासाठी त्यांच्या या पक्षातून दुस-या पक्षात कोलांटउड्या घेत अर्जही दाखल केले, तर काहींनी उडी चुकण्याची शक्यता वाटताच मूळ ठिकाणी जाण्यासाठी धावाधाव केली. तीन दिवसांपूर्वी युती आणि आघाडी टिकण्याचे संकेत होते. त्यामुळे ठरावीक दावेदारांच्याच गळ्यात माळ पडणार, असे चित्र होते. म्हणून काही जणांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन बंडखोरीची तयारी केली होती. मात्र, काल घडलेल्या घडामोडींमुळे परिस्थिती बदलली. बंडखोरांनी अधिकृत उमेदवारीसाठी तयारी केली. दुसरीकडे एका
पक्षातून दुस-यात जाण्याचीही स्पर्धा सुरू झाली.

शिवसेना ते भाजप व्हाया मनसे, किशनचंद तनवाणी
शिवसेनेचे शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, महापौर, आमदार अशी अनेक पदे उपभोगलेल्या तनवाणींना शिवसेनेकडून औरंगाबाद मध्यची उमेदवारी हवी होती. निकराचे प्रयत्न करूनही उमेदवारीची माळ प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यात पडणार असे लक्षात आल्यावर त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली. तसेच व्हाया मनसे भाजपमध्ये दाखल होण्याची मोर्चेबांधणीही केली. काल युती तुटताच भाजप नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
भाजप ते भाजप व्हाया अपक्ष, मधुकर सावंत
मधुकर सावंत यांना भाजपने औरंगाबाद पश्चिममधून उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येते. ते दोनदा भाजप आणि तिसऱ्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेत काँग्रेस आघाडीला समर्थन देऊन चार वर्षांपासून ते औरंगाबाद पश्चिममधून अपक्ष म्हणूनच लढण्याची तयारी करत होते. युती तुटताच त्यांच्याशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला. त्यांनी आज अपक्ष तसेच भाजपकडूनही अर्ज दाखल केला. ते भाजपकडूनच लढण्याची शक्यता आहे.
एमआयएम व्हाया राष्ट्रवादी, गंगाधर गाडे
मंगळवारी माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांना औरंगाबाद पश्चिममधून एमआयएमची उमेदवारी जाहीर झाली. काल आमखास मैदानावर अकबरुद्दीन ओवेसींच्या सभेलाही ते हजर होते. मात्र, आज सकाळी ओवेसींच्या पत्रकार परिषदेत ते दिसले नाही. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल नॉट रिचेबल होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्रीपासून त्यांची राष्ट्रवादीशी बोलणी सुरू झाली. मात्र, आधी एमआयएम आणि नंतर आम्ही असे कसे चालणार, असा मुद्दा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित केल्याने त्यांनी पुन्हा एमआयएमकडे मोर्चा वळवला. दुपारी चार वाजता ते रिचेबल झाले. शनिवारी ते अर्ज दाखल करणार आहेत.

मनसे, शिवसेना...पुढे काय?, हर्षवर्धन जाधव
जाधव यांनी २००९ मध्ये कन्नड मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढवली. त्याच वेळी ते नेमके किती महिने मनसेत राहणार, असा प्रश्न विचारला जात होता. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन घुसल्यावरून त्यांना पोलिसांनी जबर मारहाण केली. त्याविरुद्ध पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी फारसा आक्रमक पवित्रा घेतला नाही. त्यामुळे जाधव अस्वस्थ झाले होते. तेव्हाच मनसेतून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता होती. शिवाय मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेणेही जाधव यांना शक्य झाले नाही. अखेर त्यांनी शिवसेनेत उडी घेतली. भाजपचे जालना जिल्ह्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जाधव यांचे सासरे आहेत. त्यामुळे ते आता भाजपकडून लढणार असल्याची चर्चा आहे.
भाजप ते भाजप व्हाया अपक्ष, प्रशांत बंब
बंब २००२ ते २००७ भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी भाजपला जय श्रीराम करत गंगापूर विधानसभेची निवडणूक लढवली. िवजयी झाल्यावर त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा होता. मात्र, आताच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी आधी शिवसेना व नंतर भाजपशी संपर्क साधला. शिवसेनेत उमेदवारीची साठमारी असल्याचे लक्षात आल्यावर भाजपची निवड केली.