आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन, राठोड, जगताप व आगरकरांचा अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- उमेदवारी दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर असल्याने चार दिवसांनंतर नगर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असले, तरी नगर मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे मात्र निश्चित झाले आहे.
गुरुवारपासून (२५ सप्टेंबर) प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. जागा जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीकडून महापौर संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) काँग्रेसकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला. शनिवारी पुन्हा राठोड यांनी जोरदार तर, जगताप यांनीही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनीही अर्ज दाखल केला. गेल्या २५ वर्षांपासून नगर हा शिवसेनेचा बालेिकल्ला राहिला आहे. यंदा प्रथमच या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांसह भाजपबरोबर लढत द्यावी लागणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा मंत्री थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनात भाजपचे पदािधकारी भय्या गंधे यांनी सहभाग घेऊन भाजपला खुलेआम आव्हान दिले आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ढोलताशांचा गजर, डौलाने फडकणारे झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मिरवणूक आहे की विजयी जल्लोष आहे, हेच कळत नव्हते. सकाळी दहा वाजेपासून तहसील कार्यालय व परिसरात पोिलसांचा कडकोट बंदोबस्त होता. त्यामुळे तहसीलला छावणीचे स्वरूप आले होते.
आगरकरांचे स्मितहास्य
भाजपकडून अभय आगरकर यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आगरकर तहसीलमधून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी आगरकर समोर दिसताच "अनिल भय्या शेर है काही सब भंगार है,' अशा घोषणा दिल्या. या घोषणा सुरू असताना आगरकरांनी शिवसैनिकांकडे पहात स्मितहास्य केले.
विरोधकांची लायकी नाही
माझ्यावर फसवेगिरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांची पात्रता नाही. मी त्यांच्याबाबत काय बोलू. लोक मतदानातून काय आहे, ते दाखवून देतील, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल राठोड यांनी दिली. संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, अनिल बोरुडे, दत्ता मुदगल, विक्रम राठोड, संजय चोपडा, भाजपचे भय्या गंधे उपस्थित होते.
"सेटलमेंट'चे राजकारण करणारा नाही
गुंडगिरी व फसवेगिरीला नगरकर १५ ऑक्टोबरला मुक्त करणार आहेत. मी सेटलमेंटचे राजकारण करणारा नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार आगरकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली. राज्यातही भाजप सरकार आणण्यासाठी नागरिक भाजपलाच मतदान करतील, असे खासदार गांधी म्हणाले.
भाजपचे निष्ठावान राठोड यांच्यामागे
भाजपने अ‍ॅड. अभय आगरकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज आहेत. हे सर्व नाराज निष्ठावंत शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल राठोड यांच्या मागेच उभे राहणार आहेत. ते उप-या व अनेक पक्ष फिरून आलेल्या आगरकरांना मतदान करणार नाहीत.'' भय्या गंधे, वरिष्ठ कार्यकर्ते, भाजप.