आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

राष्ट्रवादीकडून नव्या दमाचे बारा शिलेदार, अकोलेतून वैभव पिचड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-आघाडीच्या फारकतीचा निर्णय उशिरा झाल्याने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बारा शिलेदारांची यादी राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ धूत यांनी जाहीर केली. यादीनुसार बहुतांश नव्या उमेदवारांना संधी मिळाली आहे.

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने फारकत घेतली. निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यास विलंब झाल्याने सक्षम उमेदवारांची यादी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जाहीर झाली.
आव्हाने वाढली
जिल्ह्यात सर्वाधिक ३२ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. तसेच पक्षाची ताकतही वाढल्याचा दावा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार केला जात आहे. या जोरावर विधानसभेत जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीला मिळतील, असा विश्वास पक्षाला आहे. तथापि काँग्रेसने फारकत घेतल्याने राष्ट्रवादीसमोरची आव्हाने वाढली आहेत. पक्षाने धाडसी निर्णय घेत, पक्षातील निष्ठावान व ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्याऐवजी शिवाजी गाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उषा तनपुरे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन, विधानसभा रिंगणात उडी घेतली आहे. राहुरी मतदारसंघात तनपुरे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी घड्याळाला बाजूला करून धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघातील मतेही विभागली जाण्याची शक्यता आहे.
प्रचारात आघाडी
राष्ट्रवादीने संयम ठेऊन नव्या दमाच्या बारा शिलेदारांना रिंगणात उतरवले आहे. उमेदवारांची यादी उशिरा जाहीर झाली असली, तरी नगरचे उमेदवार महापौर संग्राम जगताप, राहुरीचे शिवाजी गाडे, नेवासे मतदारसंघातील शंकरराव गडाख, श्रीगोंदे येथील राहुल जगताप, पारनेरचे सुजित झावरे यांनी यापूर्वीच प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे यादी जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी, प्रचारात आघाडी असल्याचे उमेदवारांकडून सांगितले जात आहे. श्रीगोंदे मतदारसंघात मागील निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार बबनराव पाचपुते यांनी विजय मिळवला होता. पण त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपशी घरोबा केला. त्यामुळे या मतदारसंघात जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच पाचपुते यांची बंडखोरी पक्षाच्या जिव्हारी लागल्याने याच मतदारसंघात जगताप यांना बळ देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही कंबर कसली आहे.
नेवासे मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखा-जोखा मतदारांसमोर मांडला आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीच्यावेळी विठ्ठल लंघे विरुद्ध गडाख अशी लढत रंगली होती. पण लंघे यांनाच आता गडाखांनी जवळ केल्याने या मतदारसंघात गडाखांची पकड मजबूत झाली आहे. पारनेर मतदारसंघात सुजित झावरे यांनी उडी घेतली असून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.
निष्ठावान व तरुणाईला संधी
अकोले मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री मधुकर पिचड विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना संधी मिळाली आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. हक्कांच्या मताच्या जोरावर घुले यांना शेवगावचा गड सहज सर होईल, असा विश्वास आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघ आघाडीच्या कालावधीत काँग्रेसकडे राखीव होता, पण स्वबळावर लढवण्याचे ठरल्याने या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे निष्ठावान व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके यांना संधी मिळाली आहे.

विद्यमान आमदारांबरोबरच राष्ट्रवादीने तरुण चेहरा समोर ठेवला आहे. त्याबरोबरच ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे. एकूणच राष्ट्रवादीने निष्ठावानांबरोबरच तरुणाईला संधी दिल्याचे या यादीवरून दिसून येते.

मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीचे उमेदवार
अकोले - वैभव पिचड, संगमनेर - आबासाहेब थोरात, श्रीरामपूर - सुनीता गायकवाड, कोपरगाव - अशोक गायकवाड, राहाता- शेखर बोऱ्हाडे, नेवासे - शंकरराव गडाख, राहुरी - शिवाजी गाडे, शेवगाव-पाथर्डी - चंद्रशेखर घुले, नगर शहर - संग्राम जगताप, पारनेर - सुजित झावरे, श्रीगोंदे - राहुल जगताप, कर्जत - जामखेड - राजेंद्र फाळके.