नगर- जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत सर्वच पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आघाडी व युतीत फाटाफूट झाल्याने प्रचारासाठी कार्यकर्ते जमा करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. याचा फायदा घेत काही जणांनी भाडोत्री कार्यकर्ते उपलब्ध करून देण्याचा धंदाच सुरू केला आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुकादम सक्रिय झाले होते. हे मुकादम भाडोत्री कार्यकर्त्यांचा रोज ठरवून आवश्यकतेनुसार कार्यकर्त्यांचा पुरवठा करत. त्या वेळी आघाडी व युती शाबूत असल्याने पक्षांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने कमीत कमी भाडोत्री कार्यकर्ते घेऊन प्रचार केला जात होता; पण विधानसभा निवडणुकीत आघाडी व युतीमध्ये घटस्फोट झाला. त्यामुळे पारपंरिक पद्धतीने प्रचारात सक्रिय होणाऱ्या कार्यकर्त्यांची ताटातूट झाली. त्याबरोबरच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर लहान-मोठ्या पक्षांनीही स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे कार्यकर्ते अपुरे पडत असून शक्तिप्रदर्शन करताना उमेदवारांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महापालिकेप्रमाणेच भाडोत्री कार्यकर्ते पुरवणारे मुकादम सक्रीय झाले आहेत. मागणी जास्त असल्याने रोजंदारीत कमालीची वाढ झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यात मुकादमासह भाडोत्री कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ झाली. आता रात्रीच्या जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. काही उमेदवारांनी जवळच्या विश्वासू कार्यकर्त्यांकडे त्याचे नियोजन सोपवले आहे. 29 सप्टेंबरला छाननी होऊन 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू असेल. या काळात बेहिशेबी पैशांचा मठा धुराळा उडणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
भाडोत्री कार्यकर्त्यांना 200 ते 500 रुपये रोज
भाडोत्री कार्यकर्त्यांना सध्या मुकादमाकडून 200 ते 300 रुपये रोज दिला जातो. मोटारसायकल असलेला कार्यकर्ता असेल, तर पेट्रोलच्या खर्चासह 500 रुपयांपर्यंत भाव फुटला आहे. अशा वाहनधारक कार्यकर्त्यांचा वापर विविध उमेदवारांच्या प्रचारफेरीसाठी केला जातो. तथापि, यासंदर्भात गोपनीयता बाळगली जाते. जमलेली गर्दी उत्स्फूर्त असल्याचे भासवले जाते.