आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी, गांधी, ठाकरे, पवार स्टार प्रचारक; प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अर्जांची आज छाननी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असून, या सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जिल्ह्यात येणार आहेत.
नगर मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, भाजपकडून अभय आगरकर, तर काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. अकोलेत सतीश भांगरे (काँग्रेस), वैभव पिचड (राष्ट्रवादी), मधुकर तळपाडे (शिवसेना) व अशोक भांगरे (भाजप) यांच्यात लढत आहे. संगमनेरमध्ये मंत्री बा‌ळासाहेब थोरात (काँग्रेस), आबासाहेब थोरात (राष्ट्रवादी), राजेंद्र चौधरी (भाजप) व जनार्दन आहेर (शिवसेना) उभे असले, तरी खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादीतच होईल. श्रीरामपूरमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सुनीता गायकवाड (राष्ट्रवादी), लहू कानडे (शिवसेना) व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (भाजप) यांच्यात लढत आहे. नेवाशात आमदार शंकरराव गडाख (राष्ट्रवादी), दिलीप वाकचौरे (काँग्रेस), साहेबराव घाडगे (शिवसेना) व भाऊसाहेब मुरकुटे (भाजप) यांच्यात लढत आहे. शेवगावमध्ये आमदार चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी), मोनिका राजळे (भाजप), अजय रक्ताटे (काँग्रेस) व बाबासाहेब ढाकणे (शिवसेना) यांच्यात सामना आहे. राहुरीत आमदार शिवाजी कर्डिले (भाजप), अमोल जाधव (काँग्रेस), शिवाजी गाडे (राष्ट्रवादी) व उषा तनपुरे (शिवसेना) यांच्यात लढाई आहे. पारनेरमध्ये आमदार विजय औटी (शिवसेना), बाबासाहेब तांबे (भाजप), सुजित झावरे (राष्ट्रवादी) व शिवाजी जाधव (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते (भाजप), शशिकांत गाडे (शिवसेना), राहुल जगताप (राष्ट्रवादी), हेमंत उगले (काँग्रेस), बाळासाहेब नाहाटा (रासप) यांच्यात लढत आहे. कर्जतमध्ये आमदार राम शिंदे (भाजप), रमेश खाडे (शिवसेना), राजेंद्र फाळके (राष्ट्रवादी) व किरण पाटील (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे (काँग्रेस), शेखर बोराडे (राष्ट्रवादी), अभय शेळके (िशवसेना) व राजेंद्र गोंदकर (भाजप) यांच्यात लढत आहे. कोपरगावमध्ये आशुतोष काळे (शिवसेना), नितीन औताडे (काँग्रेस), अशोक गायकवाड (राष्ट्रवादी) व स्नेहलता कोल्हे (भाजप) यांच्यात लढत आहे. दस-याच्या मुहूर्तावर सर्वच पक्षांच्या सभांना सुरुवात होणार आहे.

भाजपच्या प्रचाराला मोदी
भाजप पदाधिकारी व उमेदवारांनी पंतप्रधान मोदी यांची सभा घेण्याचा प्रदेश पातळीवर आग्रह धरला आहे. राज्यात मोदींच्या २५ सभा होणार आहेत. मोदी यांची जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्याही सभा होतील.
राहुल गांधींची सभा
प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आणण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. राहुल गांधींच्या सभेसाठी प्रयत्न सुरू असून तशी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याही सभा होणार आहेत.

उद्धव व आदित्य ठाकरे शिवसेनेचे स्टार प्रचारक
शिवसेनेने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनेकांनी अगोदरच प्रचाराला सुरुवात केली होती. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, रामदास कदम, अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह अन्य नेते प्रचारासाठी येणार आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी शरद पवार व अजित पवार
राष्ट्रवादीची नगर, संगमनेर, श्रीगोंद्यासह अन्य मतदारसंघांत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते येणार आहेत. अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ व सुप्रिया सुळे यांच्या सभा होतील. या प्रमुख नेत्यांबरोबरच अन्य नेत्यांच्याही सभा प्रत्येक मतदारसंघात होणार आहेत.