आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती तुटल्याने धाकधूक कायम, शिवसेनेच्या बैठकीत संघटना रिचार्ज करण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजप सोबतची युती तुटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी सर्व उमेदवार व पदाधिका-यांची बैठक घेऊन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत हर्षवर्धन जाधव, महापौर कला ओझा यांनी पक्षसंघटनेकडून हवी ती साथ मिळत नसल्याची तक्रार केली.
दोन दिवसांपूर्वी युती तुटली आणि शिवसेनेत अस्वस्थता पसरली. शिवसेनेकडून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ मतदारसंघांत शिवसेनेने उमेदवार उभे केले असले तरी काही उमेदवारांच्या मनात युती तुटल्याने धाकधूक दिसून त्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यात पुन्हा पक्षांतर्गत नाराजीचा फटकाही बसण्याची भीतीही काही उमेदवारांना वाटत आहे. या बैठकीला प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, कला ओझा, अंबादास दानवे, संदिपान भुमरे, राजेंद्र ठोंबरे, हर्षवर्धन जाधव हे उमेदवार हजर होते.

जाधवांना घेरले शंकेने :
या बैठकीत बोलताना जाधव यांनी आपली धाकधूक सर्वांसमोर मांडली. पक्षातील लोक आपल्याला मदत करीत नाहीत ही त्यांची तक्रार होती. केडर ही शिवसेनेची ताकद असल्याने त्यांनी उमेदवारांना मदत केली तर निश्चित जिंकता येईल हे सांगताना मात्र काही लोक पक्षाऐवजी माणूस पाहून काम करतात ते चुकीचे आहे असे म्हटले. महापौर कला ओझा यांचे नाव खुद्द उद्धव ठाकरे यांनी फायनल केल्याचे खासदार खैरे यांनी या वेळी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान, राष्ट्रवादीचे विश्वनाथ स्वामी व कार्यकर्त्यांनी तसेच राजू खरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रीती आमची धाकटी बहीण
किशनचंद तनवाणी यांनी भाजपची कास धरल्याने शिवसेनेचे पदाधिकारी संभ्रमात आहेत. तनवाणी समर्थकांनी बैठकीला येण्याची तसदी घेतली नाही. पण त्यांचीही बिकट अवस्था झाली आहे. तनवाणी समर्थक, गुलमंडीच्या नगरसेविका प्रीती तोतला आजच्या बैठकीला हजर होत्या. एरवी त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते, पण आज खैरे यांनी आमची बहीण आहे ती, असे सांगत तोतला यांचा भाषणात आवर्जून उल्लेख केला.
लूज टॉकिंग बंद करा
उपस्थितांच्या आणि बाहेरच्या कुरबुरींची दखल खैरे यांनी आपल्या भाषणात घेतली. जाधवांच्या तक्रारीवर ते काही बोलले नाहीत, पण उद्धव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी काम करावे व विजय मिळवून द्यावा, असे आवाहन केले. "कोण कोणाबाबत काय बोलते ते मला माहीत आहे. आता लूज टॉकिंग बंद करा. सर्वांशी चांगले बोला, गोड बोला. शिरसाट, महापौर तुम्ही हे लक्षात घ्या' असे विधान त्यांनी केले.