आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांचा लागणार कस, युती तुटल्याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- आघाडी-युती तुटल्याने पैठण तालुक्यात बहुरंगी लढत होत आहे. उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता संपर्क, पक्षकार्य, एकगठ्ठा मत, जातीय समीकरणे, नात्यांचा गोतावळा यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

पैठणमधून शिवसेनेतर्फे माजी आमदार संदिपान भुमरे यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या विरोधी गटातील इच्छुकांनीही अर्ज दाखल केले. पैठणमध्ये भाजपचा फारसा प्रभाव नसल्याने भाजपला या ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा आहे. मात्र, सेनेच्या विजयात भाजप मतदारांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. तर यंदादेखील मनसेतर्फे डॉ. सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार आहे. डॉ. शिंदेंना मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदादेखील 24 हजारांपेक्षा अधिक मते मिळवण्यात यश येते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय डॉ. शिंदेंवर ते केवळ निवडणुकांपुरतेच बाहेर येत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापतिपद आणि नुकतीच हातात आलेली पंचायत समिती पाहता त्यांची बाजू यंदा तरी भक्कम िदसत आहे. पैठण तालुक्यात काँग्रेसचे जे काही पुढारी आहेत ते सर्वजण औरंगाबाद येथून नेतेगिरी करणारे, लोकांशी नाळ नसणारे व निवडणुका आल्या की समोर येणारे, यात्रा-जत्रातून नेतेगिरी करणारे आहेत. आघाडी तुटताच पैठण विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद सदस्य रामनाथ चोरमले, विनोद तांबे, बाबासाहेब पवार, रवींद्र काळे आदी नेते गुडघ्याला बाशिंग बाधून तयार झाले, तर काहींनी अर्जदेखील दाखल केले आहेत. मात्र, गावपातळीवर काँग्रेसची कार्यकर्ता फळी भक्कम नसल्याने काँग्रेसची पंचायत झाली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोपही राष्ट्रवादीकडून केला जात आहे, तर आघाडीत बिघाडी झाल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाघचौरे विकासकामाच्या जोरावर मतदान मागणार आहेत.
नात्यागोत्यांवर उमेदवारांचे भवितव्य
येथे मराठा, धनगर, दलित, मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. मराठा मतदार हा काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचा आहे. धनगर समाज हा शिवसेना, राष्ट्रवादीकडे झुकलेला दिसतो. दलितांचे मतदान काँग्रेस, राष्ट्रवादीकडे आहे. मुस्लिम समाज तालुक्यात काँग्रेसवर विश्वास ठेवत नसल्याचे चित्र पालिका निवडणुकीत दिसल्याने हा वर्ग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. या जातीय समीकरणांबरोबरच नात्यागोत्यांचा जिव्हाळादेखील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. या शिवाय अपक्ष उमेदवारांवरदेखील बरेच गणित अवलंबून राहील. रामनाथ चोरमले, बाबासाहेब पवार, सुरेखा जाधव हे जिल्हा परिषद सदस्य प्रमुख अपक्ष म्हणून लढणार असून या व्यतिरिक्तदेखील अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.