आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीत इच्छुक जास्त; आघाडीत उमेदवार ठरेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- या मतदारसंघात प्रमुख पक्षांबरोबरच विविध पक्षांच्या इच्छुकांची यादी वाढली आहे. शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. वाणी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत इच्छुकांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी मिळवण्यात ताकद खर्च करावी लागत आहे. यानंतर प्रत्यक्ष लढतीत विजयाचे समीकरण गाठण्याचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पार करावा लागणार आहे.

सेनेने चौथ्यांदा आमदार आर. एम. वाणी यांना निवडणुकीच्या फडात उतरवले आहे. हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पोषक म्हणून ओळखला जातो. १९९९ पासून मतदारसंघाची समीकरणे आघाडीत बिघाडी होत असल्याने पूर्णपणे बदलली आहेत. वाणी यांनी १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. १५ वर्षांपासून मतदारसंघावर वाणींचे एकहाती वर्चस्व आहे. आमदार वाणी यांच्याव्यतिरिक्त पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठी इच्छुक होते, परंतु वाणींना पक्षनेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार इच्छा नसतानाही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करावी लागल्यामुळे सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे पाच वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. वाणींच्या उमेदवारी निश्चितीमुळे त्यांचा हिरमोड झाला.

युतीचा काडीमोड झाल्याची परिस्थिती अनेक वर्षांपासून मतदारसंघात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी शहरात ह्यअब की बार..भाजप आमदार,' असे होर्डिंग्ज झळकावून सेनेसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. यासाठी दोघांच्याही मुंबई वाऱ्या सुरू आहेत. डॉ. परदेशी यांनी काँग्रेसकडून एकदा, तर धाकट्या चिकटगावकरांनी दोन वेळा विधानसभा अपक्ष लढवली; परंतु त्यांचा पराभव झाला.
यंदाही दोघे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, चिकटगावकरांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का आहे. मागील निवडणुकीत ते केवळ १२२५ मतांनी पराभूत होऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर डॉ. परदेशी यांना तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चिकटगावकर यांच्याकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व नगरपालिका ताब्यात आहेत. थोरले बंधू माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांच्याशी झालेली दिलजमाई ही त्यांच्या जमेची बाजू मानली जात आहे. शहरी भागात डॉ. परदेशी यांनी नेत्यांचा जम्बो फौजफाटा घेऊन जोरदार फील्डिंग लावली आहे. मनसेकडून जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सदाफळ व तालुका सचिव कल्याण दांगोडे यांच्या चढाओढीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे. के.जाधव यांनीही मनसेच्या उमेदवारीसाठी फील्डिंग लावल्याने मनसेत दोघांत तिसरा इच्छुक वाढला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव हे शेतकरी कामगार पक्षातर्फे रिंगणात आहेत.