जळगाव- विधानसभा निवडणुकीत आमदार ‘रीपिट’ करण्याचा इतिहास असलेल्या शिंदखेडा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. वास्तविक आघाडीत जागा कोणाकडे, हे अद्याप स्पष्ट नाही. जागा कोणालाही सुटली तरी बंडखोरी होणारच, असे चित्र मात्र स्पष्ट दिसतेय. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिस-याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांच्या चक्रव्युहात भाजपचे जयकुमार रावळ खरंच ‘इतिहास' घडवतात का? हे महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील शिंदखेडा हा एकमेव तालुका असा आहे की, या मतदारसंघातून एकदा निवडून आलेला अमदार सलग विजयी होत नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहता मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दोंडायचाकडील जोडली गेलेली ५४ गावे तसेच साक्री तालुक्यातील १९ गावे कोणाला कोण देतात, यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे. सध्या भाजपकडून आमदार जयकुमार रावल यांना उमेदवारी निश्चित असून राष्ट्रवादीकडून संदीप बेडसे यांचे तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचे नाव चर्चेत आहे. बेडसे रावळ यांनी प्रचारात आघाडी घेतली असून काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ यंदा राष्ट्रवादीकडे जाईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे समर्थक व्यक्त करताय. विद्यमान आमदार रावळ हे प्रत्येक गावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकानेच उमेदवारी केल्यास रावळ यांना थोडे अडचणीचे ठरू शकते. मात्र, सनेर किंवा बेडसे यांच्यापैकी एकानेही बंडखोरी केल्यास त्याचा फायदा रावळ यांना मिळण्याचा दावा राजकीय पदाधिकारी करीत आहेत. दोडायचामधील रावळ देशमुख ग्रुपदेखील राजकीय आखाड्यासाठी तयारीला लागला आहे. यात गुप्त बैठकांवर भर दिला जातोय. गेल्या निवडणुकीत ५१ हजारांनी पराभव झालेले श्यामकांत सनेर यांनी दोंडायचा नगरपालिकेत उमेदवार उभे केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत नाराजी आहे. नाराजांचे मन वळवण्याचा प्रयत्न माजी डॉ.हेमंतकुमार देशमुख करीत आहेत. सनेर बेडसे यांच्यापैकी एकानेच उमेदवारी करावी, यासाठी स्वत: डॉ. देशमुख प्रयत्नशील असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.