आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास प्रकल्प दर्डांनी नव्हे, विलासरावांनी आणले, माजी खासदार उत्तमसिंह पवार यांचे दर्डांवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कर्करोग रुग्णालय, डीएमआयसी, विभागीय क्रीडा संकुल आणि विमानतळाचा विकास तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला. त्या कामांच्या श्रेयासाठी माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा धडपड करत आहेत, असा आरोप पूर्व चे अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी केला. काँग्रेससह सर्वच पक्ष भ्रष्ट असून आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले.

निवडणूक तयारीसाठी कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली, त्या वेळी त्यांनी आपण मराठवाडा विकास मंचच्या वतीने लढत असल्याचे सांगितले. दर्डा यांच्यावर शरसंधान करताना ते म्हणाले, शहरातील विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी दर्डा नेहमी तयार राहतात. विमानतळाचे नूतनीकरण आपणच केल्याचा त्यांचा आविर्भाव असून तेथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असल्याचा दावाही ते करत आहेत. मात्र, वर्षातून एकदाच हजशिवाय इतर कुठलेही आंतरराष्ट्रीय विमान येथून जात नसल्याचे पवार यांनी म्हटले. काँग्रेससह सर्वच पक्षांनी विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळेच आपण अपक्ष लढून जनतेचे समर्थन मागत आहोत. काँग्रेस पक्ष सोडला, पण गांधीवादी विचारसरणी सोडली नसून सामाजिक कार्यकर्ता म्हणून सतत जनतेची कामे केली आहेत. ४० हजारांपेक्षा अधिक जणांना आपण नोकरी दिली, तर १४० गरीब विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवले आहे. राष्ट्रवादीकडून आपल्याला विचारण्यात आले होते, मात्र आपण त्यांना सविनय नकार दिला. मतदारसंघातील सर्व युवकांनी प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आहे. दर्डा यांनी सत्तेचा वापर स्वत:साठी केला, त्याउलट आपण मात्र खासदार असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्याचा दावा त्यांनी केला.