आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतविभाजनावर ठरेल उमेदवाराचे भवितव्य, शहरातील 65 हजार मतदारांची फुलंब्रीत निर्णायक भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपातील आठ प्रभागांचा समावेश असलेल्या फुलंब्री मतदारसंघात शहरी भागातील 65 हजार मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. खरी लढत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच होण्याची शक्यता आहे.

फुलंब्री मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पूर्वी याचे औरंगाबाद पूर्व असे नाव होते. फुलंब्रीमध्ये औरंगाबाद तालुका, शहरातील काही भाग, फुलंब्री तालुका, सिल्लोड तालुक्यातील काही गावे येतात. औरंगाबाद तालुक्यातील 42 गावे पैठण मतदारसंघाला जोडल्याने मतदारसंघातील निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत.
काँग्रेस-भाजपत चुरस
या मतदारसंघाचे राजकारण दोन पक्षांभोवतीच फिरते. मतविभाजनाच्या जोरावर बागडेंनी चारदा विजय मिळवला. बागडे 1985 ते 2004 पर्यंत निवडून आले. 1985 मध्ये काँग्रेसतर्फे सुधाकर सोनवणे रिंगणात होते. या वेळी कचरू जाधव, अंबादास जाधव या काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केली. 1990 मध्ये काँग्रेसने अ‍ॅड. त्र्यंबकराव शिरसाट यांना उमेदवारी दिली तेव्हा जनता दलाचे श्रीराम लगड व मराठवाडा शिवसेनेचे दत्ताभाऊ पाथ्रीकर उभे होते. दोघांनी काँग्रेसचीच मते घेतली. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे पार्वतीबाई शिरसाट यांच्याविरुद्ध काँग्रेसचे केशवराव औताडे, नामदेवराव गाडेकर यांनी बंडखोरी करून 50 हजार मते घेतली. भाजपचे रामभाऊ गावंडे, त्र्यंबक सुलाने यांनीही बंडखोरी केली. परंतु भाजपच्या मतदानात फारसे विभाजन करू शकले नाहीत. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने बागडे विजयी झाले. 2004 मध्ये डॉ. कल्याण काळे काँग्रेसतर्फे विजयी झाले. 2009 मध्ये भाजपच्या मतांचे विभाजन झाले. राष्ट्रवादी बंडखोर माळी समाजाचे नेते व फुलंब्रीचे सरपंच सुहास शिरसाट यांनी 18 हजारांवर मते घेतली. 2009 च्या निवडणुकीत भाजपची परंपरागत व्होट बँक असलेल्या राजपूत समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे काळे 2200 मतांनी विजयी झाले.
यंदा तिरंगी लढत
विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे व राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांच्यातच खरी लढत होणार आहे. लोकसभेच्या 2004 व 2009 मधील निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे (१२०००) व भाजपचे रावसाहेब दानवे (14000) यांना मताधिक्य होते. परंतु दोन्ही वेळेस विधानसभेला मात्र डॉ. कल्याण काळे विजयी झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला दानवे यांना 30 हजारांवर मताधिक्य फुलंब्रीतून आहे. या वेळी काँग्रेसचे नामदेव गाडेकर, शिवाजी पाथ्रीकर व राष्ट्रवादीचे सुहास शिरसाट भाजपमध्ये दाखल झाले. डॉ. काळे यांनी मतदारसंघात दोनशे कोटींवर निधी खर्च केला. दहा वर्षांत फुलंब्री मतदारसंघाचा कानाकोपरा त्यांनी समजून घेतला. राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली. मागील तीन वर्षांपासून अजित पवार यांच्या सूचनेवरून निवडणुकीची तयारी सुरू केल्याने त्यांना विविध विभागांमार्फत निधी फुलंब्री मतदारसंघात मिळाला. शिवसेनेतर्फे जि. प. चे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोबरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भास्कर गाडेकर रिंगणात आहेत.