आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांच्या लोकप्रियतेच्या लाटेतही भाजपची विजयी घोडदौड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागांवरून रस्सीखेच सुरू असणार्‍या महायुतीत जादा जागा पटकावण्यासाठी धडपड करणार्‍या भाजपची आजपर्यंतची विजयाची संख्या (स्ट्राइक रेट) शिवसेनेच्या तुलनेत नेहमीच जास्त असल्याचे आजवरच्या आकडेवारीवरून दिसते. २००९ मध्ये लढवलेल्या एकूण जागांपैकी भाजपने सुमारे ३९ टक्के जागांवर विजय मिळवला तर शिवसेना केवळ २७ टक्के जागाच जिंकू शकली. आजवर विजय मिळवता आलेल्या या दोन्ही पक्षांच्या जागांच्या संख्येचा विचार करता यातही शिवसेनेचीच कामगिरी ढिसाळ दिसते. शिवसेना आजवर ६५ जागांवर कधीच विजय मिळवू शकली नाही तर भाजपलाही २७ जागांवर कधीही विजय मिळवता आलेला नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ३३ उमेदवारांची अनमात रक्कमही जप्त झाली होती.
१९९० ते २००९ या दोन दशकांच्या काळात झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर आजवर भाजपचा स्ट्राइक रेट शिवसेनेपेक्षा ते १३ टक्के अधिकच राहिला असल्याचे आकडेवारी सांगते.
१९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रयता शिखरावर असताना आणि तत्कालीन शरद पवार सरकारविरुद्ध कमालीचा आक्रोश असतानाही भाजपचा ‘स्ट्राइक रेट’ हा शिवसेनेपेक्षा १३ टक्क्यांनी अधिकच होता. १९९० आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपचा स्ट्राइक रेट शिवसेनेपेक्षा तब्बल १२ टक्क्यांनी जास्त होता. २००४ च्या निवडणुकीत भाजपचा हा रेट १० टक्क्यांनी तर १९९९च्या निवडणुकीत तो सहा टक्क्यांनी अधिक होता. २००९ मध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातील जागा या शेकापसारखे मित्रपक्ष आणि विवेक पंडित यांच्यासारख्या काही पुरस्कृत अपक्ष आमदारांना सोडल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने प्रत्यक्ष १६० जागा तर भाजपने ११९ जागा लढल्या. त्यापैकी ४६ जागा जिंकून भाजपने पहिल्यांदा विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडून हिरावून घेतले. मनसेची लाट तेव्हा मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये असल्याने शिवसेनेला जबर फटका बसला आणि १९९० पासून आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी अर्थात केवळ ४४ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते, तरीही भाजपने शिवसेनेपेक्षा ४० जागा कमी लढूनही दोन जागा जास्तच जिंकल्या होत्या.
२७ विरुद्ध ६५?
१९९०ते २००४ च्या विधानसभा निवडणुकीतील वाटप झालेल्या जागा आणि त्यावर दोन्ही पक्षांचा झालेला पराभव पाहिला तर आजवर २७ जागांवर भाजप तर ६५ जागांवर शिवसेना कधीही जिंकू शकली नाही. त्यामुळेच या जिंकलेल्या जागांच्या अदलाबदलीवरूनच वाद पेटला आहे. २००९ मध्ये राज्यात विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली. त्या वेळच्या निकालानुसार शिवसेना ७३ जागांवर तर भाजप ५१ जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होता.
किती वाढणार जागा?
२००९मध्ये शिवसेनेला १६९ तर भाजपला ११९ जागा देण्यात आल्या होत्या. २००४ च्या तुलनेत शिवसेनेने भाजपला तेव्हा जागा वाढवून दिल्या होत्या. १९९९ च्या निवडणुकीत भाजपने ११७ तर २००४ मध्ये १११ जागांवरच निवडणूक लढली होती. २००९ मध्ये जागा वाढवून घेण्यात यशस्वी झालेला भाजप आता नेमक्या किती अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्ट्राइक रेट (टक्क्यांमध्ये)
२००९, २००४ १९९९ १९९५ १९९०
भाजप ३९ ४८ ४८ ५६ ४०
शिवसेना २७ ३८ ४२ ४३ २८