आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या २०, शिवसेनेच्या १७ आमदारांना फुटला घाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीचे बंध तुटल्याने महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्याची भाषा करणाऱ्या या दोन्ही पक्षांनी आता स्वबळावर मैदान मारण्याचा चंग बांधला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सत्ताधारी ‘मित्रां’नीही काडीमोड घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता चार प्रबळ राजकीय पक्षांचे शिलेदार आमने-सामने उभे ठाकले आहेत.. मात्र एकूणच लढतीचे आणि उमेदवारांच्या विजयाचे चित्र सध्या तरी अस्पष्ट दिसते. कारण मागील विधानसभा निवडणुकीत (२००९) युतीच्या बळावर लढल्यानंतरसुद्धा भाजपच्या २० तर शिवसेनेच्या १७ उमेदवारांना दरदरून घाम फुटला होता. संबंधित ९५ टक्के उमेदवारांना पाच हजारांपेक्षाही कमी मते मिळाली होती. काही तर हरता हरता जिंकले होते.
मागील निवडणुकीत २४ अपक्ष आमदार विजयी झाले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या बड्या पक्षांना पाणी पाजून विजयश्री खेचली होती, तर ३५ अपक्षांनी विजयी उमेदवारांना चांगलाच घाम फोडत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. राज्यात सर्वात कमी मतांनी विजयी झालेला उमेदवार म्हणजे कणकवलीतील भाजपचे प्रमोद जठार. काँग्रेसचे रवींद्र पाठक यांच्याशी अटीतटीची लढत देणाऱ्या जठार यांना केवळ ३४ मते जास्त मिळाली आणि ते विजयी झाले. दिंडोरीतील शिवसेनेचे धनराज महाले यांना राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांच्यापेक्षा केवळ १४९ मते अधिक मिळाली होती. जठार आणि महाले हे काठावर पास झालेले आमदार ठरले.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघातून लढलेले भाजपचे डॉ. खुशाल बोपचे यांनाही राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ६२३ मते जास्त मिळाली होती, तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणामधून जिंकलेले भाजपचे विजय घोडमारे हेही राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार रमेश बंग यांच्यापेक्षा केवळ ७०० अधिकची मते मिळवू शकले. त्यामुळे या निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना काही मतदारसंघांत चांगलाच घाम फुटण्याची शक्यता आहे.
भाजप : सर्वात कमी मतांनी विजयी आमदार
१. प्रमोद झठार, कणकवली (३४)
२. डाॅ. खुशाल बोपचे, तिरोडा (६२३)
३. विजय घोडमारे, हिंगणा (७००)
४.सिद्रमप्पा पाटील, अक्कलकोट (१३८५)
५. संजय कुटे, जळगाव (जामोद) (४०४७)
शिवसेना : सर्वात कमी मतांनी विजयी आमदार
१. धनराज महाले, दिंडोरे (१४९)
२. प्रताप सरनाईक, ओव्हाळा माजीवाडा (९०४)
३. संजय गावंडे, अकोट (९६५)
४. आर. एम. वाणी, वैजापूर (१२२५)
५. अशोक शिंदे, हिंगणघाट (१४२१)