आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Benifited In Maharashtra Politics News In Divya Marathi

ANALYSIS - महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेच्या वाटेवर, भाजप मात्र फायद्यात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातीलसर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने १९ ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. १९९९ प्रमाणे एकमेकांविरुद्ध लढून जसे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष हे सत्तास्थापनेसाठी एकत्र आले तसे भाजप-शिवसेनाही एकत्र येऊ शकतात. राज्यात पंचरंगी निवडणूक होणार असल्याने विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला निर्णायक बहुमत मिळणे कठीणच आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा प्रवास आता राजकीय अस्थिरतेच्या दिशेने सुरू झाला, असेच म्हणावे लागेल.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४६ तर शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या होत्या. भाजप ५१ जागी तर शिवसेना ७३ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. याचा अर्थ भाजपला विजयाची दाट शक्यता असलेल्या ९७ मतदारसंघात (विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या जागा यांची बेरीज) तर शिवसेनेला ११७ जागांवर विजयाची संधी आहे. या सर्व जागांवर आपली ताकद केंद्रित करून विजय मिळविण्याचा प्रयत्न हे पक्ष करतील. आघाडीचा विचार केला तर काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ६१ जागांवर तर राष्ट्रवादीने ४३ जागांवर दुसरा क्रमांक मिळवला होता. याचा अर्थ काँग्रेस १४३ जागांवर तर राष्ट्रवादी १०५ जागांवर विजयासाठी सारी ताकद पणाला लावेल.
जड झाले ओझे
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आता प्रादेशिक पक्षांचे ओझे जड झाले आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी पद्धतशीरपणे ठरवून राष्ट्रवादी- शिवसेनेला दूर सारले. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष किमान १०० जागा जिंकण्याचे ध्येय ठेवू शकतात. केंद्रात यूपीए सरकार असताना देशभरात काँग्रेसविरोधी तीव्र लाट असली तरी राज्यात मात्र राष्ट्रवादीविरोधी लाट तीव्र आहे. राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री हे गंभीर घोटाळ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्याने काँग्रेसला लाभ होऊ शकतो. गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीकडे असल्याने मुस्लिम आणि दलित समुदायात या पक्षाबद्दल नाराजी आहे. दलित अत्याचार असोत की अतिरेकी ठरवून निरपराध मुस्लिम तरुणांना तुरुंगात डांबण्याबद्दल ही नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची कामगिरी उत्तम राहू शकते.
भाजप-मनसे युती?
केंद्रातील मोदी सरकार, राज्यात अजूनही प्रभावी असलेला मोदी फॅक्टर आणि शिवसेनेपेक्षा आजवर जादा जागा जिंकणारा स्ट्राइक रेट असलेली हे सारे मुद्दे लक्षात घेता या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. अर्थात याचा अर्थ ते स्वबळावर सत्तेत येतील, असे नाही. मनसेसोबत भाजप छुपा समझोता करू शकते आणि अनेक मतदारसंघांमध्ये भाजप- मनसे एकमेकाला मदत करू शकतात. पैसा आणि व्यूहरचना करण्यातही भाजप शिवसेनेपेक्षा सरस ठरेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे, भाजप राष्ट्रवादीत छुपी युती असण्याची शक्यता शिवसेना काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तवली आहे. त्यातही कितपत तथ्य आहे हे लवकरच राज्यातील जनतेसमोर येणार आहे.