आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आक्रमक प्रचारावरच भाजप नेत्यांचा भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेच्या प्रचारात फक्त मोदी नामाचा गरज करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. महायुती संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेवर सरशी साधण्यासाठी भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केलेल्या नियोजनात मोदींच्या किमान पंधरा सभा आयोजित करण्याचा निर्णय शनिवारी अमित शहांबरोबरच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपने प्रचारात "मोदी ब्रँड'चा अधिकाधिक वापर करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी मुंबईत आल्यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करत दिवसभर राज्यातल्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला आणि प्रचाराचे नियोजन केले. राज्यात प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे भाजपचा जोर कमी आहे, त्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जास्त सभा लावून वातावरणनिर्मिती करण्याची रणनीती आखण्यात आली असून मोदींच्या राज्यात किमान १५ ते कमाल २५ सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच भाजपला आता रिपाइंनेही पाठिंबा दिल्याने भाजपच्या मित्रपक्षांची संख्या चार इतकी झाली आहे. भाजपने एकूण २५७ जागांवर आपले उमेदवार उभे केले असून मित्रपक्षांना ३१ जागा देण्यात आल्याचेही ते म्हणाले. महायुती तुटण्यापूर्वी मोदी जास्तीत जास्त ५ सभा घेतील असे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेची साथ सुटल्यानंतर राज्यात आक्रमक प्रचाराची गरज लक्षात घेऊन मोदींच्या सभा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच केंद्रातील जवळपास डझनभर मंत्री राज्यात तळ ठोकून बसणार असून लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही सोशल मीडियाचा आक्रमक वापर करण्याचे भाजपने ठरवले आहे.
शिवसेनेवर थेट टीका टाळा
महायुती जरी तुटली असली तरी आगामी विधानसभेच्या प्रचारात शिवसेनेवर थेट टीका टाळण्याच्या सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी गरज लागल्यास शिवसेनेची मदत होऊ शकते हे लक्षात घेऊन या सूचना देण्यात आल्याचे कळते.