औरंगाबाद - महाराष्ट्र पुढे गेला तरच देश पुढे जाईल. दिल्लीत मी काम करतोच आहे, महाराष्ट्रालाही पूर्ण शक्तिनिशी पुढे नेईन. पण दिल्लीतून पाठवलेल्या पैशातून इथे विकास साधायचा असेल तर दुसऱ्याची सत्ता देऊन फाटक बंद करून ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. मी छोट्या कुटुंबातून आलो असून छोट्या-छोट्या लोकांसाठी मोठे काम करायचे आहे. सर्वांना सोबत घेत देश मोठा करायचा आहे. मी तुमच्यासाठीच समर्पित आहे; पण तुम्ही युतीच्या ग्रहयोगातून बाहेर पडा, असे सांगत मोदींनी एका अर्थाने भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील १४ उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी गरवारे क्रीडा संकुलावर मोदींची प्रचारसभा झाली. त्याआधी बीड येथे, तर नंतर मुंबईतही मोदींची जाहीर सभा झाली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आक्रमक शैलीत टीका करताना मोदी म्हणाले, मागील पंधरा वर्षांत राज्यातील सरकारने महाराष्ट्राला ‘बरबाद’ केले. ज्यांनी राज्याचे वाटोळे केले, त्यांना आता तुम्ही पुन्हा निवडून देणार का..? असे प्रश्न विचारत मोदी यांनी लोकांना सभेतच बोलते केले. एकतर्फी भाषण करून मोदींनी टाळ्या मिळवण्याऐवजी दुहेरी संवाद साधत लोकांकडून सकारात्मक प्रतिसादही घेतला.
मराठीतच मोदींनी केली सुरुवात... : मंचावर बसलेले भाजपचे वरिष्ठ नेते, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व उमेदवार मराठवाड्याच्या पावनभूमीला मी वंदन करतो. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांना नमन करतो. स्वामी रामानंद तीर्थ यांची पूण्यभूमी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांना मी आदरांजली अर्पण करतो. निवडणूक अभियानाची सुरुवात मी बीड जिल्ह्यातून केली. आमदार कोण बनेल..? याऐवजी महाराष्ट्र कसा बनेल, राज्याचे भाग्य कोण बदलणार...? असा सवाल उपस्थित केल्यानंतर मोदींनी मोठा पॉज घेतला. त्यानंतर उपस्थित जनसमूदायाने उत्स्फूर्तपणे मोदी... मोदी... मोदी असा जयघोष सुरू केला. मग प्रत्युत्तरादाखल मोदी म्हणाले, मी तर जनतेचा सेवक आहे. राज्याचे भाग्य तुम्ही बदलणार आहात..! अशी साद मोदी यांनी उपस्थितांना घातली.
१२५ दिवसांतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा
१. पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी केले
२. वित्तीय तूट भरून काढली,
३. महागाई कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न,
४. भ्रष्टाचार संपवण्यासाठी एसआयटीची स्थापना,
५. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ५ कोटी खाते उघडली,
६. त्यासाठी ३ हजार कोटींचे अनुदान दिले,
७. कैलास मानसरोवरला जाण्यासाठी चीनला सांगून सुरक्षित रस्ता मिळवला,
८. किमान कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला,
९. डेंग्यू, मलेरिया, टीबी या रोगांवरील औषधीवर संशोधन करण्यासाठी अमेरिकेकडे प्रस्ताव, १०. शेंद्रा -बिडकीन औद्योगिक वसाहत
औरंगाबाद पर्यटननगरी
महाराष्ट्र पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आहे. ताजमहालनंतर सर्वाधिक पर्यटक औरंगाबादेत येतात. पर्यटनाचा विकास करण्यासाठी स्वच्छ औरंगाबाद हवे. पर्यटन वाढले की गरिबांना रोजगार मिळतो, राज्याचीही प्रगती होते. सत्ता दिली, तर पर्यटनस्थळांचा पायाभूत विकास करू. जगात ‘डंका’ वाजेल असा विकास
आपण करू, असे मोदी म्हणाले.
बीडला रेल्वे आणायचीय
बीडमधील ३१ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण काढली. मुंडे असते तर माझी प्रचाराला येण्याची गरज भासली नसती, असे ते म्हणाले. मुंडे यांचे आमच्यावर कर्ज आहे. बीडची रेल्वे मार्गी लावायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, साथ द्या, मुंडे यांची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
शिवसेनेचा उल्लेखही टाळला
बीड, औरंगाबाद व मुंबईतील सभांत मोदींनी शिवसेना किंवा पक्षाच्या कोणाही नेत्याचे नाव घेतले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारवादी संबोधले. परंतु नेत्यांचा नामोल्लेख नाही. युती का तुटली या मुद्द्यावर मोदी बोलतील अशी अपेक्षा होती, परंतु ते काहीही बोलले नाहीत. आता शिवसेनेच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा.
शिवसेनेच्या सभेच्या तुलनेत गर्दी कमी, उत्साहही नव्हता
चंद्रकांत शिंदे | मुंबई - लोकसभेच्या वेळी आपल्या भाषणाने मुंबईकरांची मने जिंकणारे नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचारसभेत मात्र मुंबईकरांवर छाप पाडू शकले नाहीत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेला खचाखच भरलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर शनिवारी झालेल्या मोदींच्या सभेत गर्दी व उपस्थितांत उत्साहाचा अभाव जाणवला. भाषण कंटाळवाणे वाटल्याने लोक मधूनच उठून जात होते. मोदी मुंबईचे महत्व कमी करीत असल्याची ओरड करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा समाचार घेताना ‘मुंबईची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती नाही,’ असेही मोदींनी सांगितले.